पाणी व चाराटंचाईवरून जि.प.तप्रशासनाची भंबेरी

जालना। दि. ८ (वार्ताहर)
दुष्काळाच्या छायेत असलेल्या जालना जिल्ह्यात संभाव्य पाणी व चाराटंचाईसंदर्भात केलेल्या नियोजनाचे उत्तर देताना बुधवारी स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद प्रशासनाची अक्षरश: भंबेरी उडाली. कथित इन्स्पायर अँॅवॉर्ड गैरव्यवहाराची चौकशी करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र प्रशासनाने शिक्षणाधिकार्‍यांकडून खुलासा मागविण्याचा निर्णय घेऊन वेळ मारून नेली.
यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा आशाताई भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ३ वाजता सभा सुरू झाली. प्रारंभीच उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त करा, या मागणीचा ठराव मांडला. त्यास सदस्य बाळासाहेब वाकुळणीकर यांनी अनुमोदन दिले.
पाणी व चाराटंचाई या दोन्ही मुद्यांवरून सद्य परिस्थिती व उपाययोजनेसंदर्भात बाजू मांडताना मात्र प्रशासनाची भंबेरी उडाली. सद्यस्थितीत मागणीपेक्षा कमी टँकर सुरू असल्याचा आरोप विरोधी गटनेते सतीश टोपे यांनी केला. पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास टंचाईवर मात करण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या सहमतीने तालुकास्तरावर आकस्मिक टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला, अशी माहिती ग्रा.पा.पु.चे कार्यकारी अभियंता एस.आर. कदम यांनी दिली. मात्र संभाव्य टंचाईकाळ कोणता? या प्रश्नावर अतिरिक्त सीईओ पी.आर. सवडे व कदम यांनी वेगवेगळी उत्तरे दिल्याने संभ्रम निर्माण झाला.
तालुकास्तरावर टँकरचे अधिकार तहसीलदारांना असल्याचे सांगून कदम यांनी पुन्हा संभ्रम निर्माण केला. मात्र उपस्थित गटविकास अधिकार्‍यांनी टँकरचे अधिकार उपविभागीय अधिकार्‍यांकडेच असून विहीर अधिग्रहणाचे अधिकार तहसीलदारांना असल्याचा खुलासा केला. त्याचवेळी जालना तालुक्यात ७८ विहिरींचे अधिग्रहण होते. ३१ जुलै रोजी मुदत संपल्याने ते बंद झाले असे गटविकास अधिकारी संगीता लोंढे यांनी म्हटले. मात्र मुदतवाढ का दिली नाही? असा विरोधकांनी सवाल करताच ७ ऑगस्टपर्यंत मुदत वाढविली व आता पुन्हा वाढविणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चारा टंचाईप्रश्नी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनीच उत्तरे दिली. जिल्ह्यात ज्वारी, बाजरी व मका पेरणीची आकडेवारी सांगून १५.९६ मेट्रीक टन चारा उपलब्ध राहणार असल्याचे कृषी अधिकारी काळे यांनी सांगितले. पावसाची सद्यस्थिती कायम राहिल्यास ऑक्टोबरनंतरचे नियोजन करावे लागेल, असे म्हटल्याने सद्यस्थितीत चाराटंचाई आहे किंवा नाही ? असा सवाल करीत उपलब्ध चार्‍याच्या आकडेवारीबद्दल विरोधी सदस्यांनी शंका निर्माण केली. पशुसंवर्धन विभागाचे नियोजनशून्य व सभागृहाला बैठे आकडेवारी दिली जात असल्याचा आरोप केला.
इन्स्पायर अँवॉर्ड समारोपप्रसंगी शिक्षणाधिकारी गजानन कांबळे यांनी त्यात काही शिक्षकांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. या मुद्यावरून विरोधकांनी प्रशासनाची कोंडी केली.
सदर प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केल्याने शिक्षण सभापती वर्षा देशमुख यांनी त्यासाठी चौकशी समिती नेमली जाईल, असे सांगितले. तर अतिरिक्त सीईओ सवडे व उपाध्यक्ष लोणीकर यांनी शिक्षणाधिकार्‍यांकडूनच त्यांनी केलेल्या विधानाचा खुलासा मागवू, अशी भूमिका घेतल्याने विरोधकांनी या भूमिकेचा निषेध केला.
याशिवाय मग्रारोहयो, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप इत्यादी मुद्यांवर सभागृहात चर्चा झाली. सदस्य संभाजी उबाळे, सोनवणे यांनीही चर्चेत सहभाग नोंदविला.
यावेळी सभापती बप्पासाहेब गोल्डे, वर्षा देशमुख, शीतल गव्हाड, कॅफो किरण धोत्रे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख तसेच कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.