वादग्रस्त चित्रपटाचा निषेध, राजनैतिक परिसरात घुसण्याचा प्रयत्न, लष्कराला पाचारण
इस्लामाबाद। दि. २0 (वृत्तसंस्था)
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे आज वादग्रस्त अमेरिकी चित्रपटाच्या निषेधार्थ हजारो लोकांनी काढलेला मोर्चा रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले.
विविध विद्यार्थी संघटना, इस्लामी जमियात-ए-तलाबाचे कार्यकर्ते लाठय़ा, काठय़ा व हातात दगड घेऊन रेड झोन म्हणून ओळखल्या जाणार्या या राजनैतिक परिसराजवळ जमले होते. कडक बंदोबस्त असणार्या या परिसरात अमेरिका, भारतासह इतर देशांचे दूतावास तसेच महत्त्वाच्या सरकारी इमारती आहेत.
या परिसरात शिरून अमेरिकन दूतावासाकडे जाण्याचा निदर्शकांचा प्रयत्न होता. दुपारी २ वाजता हजारोंच्या संख्येत हा जमाव आला आणि दोन तासांत आणखी लोक सामील झाल्याने हा जमाव प्रचंड वाढला.
कट्टरवादी संघटना अहल-ए-सुन्नत वाल जमात व जमात उद दावा या संघटनेचे हजारो सदस्य मोर्चात सहभागी झाले.

