पंडित कशाळकर यांची मैफल रंगली

अहमदनगर। दि. २४ (प्रतिनिधी)
भूतकरवाडी येथील छोटेखानी कार्यक्रमात पंडित विकास कशाळकर यांची शास्त्रीय गायनाची मैफल रंगली. अनेक चिजा गाऊन त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
येथील संगीततज्ज्ञ श्रीराम तांबोळी यांच्या निवासस्थानी पंडित डॉ. कशाळकर यांनी भेट दिली. ही भेट संगीतमय व्हावी, असा आग्रह तांबोळी यांनी केला. पंडित कशाळकर यांनी त्याला लगेच होकार दिला आणि छोटेखानी शास्त्रीय संगीताची मैफल झाली. मोबाईल निमंत्रणावर हजेरी लावत रसिकजण नादब्रह्मात तल्लीन झाले. त्यांना हार्मोनिअमवर डॉ. मधूसूदन बोपर्डीकर आणि मकरंद खरवंडीकर यांनी साथ दिली. तबल्याची साथसंगत ज्येष्ठ तबलावादक पांडुरंग मुखडे यांनी केली. पंडित भातखंडे यांनी केलेल्या संगीताबद्दल केलेल्या शास्त्राची उकल करून दाखवित डॉ. कशाळकर यांनी संगीतातील चिजा तयार करतानाचे रंजकदार किस्से सांगून रसिकांना मंत्रमुग्ध केले. अनेक उस्तादांचे किस्सेही त्यांनी सांगितले. पंडित कशाळकर यांचा सत्कार आशिर्वाद ग्रुपचे सूर्यकांत पुंडे यांनी केला. मैफलीचे संयोजन श्रीराम तांबोळी यांनी केले. या मैफलीस पवन नाईक, सवरेत्तम क्षीरसागर, श्रीकांत जोशी, डेव्हीड चांदेकर, माणिकराव हाथीदारू, प्रा. शरद गोखले, शुभांगी मांडे, शैलेंद्र गांधी, डॉ. रुपाली कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, राजा तांबोळी, सूरज सोळसे, शिरीष रसाळ, भाऊ पठारे आदी संगीत रसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आद्र्रात अचानक आलेल्या स्वरसरी सुखदायक ठरल्या.