बाप्पा म्हणाले, ऑल इज वेल!

‘काळजी घ्या’ सांगत घेतला निरोप

नागपूर। दि. २९(प्रतिनिधी)

दहा दिवसांपासून आनंद-उत्साहाला मस्त उधाण आले होते. आज मात्र मन भरून आले होते. आमच्या मनोकामना पूर्ण करणार्‍या, सारे घर हसत-खेळत ठेवणार्‍या लाडक्या बाप्पाने नेमाप्रमाणे निरोप घेतला. अर्थात या निरोपाच्या क्षणात पुढच्या वर्षी लवकर येण्याचे प्रॉमिस होते. त्यामुळे भक्तांच्या उत्साही चेहर्‍यावर हास्य असले तरी डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

गणरायाने, वरदविनायकाने या दहा दिवसांमध्ये भक्तांची उडालेली प्रचंड धावपळ बघितली. वाढत्या महागाईने उडालेली त्रेधा, सिलिंडरसाठी चाललेली वणवण, रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांनी मेटाकुटीस आलेले सामान्यजन.. सारेकाही बघितले.

महागाईने मोदकाचा आकार एकवेळ कमी झाला असेल, पण भक्तांच्या भक्तीचा झरा अखंड होता. त्यामुळेच विसर्जनाच्या वेळी बाप्पाने भक्तांना, सर्वसामान्य नागपूरकरांना जीवनातील वाटचालीसाठी, रोजच्या जगण्यातील बळ वाढविण्यासाठी ऑल इज वेल असाच संदेश दिला.

महागाईचा परिणाम नागपुरातील यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात दिसून आला. दरम्यान, आज फुटाळा, गोरेवाडा, गांधीसागर, पोलीस लाईन टाकळी येथे शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन केले. यावेळी बाप्पालाही आपल्या लाडक्या भक्तांचा निरोप घेताना जड झाले होते. भक्तांची काळजी वाहणारा विघ्नहर्ता म्हणाला, मी तर तुमची काळजी घेतोच. मी तुमच्यासोबत असल्यावर भीतीचे कारणच काय? पण तुम्हीही सजग राहा. तुम्हीही काळजी घ्या. टेक केअर!

श्री गणेश-ई गणेश!

मातीच्या गणरायाचे अर्थात श्रीगणेशाचे जसे विसर्जन झाले तसेच सायबरविश्‍वातही विसर्जन झाले. अर्थात हे गणराय होते ई-गणेश! फेसबुक तसेच इतरही सोशल नेटवर्किंग साईटस्वर मागील दहा दिवसांपासून बाप्पाच्या सोहळ्याची धूम होती. कलावंतांच्या प्रतिभेला तर जणू वेगळेच स्फुरण चढले होते. कॅरीकेचर्स, काटरून्स, कॉमेंटस्, लाईक्स यांची रेलचेल होती. आज बाप्पा निरोप घेणार म्हटल्यावर सोशल नेटवर्किंग साईटस्वरही हळवेपणा होता.