नवी दिल्ली। दि. १५
(लोकमत न्यूज नेटवर्क)
धोरण लकव्याचा आरोप होत असलेल्या संपुआ सरकारला रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीपासून आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात विरोधकांच्या असहकार्यामुळे अडचणी येत असल्याची खंत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात व्यक्त केली. तरीही विकासाला गती देण्यासाठी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
युरोपीय देशांतील मंदी, महागाई, अपुरा पाऊस, थेट परकीय गुंतवणूक, रोजगार निर्मितीचे प्रयत्न, तसेच पायाभूत क्षेत्राच्या विकासावर त्यांच्या अध्र्या तासाच्या भाषणात भर होता. तसेच विद्युतीकरण व शिक्षकांचा कौशल्य विकास आणि मुल्यमापनावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पुढील पाच वर्षांत प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याचा संकल्पही संपुआ सरकारने केला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी लोकपाल व लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. येत्या अधिवेशनात राज्यसभेत लोकपाल विधेयक मंजूर होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. अपुर्या पावसाने देशातील बहुसंख्य भागावर दुष्काळाची छाया असल्याने चलनवाढ नियंत्रित करण्यात अडचणी येत असून त्याचे महागाईत रुपांतर होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र देशातील पुरेशा धान्यसाठय़ामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असा दिलासाही त्यांनी दिला. मागील वर्षी ६.५ टक्के असलेल्या विकास दरात यावर्षी ९ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
पुण्यातील बॉम्बस्फोटांनी अंतर्गत सुरक्षेसाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर सुधारणांबाबत घेतलेल्या निर्णयांचे परकीय गुंतवणुकदारांनी स्वागत केले आहे. रोजगाराच्या वाढीसाठी ८ कोटी लोकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
आर्थिक वृद्धीला गती देण्यासाठी सरकारबरोबरच खासगी कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग तितकाच आवश्यक आहे. तसेच भारतात गुंतवणुकीसाठी कोणताही अडसर नाही, असा विश्वास आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करून परकीय गुंतवणूक देशात आणता येईल.
- डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान
त्न स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला उद्देशून भाषण करण्यापूर्वी लष्कराकडून मानवंदना घेताना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग.
बांगलादेशी घुसखोरांबद्दल केंद्र सरकारची काय धोरणे आहेत? हे घुसखोर भारतात आश्रय घेऊ शकतात? आसाममधील हिंसाचारावर खेद व्यक्त करणारे पंतप्रधान मुंबईतील हिंसाचाराबद्दल गप्प का राहिले? हा दुटप्पीपणा का?
- नरेंद्र मोदी, मुख्यमत्री, गुजरात
पंतप्रधानांनी नवीन असे काहीच सांगितले नाही. त्यांना विशेष रस असलेल्या आर्थिक विकासाबद्दलच त्यांनी पुन्हा सांगितले. उपासमार आणि वाढती महागाई यासारख्या देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल ते काहीच म्हणाले नाहीत.
- निलोत्पल बसू, खासदार, माकपा.
सुनीताने अंतराळात फडकावला तिरंगा
भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्सने अंतराळात तिरंगा फडकावला आणि भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.अर्थातच माझ्यात भारतीयत्वाचा अंश आहे. माझे वडील गुजरातचे आहेत. भारत हा खूपच सुंदर देश आहे आणि मी त्या देशाची असल्याचा मला अभिमान आहे, असे तिने आपल्या संदेशात म्हटले आहे.

