मध्यावधीचे ढग!

पवारांनाही वेध, सपाचा ठाम पाठिंबा, बसपाचा निर्णय लांबणीवर

नवी दिल्ली।

दि. १0 (लोकमत न्यूज नेटवर्क)

केंद्र सरकारच्या पाठिंब्याबाबत फेरविचार करण्याचा निर्णय आज मायावतींनी तूर्तास लांबणावर टाकला असला, तरी नि:संदिग्ध पाठिंबाही जाहीर केलेला नाही. त्याचवेळी मध्यावधी निवडणुकांना तयार राहा, असे वक्तव्य शरद पवार यांनी बडोद्यात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात केल्याने मध्यावधी निवडणुकांचे ढग जमा होऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पण उत्तर प्रदेशच्या राजकारणात बसपावर कुरघोडी करण्याच्या दृष्टीने मुलायमसिंह यादव संपुआच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मध्यावधीचे ढग बरसणार नाहीत, असा होरा आहे.

बेहिशेबी संपत्तीसंबंधीचा खटला पुन्हा सुरू करण्याचा नाट्यपूर्ण निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर अडचणीत आलेल्या मायावतींनी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी पाठिंब्याचा निर्णय लांबणीवर टाकल्याचे बोलले जाते. सखोल विचारानंतर लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मायावतींनी सांगितले.

या तपासासाठी सीबीआयला राज्य सरकारची अनुमती घ्यावी लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केल्याने सपाचे महत्त्व वाढू नये, म्हणून केंद्र सरकारचा पाठिंबा कायम ठेवावा, असे बसपातील एका गटाला वाटते. लखनौ आणि दिल्लीत या हालचाली सुरू असतानाच बडोद्यात पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांनीही केंद्राला पाठिंबा कायम असल्याचे स्पष्ट केले. मुलायमसिंह व मायावतींचा बाहेरून पाठिंबा कायम राहावा, म्हणून संपुआ सरकार सीबीआयचा गैरवापर करीत असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी केला.

केंद्रातील अस्थिरता पाहता मध्यावधी निवडणूक केव्हाही होऊ शकते. बसपा निवडणुकीसाठी सज्ज आहे. सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी आम्ही तयारीत आहोत.

- मायावती

सध्याची राजकीय अस्थिर परिस्थिती बघता मध्यावधी निवडणूक कधीही होऊ शकते, त्यासाठी सज्ज राहा. बसपाने यूपीए सरकारचा पाठिंबा काढला तरी केंद्र सरकार पडणार नाही.

- शरद पवार

पाठिंब्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे मायावतींनीच ठरवायचे असून, सरकारच्या धोरणाबाबत त्यांना काही आक्षेप असल्यास ते दूर करण्याची काँग्रेसची तयारी आहे.

- राजीव शुक्ला