पॉपकॉर्न

बोल बोल म्हणता

- पद्मिनी दिवेकर

माझ्या जी.पी.एस.ने सांगितलेल्या घरासमोर गाडी उभी केली आणि त्या घरावरचा नंबर बघून तो पत्त्यात असलेलाच आहे, याची खात्री करून फोन फिरवला. पहिल्यांदा घरात जाण्याआधी गाडीतूनच फोन करायची मी सवय लावून घेतली होती. एक तर पहिल्या व्हिजीटला आई किंवा वडील घरात असतील अशीच वेळ मी ठरवते. इन्शुरन्सच्या कागदपत्रांवर सह्या घेते, मुलाच्या निदानाप्रमाणे जे काही गोल्स लिहिलेले असतील त्यावर मी थेरपीमध्ये काय काय करणार आहे, हे स्पष्ट करते. पालकांना मुलाविषयी अजून काही सांगायचे असेल तर त्याची नोंद घेऊन सर्व्हिस कोऑर्डिनेटरला माहिती देते. काही वेळा मूल डे केअरमध्ये असते, तेव्हा त्याची शिक्षिका आईशी बोलून मला ही सर्व माहिती देते.

रिकी गार्सिआ, वय वर्षे २ हा माझा क्लाएंट आणि त्याची आई लिसा याव्यतिरिक्त काहीच कौटुंबिक माहिती नव्हती. गार्सिआ हे स्पॅनिश नाव; पण हिला दुभाषाची गरज नव्हती, म्हणजे लिसा इथे अमेरिकेत जन्माला आली असावी. हे एक स्वतंत्र घर होते. मी दाराच्या चौकटीबाहेर बेल शोधत होते, शेवटी दारावरच टक टक केले. It's open.. आतून आवाज आला. मी दार उघडले. समोर एक लांबलचक उंच जिना होता. जिन्याच्या वरच्या टोकाला ती उभी होती. तोंडात सिगारेट आणि हातात एक केसाळ कुत्रा. हातातली खेळण्यांची मोठी पिशवी सावरत तो गड मी सर केला. ‘हाय लिसा, मी पद्मिनी.’ माझी ओळख करून दिली. ‘Nice to meet you, Minee.l अरेच्या, दोन मिनिटांत हिने माझे बारसे उरकले होते. तिचा हा आगाऊपणा मला आवडला नाही. ‘You can call me Mrs. Divekar.lमी शक्य तेवढय़ा गोड आवाजात म्हटले. सोफ्यावर बसल्यावर मी माझी फाइल काढून बोलायला सुरुवात करणार, तेवढय़ात ती मला म्हणाली, ‘मला सह्या कुठे कुठे करायच्या सांग, मला निघायला हवे.’ मला क्षणभर काय करावे सुचेना. सह्या करायची कागदपत्रे काढता काढता मी म्हटले,Where is your little bundle of joy? I mean Ricky.l लिसा जोरात ओरडली, ‘रिकीला आण.’

बेन हा मोठा मुलगा. त्याच्या हाताला धरून आलेला रिकी. बेन १६ वर्षांचा आहे, तो कायदेशीरपणे रिकीला बेबीसीट करू शकतो. याचा अर्थ माझ्या थेरपी नोट्सवर तो सही करू शकतो. लिसाने माझी ओळख करून दिली. सह्या केलेले कागद माझ्या हातात दिले. कुत्र्याला, ‘ओ माय हनी बनी, आय विल मिस यू’ असे म्हणून त्याची पप्पी घेऊन बाहेर निघून गेली. बेन हा मेक्सिकन आणि गोरा अमेरिकन यांचे फीचर्स घेतलेला सोळा/सतरा वर्षांचा होता, तर रिकी चक्क काळा होता. घरात गेल्यावर सुमारे १0/१५ मिनिटांत हे सर्व घडल्याने आणि मला रिकीबद्दल त्याच्या आईकडून माझ्याकडच्या रिपोर्टशिवाय दुसरी काही माहिती न मिळाल्याने थोडी गोंधळलेच होते. बेन माझ्याकडे या रिकीचे काय करू? अशा प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. त्याला मी रिकीला त्याच्या खुर्चीत बसवायला सांगितले.

खुर्चीत बसवल्याबरोबर रिकी खुर्चीच्या ट्रेवर हात आपटत जोरजोरात रडू लागला. मी बेनला विचारलं, ‘याला भूक लागली आहे का?’ तर तो उत्तरला, ‘आम्हाला सगळ्यांनाच भूक लागली आहे.’ मी घड्याळात बघितलं तर चार वाजून गेले होते, म्हणजे मुले शाळेतून येऊन थोडे मधल्या वेळचे खाणे खाऊन अभ्यासाला बसण्याची वेळ होती. बेनला म्हटले, त्याला काहीतरी फिंगर फूड दे. बेन आत जाऊन पॉपकॉर्न घेऊन आला. त्याने थोडेसे त्या ट्रे वर ओतले आणि उरलेले माझ्या शेजारी ठेवून तो आत निघून गेला, आत अजून काही मुलांचा आवाज येत होता.

रिकी एक पॉपकॉर्न उचलून तोंडात घालणार तोच मी जिवाच्या कराराने ट्रे खुर्चीपासून वेगळा केला आणि खाली ठेवला. माझ्या या कृतीला क्षणाचाही वेळ लागला असता तर काय घडले असते, या विचाराने माझा थरकाप उडाला. आईशी काहीच बोलणे न झाल्याने मी परत इव्हॉल्युएशनचे पेपर्स बघत असताना जे वाचले होते ते एकदम लक्षात आले. रिकी ३३ व्या आठवड्यात जन्माला आला होता. त्याचे रिफ्लेक्सेस अजूनही नीट नव्हते. अन्न तोंडात घातल्यावर गॅगिंग होईल किंवा फूड चुकीच्या पाइपमध्ये जाऊन रिकी चोक होईल असे जे पदार्थ होते त्यात ‘पॉपकॉर्न‘ हा सगळ्यात हाय रिस्क असलेला होता.

माझ्या आणि अर्थातच रिकीच्या भल्याचा विचार करणारी कोणती तरी शक्ती आहे, सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर हात जोडण्याची सवय आई-वडिलांनी लहानपणापासून लावली, त्याचे फलित काय याची क्षणार्धात जाणीव झाली. लिसाशी बोलणे न झाल्याने, पेपर्स बघताना मी नेमके हेच का वाचले, त्याच्या स्पीचबद्दल वाचायला फाइल उघडल्यावर हे पान समोर का यावे?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे काय झाले असते याहीपेक्षा रिकीला काय झाले असते? न घडलेल्या अपघाताने माझी भीतीने गाळण उडाली. आतल्या खोलीतून टीव्हीचा आवाज येत होता. रिकी अचानक जोरजोरात रडू लागला. एक तर त्याला भूक लागली होती. मला तो प्रथमच पाहत होता. त्याच्या ओळखीची कोणीच माणसे त्याला दिसत नव्हती आणि त्याचे खाणे मी त्याच्यापासून हिरावून घेतले होते. मीच एवढी गोंधळून गेले होते की, रिकी माझ्यापेक्षाही जास्त घाबरला असेल याची जाणीव व्हायला काही वेळ गेला.

असो. ट्रेमधले पॉपकॉर्न पिशवीत भरले आणि ती पिशवी रिकीच्या नजरेच्या टप्प्याबाहेर नेली. माझ्या पिशवीतले बबल सोल्युशन बाहेर काढून फुगे सोडायला सुरुवात केली. रिकी काही वेळ गप्प झाला. हवेतल्या तरंगणार्‍या फुग्यांकडे बघायला लागला. मी त्याकडे बोट दाखवून म्हटले, ‘बबल.’ अरे देवा बबलकडे बघत क्षणभर गप्प झालेला रिकी परत किंचाळून रडू लागला. आता मात्र कोणालातरी बोलावणे गरजेचे होते. लहान भावाच्या रडण्याचा एवढा आवाज येत असताना कोणीच कसे येत नाही, निदान बेन तरी. मी बैठकीच्या खोलीतूनच बेनला हाका मारायला सुरुवात केली. दोन/तीन हाका ऐकल्यावर मी बहुतेक आता आत जाईन, या भीतीने बेन वैतागलेल्या चेहर्‍याने बाहेर आला. मी त्याला काय घडले ते सांगितले. रिकीला भूक लागलेली असल्याने त्याला काहीतरी प्यायला तरी दे, तर अरे माझ्या कर्मा, त्याने एका बाटलीतले पेप्सी रिकीच्या सीपी कपात ओतून रिकीला दिले.

अरे हे त्याला चालेल का? असे विचारल्याबरोबर तो उत्तरला, ‘मॉम त्याला हेच देते.’ ‘मग तो दूध कधी पितो?’ ‘मॉम येईल तेव्हा.’ बेन मला एवढे कसे कळत नाही, अशा आविर्भावात म्हणाला. ‘ओह, मॉम दूध आणायला गेली आहे का? मग ती लगेच येईल का?’

‘ते मला काही माहीत नाही. पण ती आल्यावर त्याला ब्रेस्ट फीड करेल.’ मी काय ऐकते आहे, हे मला समजतच नव्हते. मुलाच्या थेरपिस्ट बरोबर ५/१0 मिनिटे बोलायला नाकारणारी अजून त्याला अंगावर पाजते. एरवी त्याला सोडा प्यायला देते. दुसरी मुले मोठी असली म्हणून काय झाले, त्यांच्यावर अशी जबाबदारी टाकून निघून कशी जाते? घरात धूम्रपान कशी करते? काहीतरी अजब रसायन होते हे मात्र खरे. आजच्या थेरपी सेशनमध्ये बरेच काही नाट्यमय घडले.

पहिल्या अंकात लिसाचे माझ्याशी काही न बोलता निघून जाणे. दुसर्‍या अंकात मी पॉपकॉर्न रिकीपासून काढून घेणे. आणि आता हा तिसरा अंक. दोन वर्षाच्या रिकीला आई अजून अंगावर पाजते. मनात म्हटलं चला आजचा प्रयोग रंगला आणि संपला. माझे सामान पिशवीत भरले.

थेरपी नोट्समध्ये जे घडले ते लिहिले आणि त्यावर सही घेण्यासाठी बेनला बोलवायला जरा बैठकीच्या खोलीतून आत डोकावले, तर तिथे बेन सोडून अजून एक मुलगा आणि मुलगी अगदी सारखे दिसणारे; पण ओरीएंटल लूक असणारे होते. बेनला म्हटले, सही कर.

तो बाहेर आला, तर त्याच्याकडे पाहून रिकी पुपु ओरडू लागला. ‘ओह नो,’ बेन वैतागून ओरडला, त्याने शी केली आहे, जो, त्याने हाक मारली. ‘आता तुमची टर्न, जीना आणि तू मिळून रीकीचा डायपर बदला.’ त्या दोघांच्या तोंडावरचे भाव बघून तो जोरात ओरडला, ‘तो तुमचासुद्धा भाऊ आहे.’

निसर्गाचा चमत्कार प्रत्यक्ष डोळ्यांनी मी पाहत होते, एकाच आईची ही चार मुले, आपल्या वडिलांच्या वंशाचे वेगळेपण जपत जन्माला आली होती आणि रक्ताच्या नात्याने बांधली गेली होती.