बीडीडी.. म्हणे हेरिटेज

मुंबई । दि. १६ (प्रतिनिधी)- हेरिटेज कमिटीने बीडीडी चाळींना ऐतिहासिक वास्तू जाहीर करणार ही चर्चा सध्या मंत्रालयात रंगू लागली आहे. आज शिवडीतल्या चाळीत स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळणे येथील रहिवाशांना नवे नाही, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शहरातल्या २0७ चाळींच्या पुनर्विकासाची मागणी धूळखात पडली आहे. डागडुजीअभावी येथील अनेक चाळी कशाबशा तग धरून उभ्या आहेत. असे असताना या चाळींचा समावेश ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत कसा काय होऊ शकेल, असा सवाल येथील रहिवासी करतात.

शिवडी येथील बीडीडी चाळ क्रमांक १0 मधील ५२ नंबरच्या खोलीतील स्लॅब सकाळी दहाच्या सुमारास कोसळला.

चाळीत स्लॅब कोसळल्याच्या घटना वारंवार होत असल्याने चाळींच्या पुनर्वसनाची चर्चा सुरू आहे. मात्र हेरिटेज कमिटीने हेरिटीज म्हणून बीडीडी चाळींचा समावेश केला आहे. याला चाळींच्या रहिवासी समितीने आक्षेप घेतला आहे.

मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास कधी होणार, हाच प्रश्न गेली कित्येक वर्षे चाळकर्‍यांच्या मनात आहे. मुंबईमधील कामगार वस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या नायगाव, वरळी, ना. म. जोशी मार्ग (डिलाइल रोड) आणि शिवडीत १९२१-२४ मध्ये कैद्यांसाठी बीडीडी (बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट) चाळी बांधण्यात आल्या होत्या. त्यांनतर दुसर्‍या महायुद्धानंतर या चाळी रहिवाशांसाठी खुल्या केल्या केल्या. त्या काळापासून आजतागायत २0७ चाळींमध्ये सुमारे १६ हजारांहून अधिक मराठी कुटुंबे राहत आहेत. सुमारे ९३ एकर जागेवर या चाळी आहेत. या संपूर्ण चाळींची डागडुजीची जबाबदारी सध्या राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र बांधकाम खात्याकडून या चाळींच्या व्यवस्थेबाबत फारसे गांभीर्य दाखवले जात नाही. त्यामुळे चाळींची दुरवस्था होत आहे. अनेक चाळींच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. बाह्य भिंतींना गेलेले तडे गेले आहेत. रंगकामाअभावी भिंती जीर्ण झाल्या आहेत. अनेक चाळींची देखभालीअभावी वाईट अवस्था झाली आहे. तुटके जिने, मोडक्या खिडक्या, तुटलेले प्लास्टर, पडझड झालेली शौचालये आणि वाढती अतिक्रमणे अशा अवस्थेतही काही इमारतींमध्ये नागरिक जीव मुठीत घेऊन राहत असलेली पाहायला मिळतात. तरीही या इमारतींना हेरिटेजमध्ये टाकण्याचा डाव कमिटीने घेतला आहे