- निरंजन मार्कन्डेयवार
शेतकर्याच्या जिंदगीची
पडद्यावरली कहाणी
पुढे नेणारा
बारोमास.
‘मदर इंडिया’, ‘दो बिघा जमीन’, ‘सुखा’, ‘पीपली’.
शेतकर्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारे हे काही चित्रपट.
त्याच यादीत आता समाविष्ट होतो आहे ‘बारोमास’.
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक
डॉ. सदानंद देशमुख यांच्या कादंबरीवर
आधारित हा हिंदी चित्रपट.
त्याचा प्रीमियर नुकताच झाला. त्यानिमित्त.
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. सदानंद देशमुख यांच्या ‘बारोमास’ या कादंबरीवरील हिंदी चित्रपट ‘बारोमास’चा प्रीमियर नुकताच झाला. शेती, शेतकरी आणि मातीशी निगडित भावविश्वाचा वेध हिंदी चित्रपटसृष्टीने याअगोदरही घेतलेला आहे. ‘मदर इंडिया’, ‘दो बिघा जमीन’, ‘सुखा’, ‘पीपली लाइव्ह’ ही बोटावर मोजण्यासारखी नावे. आता ‘बारोमास’ आला आहे. या पार्श्वभूमीवर मदर इंडिया टू बारोमास व्हाया पीपली लाइव्ह!
अनेक मध्यमवर्गीय हे शेतकर्यांना केवळ मीडियातून भेटतात. शेतकर्यांच्या आत्महत्त्येची बातमी मध्यमवर्गीय वृत्तपत्रात वाचतात. कर्जबाजारीपणा हेच कारण समजून दोष देऊन मोकळेही होतात; पण हे कर्ज नेमके शेतकर्यांच्या वाट्याला येते कसे? याचा विचार करायला लावण्याचा मार्ग ‘बारोमास’ने मोकळा केला आहे.
‘बारोमास’मध्ये केवळ लालित्याच्या अंगाने आलेले अनुभवच नसून दाहक अनुभवांवरील भेदक भाष्यही आहे. ‘मदर इंडिया’, ‘दो बिघा जमीन’च्या वेळी ‘सेझ’ ही संकल्पनाच नव्हती. भारतीय शेतीला आणि पर्यायाने तिच्या चित्रणाला आता सर्वात मोठा पैलू जोडला गेला तो जागतिकीकरणाच्या रूपात. ‘बारोमास’मधील शेतीला जागतिकीकरणानंतरच्या बदललेल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीची पार्श्वभूमी आहे. ‘मदर इंडिया’ आणि ‘पीपली लाइव्ह’-‘बारोमास’मध्ये हा मोठा फरक आहे.
नोकरीची सुखासीनता शेतीमध्ये मिळू शकत नसल्याने स्त्रीची होणारी कुचंबणा, भावा-भावातील बिघडलेले संबंध, तोटा सोसून विकावा लागणारा शेतमाल, खालावलेलं जीवनमान, साध्या-साध्या सुविधांचा अभाव याकडे ‘बारोमास’ लक्ष वेधतो. सरकारनं केवळ वरवरची मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाय केले तरच परिस्थितीत थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे, असा विचार मनात रुजवून जातो.
सरकारी अनास्था, सरकारच्या योजना, त्यातील राजकारण, संवेदनहीनता, शेतकर्यांच्या समस्यांचे बाजारीकरण या सर्वांवर व्यंगचित्रकाराच्या शैलीत ‘पीपली लाइव्ह’ ताशेरे ओढतो. दोन वर्षांपूर्वी हा चित्रपट आला होता. वास्तव परिस्थिती आणि लोकांच्या गरजा यातील मोठय़ा दरीवर चित्रपटाने बोट ठेवले होते. उपहासातून निर्माण होत गेलेला विनोद हे मोठे शक्तिस्थान होते.
पीपली गावात राहणारा नत्था आत्महत्त्या करण्याचा निर्णय घेतो. आत्महत्त्या केल्यानंतरच सरकारकडून पैसे मिळतात, हे मनात धरून नत्थाने हा निर्णय घेतलेला असतो. या निर्णयाने राजकारण वेग घेते. ‘न्यूज व्हॅल्यू’ निर्माण होते. मीडियाची बाजारू वृत्ती, शेतकर्याच्या खर्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष ‘पीपली लाइव्ह’ने मांडले.
‘बारोमास’मध्ये भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतीची पारंपरिक पद्धत, शेतकर्यांच्या आत्महत्त्या, विदारक सामाजिक-आर्थिक परिस्थितीमधून मार्गक्रमण करणारे सुभानरावचे कुटुंब आणि त्यांचा व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष मांडण्यात आला आहे. ताणलेले वैवाहिक संबंध, उसवलेली नाती, तरुणांच्या असहायतेचा फायदा घेऊन पैसे लाटणारे राजकीय दलाल यांचे चित्रण विलक्षण आहे.
शेतकरी कुटुंबातील दोन भावांची ही कथा आहे. दोघेही सुशिक्षित. मात्र रोजगारासाठी संघर्ष आणि भ्रष्ट नोकरशाहीचा विळखा, सावकारी पाश यामुळे
एका भावाला हिंसक मार्ग पत्करावा लागतो. दुसरा लोकशाही मार्गाने राजकारणात उडी घेतो. बारोमास म्हणजे बारा महिने. नांगरणी, वखरणी, पेरणी आणि कापणी या शेतीमधील चारही अवस्थांचे चित्रण शोषणाच्या व्यथा मांडते.
ऑस्कर, हिंदी चित्रपट अन् शेती
ऑस्करसाठीचा पहिला भारतीय नामांकन मिळालेला चित्रपट ‘मदर इंडिया’ होता. आर्थिक विषमता आणि त्यातून निर्माण झालेल्या अस्तित्वाच्या समस्या दिग्दर्शक मेहबूब खान यांनी मांडल्या. पूर्ण लांबीचा रंगीत चित्रपट ‘आन’ त्यांचाच. मेहबूब खान यांचा ‘मदर इंडिया’ आणि आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’ं या दोन्ही चित्रपटांमध्ये भारतातील ग्रामीण संस्कृतीची पार्श्वभूमी होती. व्यक्तिरेखांचे नाते कृषक समाजाशी होते. ‘मदर इंडिया’ आणि ‘लगान’ हे दोन्ही चित्रपट विदेशी भाषा श्रेणीत पाचव्या नामांकनापर्यंत पोहोचले होते.
लेखक डॉ. सदानंद देशमुख यांचे बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर गाव. तेथील शेतावर डॉ. देशमुख वर्षभरच काम करतात. गव्हाची ‘गोठाडी’, ‘हातोडी’, ‘चिमटी’ हे सारेच! एकदा थ्रेशरमध्ये हात जाता-जाता वाचला! बाजूच्यांनी खेचून काढले म्हणून वाचले. ‘बारोमास’ चित्रपटातील महत्त्वाची व्यक्तिरेखा असलेल्या ‘एकनाथ’ची सर्व कामे या लेखकाने शेतात केलेली. कादंबरीचे चित्रपटात माध्यमांतर करण्यासाठी आवश्यक असलेला ‘फील’ घेण्यासाठी दिग्दर्शक धीरज मेश्राम स्वत: या शेतावर अनेक दिवस राहिले.
एकूणच बदलत्या शेतीबाबत बोलताना डॉ. सदानंद देशमुख म्हणाले, शेताची नांगरणी, बियाणे पेरणी, पाणी पाजणे, बारी देणे, गव्हाच्या ओंब्या सोंगणे, थ्रेशरवर कामे करणे इथपासून तर पीक कापून घरी येऊन पडण्यापर्यंत सगळी कामे यंत्राने साध्य करता येतात. हे चित्र जागतिकीकरणाचे देणे आहे, असे आपण म्हणू शकतो. पण मग आजचा शेतकरी सुखी का नाही?
‘बारोमास’ परिश्रम करून मातीतून सोन्यासारखा शेतमाल पिकवणे हे त्याच्या हाती; पण त्यातून येणारे सुख मात्र दुसर्यांच्या हाती! भरपूर मेहनत करून-भरपूर उत्पादन खर्च करून, अधिकाधिक उत्पन्न काढणे त्याला शक्य आहे; पण किमान भाव मिळवणे त्याच्या हाती नाही.
शेतीवर एकीकडे अस्मानी-सुलतानी संकट, तर दुसरीकडे अभावग्रस्त शिक्षित नवी पिढी. अर्धे आयुष्य शिक्षणात आणि निम्मे आयुष्य बेकारीच्या झळा सोसताना आर्थिकदृष्ट्या भणंग वैफल्यग्रस्त अवस्थेत! मात्र ‘बारोमास’मधील शेवंतामाय अखेरीस एकनाथला म्हणते, मला गावकर्यांच्या डोळ्यात चमक दिसते आहे!
मराठी चित्रपट आणि शेतकरी...
मागील काही वर्षांत शेती, शेतकरी, ग्रामीण जीवन आणि कृषी संस्कृती यांच्याशी संबंधित काही मराठी चित्रपट येऊन गेले. त्यातील काही ठळक नावे :
‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’,
दिग्दर्शक : नागेश भोसले
‘झिंग चिक झिंग’,
दिग्दर्शक - नितीन नंदन
‘पांगिरा’, दिग्दर्शक - राजीव पाटील
‘गाभ्रीचा पाऊस’,
दिग्दर्शक - सतीश मनवर
‘टिंग्या’, दिग्दर्शक - मंगेश हाडवळे
‘बळीराजाचं राज्य येऊ दे’,
दिग्दर्शक - अरुण कचरे

