गणेशोत्सवापूर्वी मिळणार्या रकमेवरून जुंपली..
मुंबई। दि. २0 (प्रतिनिधी)
वेतन करारापोटीच्या थकबाकीतील काही रक्कम मिळेल, अशी आशा बेस्टच्या कामगारांना असताना आता ही रक्कम गणेशोत्सवानंतरही मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बेस्टच्या कामगारांना २00६ ते २0१२ या कालावधीतील वेतन करारापोटीची मिळणारी थकबाकी ही कमीत कमी १0 हजार ते २ लाख २0 हजारपर्यंत आहे. ही थकबाकी तीन टप्प्यांत देण्याचा करार २७ मार्च २0१२ रोजी मान्यताप्राप्त युनियन आणि बेस्ट प्रशासनात झाला. यानुसार थकबाकी कधी द्यायची याबाबत मान्यताप्राप्त युनियनचे सरचिटणीस आणि बेस्टचे महाव्यवस्थापक संयुक्तपणे निर्णय घेतील, असे नमूद करण्यात आले. मात्र, सप्टेंबर महिना उजाडला तरी या थकबाकीबाबत कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासनात हालचाली दिसून आल्या नाहीत. दुसरीकडे बेस्ट संघटनांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
वेतन करारापोटीचा करार झाला आहे. त्याबाबत आम्ही बेस्ट प्रशासनाशी पुन्हा बैठक घेऊ. करारापोटीची रक्कम त्यांना मिळेलच; पण गणेशोत्सवापूर्वी मिळणार्या रकमेबाबत आम्ही काहीच बोललो नव्हतो. शिवसेनेच्या बेस्ट संघटनेकडूनच अशी रक्कम मिळण्याबाबत हवा तयार करण्यात आली होती. शिवसेनेकडूनच बोर्ड लावण्यात आले होते. मात्र, त्यांच्यात दम राहिला नसल्याने ते आता असे करू शकणार नाहीत. - शरद राव (बेस्ट वर्कर्स युनियन : अध्यक्ष)
- बेस्ट वर्कर्स युनियन ही मान्यताप्राप्त युनियन आहे. कामगारांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे शरद रावांच्या युनियनकडेच आहेत, आमच्याकडे नाहीत; आणि दुसरी बाब म्हणजे गणेशोत्सवापूर्वी मिळणारी रक्कम कामगारांना मिळावी याबाबत आम्ही कधीच आरडाओरडा केला नव्हता. आम्ही कुठेही बोर्ड लावले नाहीत.
- सुहास सामंत (बेस्ट कामगार सेना : नेता)

