‘ब्लेड रनर’ने घडविला इतिहास

लंडन। दि. ४ (वृत्तसंस्था)

प्रबळ इच्छाशक्ती आणि ध्येय गाठण्यासाठी घेतलेली मेहनत याच्या जोरावर माणूस अशक्य गोष्टही शक्य करू शकतो. याचाच प्रत्यय आज लंडन ऑलिम्पिकच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये आला. जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरिअस याने असाधारण कामगिरी करीत ४00 मीटर शर्यतीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. ‘ब्लेड रनर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूने ही शर्यत ४५:४४ सेकंदांत पूर्ण करीत दुसरे स्थान पटकावले. दोन्ही पाय नसतानाही त्याने आपली जिद्द सोडली नाही आणि धडधाकट खेळाडूंसोबत धावण्याचे ध्येय दाखवत ही भरारी घेतली. पिस्टोरिअसने ही भरारी घेऊन ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास घडविला.