युवा चित्रपट निर्मात्यांनी सांगितल्या वनलाइन स्टोरी
अनुज अलंकार। दि. १0 (मुंबई)
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन उद्या (गुरुवार) आयुष्याच्या सत्तरीत पदार्पण करताहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त.. ‘लोकमत’ने सात दिग्गज चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांबरोबर संवाद साधला, ज्यांनी आजवर बिग बींना घेऊन चित्रपट केलेला नाही, त्यांना अशी संधी मिळाली तर कोणती भूमिका द्याल, या प्रश्नाचे स्वागत करून कुणी अहिंसेचे पंडित, कुणी सरपंच, कुणी डान्सगुरू, गुप्तहेर तर कुणी राष्ट्रपती अशा भूमिका त्यांनी साकाराव्यात, असे सांगून त्या स्टोरींची वनलाइनही या दिग्दर्शक-निर्मात्यांनी दिली.
जर मला बिग बींबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तर मी त्यांना ‘एका वैज्ञानिका’च्या रूपात सादर करेन. एक असा वैज्ञानिक जो महात्मा गांधींच्या शांती व अहिंसा या आदश्रांवर चालत असला, तरी तो देशाच्या सुरक्षेसाठी विध्वंसक प्रणाली तयार करीत असतो.
- आशुतोष गोवारीकर
काहीवर्षांपूर्वी मी एका कथेचा विचार केला होता. या कथेत गावातील एका सरपंचाची भूमिका आहे, जो आपल्या आजूबाजूच्या गावात महिलांवर होणार्या अत्याचारांना विरोध दर्शवतो आणि त्या संघर्षात तो आपले सगळे काही झोकून देतो. ही भूमिका जर अमिताभ करतील, तर खरंच समाजातही अनेक बदल होतील.
- विशाल भारद्वाज
मी जेव्हा चित्रपटसृष्टीत माझ्या कामाची सुरुवात केली होती, तेव्हा वृत्तपत्रात एक कथा वाचली होती. ही कथा एका न्यायमूर्तीची आहे, जो आपल्या नैतिक व सत्य स्वभावासाठी ओळखला जातो. निष्पक्ष न्यायासाठी तो आपल्या कुटुंबीयांचीही पर्वा करीत नाही आणि आपल्या मुलाच्या चुकीसाठी तो त्याला फाशीची शिक्षा सुनावतो. अमितजींनी जर ही भूमिका केली, तर ती सदैव स्मरणात राहणारी भूमिका असेल.
- राजकुमार हिरानी
माझ्या मनात या महानायकासाठी एक भूमिका आहे, जी एका डान्सगुरूची आहे. जो देशातील क्लासिकल नृत्याच्या परंपरेत झालेल्या बदलांमुळे निराश होऊन नृत्यापासूनच संन्यास घेतो. त्याची मर्जी नसतानाही त्याची मुलगी क्लासिकल नृत्य क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याचा निर्णय घेते. आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो आपल्या मनाला मारून नृत्य क्षेत्रात पुन:पदार्पण करतो.
- इम्तियाज अली
माझ्याजवळ त्यांच्यासाठी एका चित्रपट निर्मात्याची कथा आहे, ज्याला वर्षानुवर्षे काम करूनही यशाची चव घेता आलेली नाही; पण जेव्हा तो पूर्णत: निराश-हताश होतो, तेव्हा त्याच्या जीवनात अशी वेळ येते, की त्याला एक चित्रपट बनवावा लागतो. हा निर्णय त्याच्या जीवनाचा असा कायापालट करतो की, तो एक चांगला चित्रपट दिग्दर्शक म्हणूनही प्रसिद्ध होतो.
- नीरज पांडे
कथा एका गुप्तहेरावर आधारित आहे, जो आपल्या कामात कधीच गांभीर्य दाखवत नसतो. या गुप्तहेराच्या जीवनात अशी एक वेळ येते, तेव्हा त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळते. त्याला अशी संधी मिळते, जी त्याच्यासाठीही आव्हान असते, जी त्याच्याबरोबरच त्याच्या कुटुंबासाठी, देशासाठी महत्त्वाची असते. माझे असे स्वप्न आहे , की मी हा चित्रपट अमिताभ बच्चनबरोबर बनवावा.
- मधुर भांडारकर
माझी ही कथा एका राष्ट्रपतीची आहे, ज्याला अचानक देशाचे राष्ट्रपतीपद मिळते. पण पदावर आल्यानंतर त्याला कळतं, की हे पद देशातील लोकांसाठी व भविष्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे. नंतर राष्ट्रपती म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये येणार्या अडथळ्य़ांचा सामना करतो आणि या सर्वोच्च पदाचा मान राखतो. तो असा राष्ट्रपती बनतो, जो देशाची दशा आणि दिशाच बदलून टाकतो.
- राजकुमार गुप्ता

