६९ संतप्त मराठी निदर्शकांना अटक; महाराष्ट्र-बेळगावचे सर्व रस्ते सील
बेळगाव। दि. १0 (प्रतिनिधी)
मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानासमोर उपोषण करणार्या सीमाभागातील नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आणि राष्ट्रपतींनी बेळगाव येथे येऊ, नये म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेत्यांना येथील धर्मवीर संभाजी चौकात हातात काळी निशाणे घेऊन जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. पोलिसांनी समितीच्या ६९ कार्यकर्त्यांना अटक केली असून त्यामध्ये तीन माजी महापौरांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रपतींच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून बेळगावकडे येणारे सगळे मार्ग बंद करण्यात आले आहे. मुंबईत सीमाभागातील नेत्यांना अटक केल्याचे वृत्त बेळगावात समजताच समितीचे नेते व कार्यकर्ते संतप्त झाले. येथील धर्मवीर संभाजी चौकात समितीचे नेते, कार्यकर्ते हातात काळे झेंडे घेऊन दाखल झाले.
‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ‘शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला. त्यांना एपीसी पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे.
मंदिरात घंटानाद
राष्ट्रपती बेळगावात येऊ नयेत, म्हणून शहरातील चव्हाट गल्लीतील महिलांनी मारुती मंदिरात एक तास ‘घंटानाद’ केला.
राष्ट्रपती आज बेळगावात
बेळगाव तालुक्यातील हलगा येथे नव्याने उभारलेल्या सुवर्ण विधानसौध या कर्नाटक विधिमंडळाच्या नवीन विधानभवनाचे उद्घाटन करण्यासाठी गुरुवारी राष्ट्रपती बेळगाव दौर्यावर येत आहेत.
शिवसेनेचा आज ४ जिल्ह्यात बंद
कोल्हापूर। दि. १0 (प्रतिनिधी)
बेळगाव येथे उद्या (दि.११) विधानसौधच्या उद्घाटनासाठी येणार्या राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने उद्या कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी दोन वाजेपर्यंत बंदचे आवाहन केले आहे. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी आज येथे ही माहिती केली. सीमाभागातील तमाम मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र आहे, हे कृतीतून दाखविण्यासाठी बंद पाळण्यात येत असल्याचे रावते यांनी सांगितले. त्याच आंदोलनाचा भाग म्हणून उद्याच सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत कोगनोळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सीमाप्रश्नाच्या चळवळीतील बेळगाव हे मुख्य केंद्र आहे. त्यामुळे अशा वादग्रस्त प्रश्नातील मुख्य शहर असलेल्या शासकीय समारंभास राष्ट्रपतींनी येऊ नये,अशी शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेने या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. परंतु तरीही राष्ट्रपती उद्घाटनासाठी उद्या (गुरुवारी) येत आहेत.

