प्लॅस्टिक ध्वजविक्रीवर बंदी

नाशिक । दि. ११ (प्रतिनिधी)
भारतीय स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सण साजरा करताना स्थानिक पातळीवर विक्री केल्या जाणार्‍या प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केला जात असून, त्यानंतर कोठेही ते ध्वज पडून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज तयार करण्याला व विक्री करण्यावर बंदी घातली आहे.
प्लॅस्टिक हे बरेच दिवस नष्ट होत नसल्याने असे ध्वज इतरत्र दिसत असतात. राष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर असल्याने केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशान्वये राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकचा वापर करण्यास मान्यता दिलेली नाही. तेव्हा कोणत्याही दुकानदाराकडून अगर व्यक्तीकडून प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री अथवा वापर केला जाणार नाही. तसे आढळल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई करण्यात येईल.