पती-पत्नीला जन्मठेप वैराग येथे सवतीचा पेटवून खून

सोलापूर। दि. 31 (प्रतिनिधी)

चारित्र्याच्या संशयावरून सवत ललिता शिंदे (वय 32, रा. संजयनगर झोपडपट्टी, वैराग) हिचा पेटवून देऊन खून केल्याच्या आरोपावरून जहाँगीर श्रीरंग शिंदे उर्फ भोसले (वय 50) व त्याची पहिली पत्नी शोभा (वय 45) या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

आरोपी जहाँगीर याने पहिली पत्नी शोभा असताना ललिता हिच्याबरोबर दुसरे लग्न केले होते. काही दिवसांनी चारित्र्याचा संशय घेऊन तो तिचा छळ करू लागला. त्यामुळे तेथेच वेगळे घर करून ती राहू लागली. 20 जानेवारी 2011 रोजी ललिता ही कामानिमित्त गावात गेली होती. रात्री 8 वा. ती घरी परत आली. त्यावेळी आरोपी जहाँगीर व शोभा हे दोघे तिच्या घरी गेले. तू कोणाबरोबर गेली होतीस सांग. आमची इज्जत घालवितेस काय म्हणून जहाँगीर याने घराला आतून कडी लावून रॉकेलचा डबा तिच्या अंगावर ओतला तर शोभा हिने तिला पेटवून दिले. ती ओरडू लागल्यावर छताचे पत्रे काढून आरोपी पळाले. तिच्या ओरडण्याने शेजारी तानाजी गवळी, नंदू शिंदे धावत आले. त्यांनी आग विझवून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे पोलिसांनी जबाब नोंदवून आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. उपचारादरम्यान 24 जानेवारी रोजी ती मरण पावली.

खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस सरकारतर्फे 7 साक्षीदार नोंदविले. ललिता हिने दिलेला मृत्यूपूर्व जबाब ग्राहय़ मानून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. यात सरकारतर्फे अॅड. प्रवीण शेंडे तर आरोपींतर्फे अॅड. एम. जी. थोरात यांनी काम पाहिले.