बेछूट आरोपांनी देशाची बदनामी

पंतप्रधानांचे टीकास्त्र; भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी कायदा बदलणार

नवी दिल्ली।

दि. १0 (लोकमत न्यूज नेटवर्क)

सरकारी कार्यालयीन कामकाजात विश्‍वास, पारदर्शकता व जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी सरकार वाटेल ते करण्यास तयार आहे. परंतु, भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर नकारात्मक व निराशावादी वातावरण बनविण्याच्या प्रयत्नामुळे आपल्या देशाची बदनामी होईल, शिवाय कार्यपालिकेचे मनोबल खचेल, असा इशारा डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला. विज्ञान भवनात आयोजित सीबीआय व राज्य भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागांच्या १९ व्या संमेलनात पंतप्रधान बोलत होते.

व्यापारी कंपन्यांत होणारा भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यास आणि कायद्यातील त्रुटी दूर करण्यास भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात इमानदार अधिकारी व कर्मचार्‍यांना अकारण त्रास होऊ नये; सोबतच भ्रष्टाचारात गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही, हे सुनिश्‍चित करण्यासाठी आपणाला या कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

इमानदार अधिकार्‍यांना संरक्षण देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यावर भर देऊ इच्छितो. हा कायदा आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार बनविण्याचा सरकारचा विचार आहे.

अडवाणींनी केले ‘मनरेगा’चे कौतुक

मनरेगामुळे ग्रामीण भागातील लोकांना मदत मिळाली व आर्थिक विकासाला चालना मिळाली असे कौतुक भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संयुक्त राष्ट्रात केले.