ब्रँड अँबॅसडर

- हेमंत कर्णिक

हिंदी सिनेमातल्या नटांना अफाट लोकप्रियता काही काल-परवापासून मिळायला लागलेली नाही. कुंदनलाल सैगलच्या आख्यायिका अजून ऐकू येतात. ‘किस्मत’मधल्या अशोक कुमारलासुद्धा आयकॉनिक लोकप्रियता मिळाली होती. राज-दिलिप-देव यांनी दोन पिढय़ांच्या हृदयावर अधिराज्य केलं. शम्मी कपूरच्या ‘जंगली’ अवतारानं त्या काळातल्या तरुणाईला खूळच लावलं होतं आणि राजेश खन्नाला तर ‘सुपरस्टार’ हे बिरुद ऑफिशियलीच लावण्यात आलं होतं. मग अमिताभचं विशेष ते काय?

कोणीही सिनेनट जेव्हा असा अचाट लोकप्रिय ठरतो, तेव्हा त्यात अपघात किंवा नशीब, असलं काही नसतं. त्या त्या काळातल्या सामाजिकतेत त्या लोकप्रियतेची मुळं सापडतात. फार दूर नको; शम्मी कपूरचा धसमुसळा, उर्मट देहबोलीचा नायक लोकप्रिय होतो याचं कारण किती स्पष्ट आहे! ‘जंगली’ १९६१ मध्ये आला. तोपर्यंत ‘एकदा स्वातंत्र्य मिळालं, की सगळे प्रश्न सुटतील,’ या आशावादाला सुरुंग लागून तो साफ ढासळून गेला होता. ‘समाजपुरुषा’च्या मनात चिडचिड दाटली होती. ‘इतकी वर्षं आपण ज्या मूल्यांना पवित्र, थोर समजत आलो; त्यात काहीच तथ्य नव्हतं? त्या मूल्यांनी आपल्याला काहीच मिळवून दिलं नाही? मग काय उपयोग त्यांचा?’ यात गोची अशी, की मूल्यांवर रागावता येत नाही. तो राग उलटतो आणि स्वत:वर येतो. नुसती चिडचिड होते. या धुमसण्यातून माणूस, विशेषत: तरुण माणूस उद्धट, उर्मट बनतो. म्हणजे, तशी इच्छा धरतो आणि सिनेमाला मास मीडिया म्हणतात, ते काय उगीच? आपल्या सुप्त इच्छा पूर्ण झालेल्या पाहता येणं, हे तर सिनेमा या माध्यमाचं मुख्य आकर्षण. नायकाच्या जागी स्वत:ला कल्पून मनोराज्यं पादाक्रांत करणं, हे कोण करत नाही? सुपरस्टार हिरो होतो; हिरॉइन होत नाही, असं का? कारण आपली सामाजिक संस्कृती पुरुषप्रधान आहे! करणारा ‘तो’ आणि करून घेणारी, त्याच्या कृतीच्या सावलीत सांभाळून राहणारी ‘ती’, अशी धारणा बहुसंख्य बायकांच्याही मनात असेल, तर कृतिवीर बाई, ही संकल्पना मूळच धरणार नाही. कुणा सुपरमॅनच्या कवेतच आपलं सुख आहे, असंच बाई मानणार.

‘जंजीर’ १९७४ मध्ये आला. दुष्काळ, महागाई, टंचाई यांनी सामान्य माणूस गांजला होता. १९७१ मध्ये मिळालेल्या बांगला देश युद्धाच्या आठवणी दिलासा देऊ शकत नव्हत्या. देशभर विद्यार्थ्यांची आंदोलनं उभी राहत होती. यातून परिस्थिती चिघळत जाणार होती आणि पुढच्या वर्षीच्या जूनमध्ये आणीबाणी येणार होती. महागाईचा वेग प्रचंडच होता. हा वाणी, तो उद्योगपती, तो अंमलदार यांना दूषणं देण्यात अर्थ नाही; ही संपूर्ण व्यवस्थाच सडलेली, किडलेली आहे, तिलाच आग लावली पाहिजे, असा संताप जनमानसात दाटलेला होता. शम्मीच्या काळातल्या भ्रमनिरासापेक्षा ही अवस्था वेगळी होती; जास्त तीव्र, जास्त सार्वत्रिक होती.

आणि आला अमिताभचा अँग्री यंग मॅन. गुंडगिरीवर पराकोटीचा राग धरणारा ‘जंजीर’मधला इन्स्पेक्टर. कोवळ्या, निष्पाप वयात हातावर ‘मेरा बाप चोर है’ असं गोंदवून घ्यावं लागलेला आणि जणू बापाच्या पापाचं ओझं शिरावर घेऊन फिरणारा ‘दीवार’मधल्या देवाला आव्हान देणारा ‘विजय’. अमिताभ मोठा नट. अनावश्यक आरडाओरडा न करता देहबोलीतून आणि आवाजातून हिंसेची उत्कट प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍या अमिताभवर लोक फिदा झाले नाहीत, तरच नवल.

पण दोन चित्रपटांमधून ‘सुपरस्टार’ घडत नसतो. एका अमिताभमध्ये सामान्य माणसाच्या किती तरी स्वप्नांची पूर्ती होऊ लागली. ‘कभी कभी’मध्ये तो रोमँटिक हिरो होता. हळुवार प्रेमाची प्रचिती देत होता. ‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये एकतर्फी प्रेमाची वेदना रंगवत होता. ‘नटवरलाल’, ‘अमर अकबर अँथनी’मध्ये खुशाल कमीपणा घेत स्वत:वर विनोद करत होता. ‘त्रिशूल,’ ‘अग्निपथ’मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सूडनाट्य रंगवत होता. ‘डॉन’, ‘खुदा गवाह’मध्ये लार्जर दॅन लाइफ झाला होता. स्वत:ला छोटं मानण्याचं कारणच नाही! तुम्ही कोणीही असा, अगदी दारुडे असलात तरी चालेल; तुम्हाला महानायकपदाची स्वप्नं बघण्याचा हक्क आहे!

हे अमिताभनं दिलं. भरभरून दिलं. प्रचंड ताकदीच्या अभिनयामधून दिलं. लक्षात घ्या, यातला एकही चित्रपट वास्तव चित्रण करत नाही. ‘दो अंजाने’सारख्या चित्रपटाच्या पूर्वार्धात दुबळी व्यक्तिरेखादेखील त्यानं रंगवली; पण नंतरच्या भागात त्याचं उट्टंही काढलं. आजच्या शाहरुखप्रमाणे तो सतत जरी अजिंक्य, अस्पर्श्य ‘डॉन’ राहिला नाही, तरी अमिताभनं त्याची अचाट अभिनयक्षमता लोकानुनयासाठी वापरली. कला करण्यासाठी नाही. अभिनयाचे खरे मानदंड उभे करण्यासाठी नाही. दीर्घकाळ ‘सुपरस्टार’ राहण्याची ती किंमत होती.

अमिताभच्या या मोठेपणाचं श्रेय त्याच्या दिग्दर्शकांमध्ये असतं, तर तो कालांतराने इतिहासजमा झाला असता. त्याचा वक्तशीरपणा, त्याची नम्र वृत्ती, त्याचा समजूतदारपणा यांच्या पुष्कळ गोष्टी ऐकायला मिळतात. आपल्यात काही तरी दैवी गुण असल्यामुळे आपल्याकडे सुपरस्टारपद चालून आलेलं आहे, अशी हवा त्याच्या डोक्यात कधीही न गेल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेची इनिंग लांबली. पुढे वयपरत्वे तिला लागायचं ते ग्रहण लागलं. उतारवयात त्यानं तशाच मारामार्‍या करणं लोकांना पूर्वीप्रमाणे रुचलं नाही. शिवाय, पुढच्या पिढीच्या अपेक्षा बदलत असतात आणि अमिताभनंच केलेल्या संस्कारांमुळे प्रेक्षकांची रुची बदलत होती. तेच ते किती काळ चालणार?

अस्ताला लागलेल्या अमिताभला पुन्हा वर उसळी घेता आली, ती ‘कौन बनेगा करोडपती’मुळे. त्यानं काढलेल्या चित्रपटनिर्मिती कंपनीच्या व्यवहारात त्याला प्रचंड तोटा झाला आणि तो भरून काढण्यासाठी त्यानं ‘केबीसी’ स्वीकारलं. चित्रपटात कधीही बापाच्या वा अन्य वयस्क भूमिकेत न आलेल्या अमिताभचा ‘केबीसी’तला अवतार प्रौढ, मध्यमवयीन होता. स्पर्धकांशी वडीलकीच्या नात्यानं बोलणारा होता. स्वत:च्या थोरवीचा आब सांभाळून स्पर्धकांना धीर देणारा होता आणि स्पर्धा कसली? माहितीची. सामान्य ज्ञानाची. सार्‍या कुटुंबानं एकत्र बसून एन्जॉय करावी अशी. दिवाणखान्यात विराजमान झालेल्या टीव्ही नामक माध्यमाचं सर्वमान्य, सर्वात प्रसन्न असं रूप.

आणखी एक गंमत. आपल्या देशाची, परंपरेची. ही गंमत न्याहाळण्यासाठी तोंडी लावायला आपण जगात सर्वांना ज्या देशाची सर्वात जास्त माहिती असते, त्या अमेरिकेला तोंडी लावायला घेऊया. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हा एक तरुण देश. जगभरातून तिथे लोक जातात ते नशीब काढायला. स्वत:च्या कसबाच्या आणि कष्टांच्या सहाय्यानं गगनाला गवसणी घालायला. तारुण्य हे तिथले प्रधान मूल्य आहे. आपण वृद्ध होऊ, तरुणाईमधून बाद होऊ, ही त्यांची सर्वात मोठी भीती. त्यांना अध्यक्ष ‘तरुण’च लागतो. अध्यक्षाचं वय काहीही असो; त्यानं कसं उत्साहानं सळसळलं पाहिजे, हजरजबाबी असलं पाहिजे, दिलखुलास असलं पाहिजे याचे तिथले निकष जबरदस्त आहेत. त्यांच्यापासून कोणाचीच सुटका नाही. ते पूर्ण करणार्‍या अध्यक्षाकडून मग ‘तारुण्यसुलभ’ पाय घसरणं झालं, तरी तिथली जनता ते चालवून घेते!

आपल्याकडे हे मुळीच चालणार नाही. आपली संस्कृती प्राचीन आहे. आपल्याकडे तारुण्यापेक्षा किती तरी जास्त मान ‘अनुभवाने केस पांढरे केले असण्या’ला आहे. आज्ञाधारकता हा जिथे मोठा गुण मानला जातो, पित्याने दिलेल्या वचनासाठी वनवासाला जाणे हा जिथला आदर्श असतो; तिथे समंजस, संयमी वागण्याचा आदर केला जातो. आपले सगळे पंतप्रधान पाहा कसे म्हातारे आहेत! आपल्या राजकारणात साठीच्या आसपास असणार्‍याला ‘तरुण’ म्हणतात! पण म्हणून नुसत्या म्हातारपणाला कुणी मोठेपणा देणार नाही. वर सांगितलेल्या अपेक्षा प्राथमिक आहेत. त्या पूर्ण न करणारा हिरो होईल, त्याच्यापुढे कुणी नतमस्तक होणार नाही.

या प्राथमिक गुणांबरोबर तो ज्ञानी असला, बोलण्यात उद्धटपणा न करता चतुर असला, समोरच्याशी आदरपूर्वक व्यवहार करणारा असला; की त्याला ‘मोठा’ म्हटलं जाईल.

आता सांगा, हे थेट ‘केबीसी’तल्या अमिताभचं वर्णन नाही का!

असा अमिताभ पुन्हा होणे नाही. तो सूट घालतो; पण अस्खलित हिंदी बोलतो. त्याला जगाची माहिती असते आणि त्याच्यापाशी कर्तृत्वाची, यशाची मोठी पुंजी आहे; पण तो किती नम्र आहे! देशाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या स्पर्धकांना कसा नीट सांभाळून घेतो! कोटी रुपये जिंकण्यापेक्षा स्पर्धकांना अमिताभशी संभाषण करण्याचं जास्त अप्रूप वाटतं! जगात मान असलेला तो ‘आपला’ माणूस आहे!

याबरोबर ‘बंटी और बबली’सारख्या चित्रपटात त्याने ‘कजरारे’ केलेलं असतं. अस्सल देशी अशा उत्तान नृत्याला साथ दिलेली असते. ‘चिनी कम’मध्ये वाढत्या वयात प्रेमप्रकरण केलेलं असतं. त्याहीपुढे जाऊन ‘निशब्द’मध्ये कोवळ्या मुलीत गुंतण्याचं चित्र रंगवलेलं असतं.

असेल. पण तो सिद्धिविनायकाला जातो. नातीला मिरवतो. कुटुंबात रमतो. त्याचं सार्वजनिक वर्तन किती निर्दोष आहे!

अमेरिकन लोक बिल क्लिंटनला मोनिका ल्यूविन्स्कीशी केलेलं लफडं माफ करतात. आपणही अमिताभच्या काही गोष्टी चालवून घेतो. ऐश्‍वर्या गरोदर राहिली तेव्हा बच्चन लोकांचं वागणं काही नीट नव्हतं. अनुराग कश्यपच्या बाबतीतही अनुरागचंच जास्त बरोबर होतं. अभिषेक-ऐश्‍वर्याच्या लग्नाला हृतिक रोशनला का आमंत्रण नव्हतं?

पण दोष काय रामात, कृष्णात नव्हते? म्हणून त्यांचं देवपण थोडंच कमी होतं? आपली महानतेची कल्पना कशी आहे? रामाचं कौतुक तो ‘र्मयादापुरुषोत्तम’ म्हणून. कृष्ण ‘सोळासहस्र नारी तरी मी बालब्रह्मचारी’! आपल्याला कुठे हवा असतो बिनडागाचा धवलपणा? उलट, आपण एखाद्याला चबुतर्‍यावर चढवतो आणि मग त्याच्या सर्व लहान-मोठय़ा दोषांवर पांघरूण घालतो. अमिताभनं त्याच्या तरुणपणात तेव्हाच्या पिढीची एक भावनिक गरज पूर्ण केली. आज तो पिकल्या केसांनी, दाढी वाढवून बसला आहे. पण ‘म्हातारा’ आहे का? आजही लोकमत आजमवलं, तर सर्व खानांना मागे टाकून सर्व लहान-थोरांमध्ये लोकप्रियतेची शर्यत तोच जिंकेल!

सांगा, अमिताभला या भारत देशाचा ब्रँड अँम्बॅसडर करून टाकूया का?