रमजान ईदला ‘ईद-उल-फित्र’ असे म्हटले जाते. रमजान हा मुस्लिमांचा अत्यंत पवित्र महिना समजला जातो. या महिन्याच्या सुरुवातीलाच ज्यन्नत म्हणजे स्वर्गाची दारे उघडली जातात आणि ज्यहन्नम म्हणजे नरकाची दारे बंद केली जातात. या महिन्यात सैतानालाही अल्लाह बंदिस्त करून टाकतो अशी मुसलमानांची श्रद्धा आहे. त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त पुण्याची कामे, दान-धर्म, कुरआन-मजीदचे पठण, ‘तरावीह’ ही रमजानमधील विशेष नमाज अदा करण्यातच मुस्लिम बांधव आपला वेळ खर्च करतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषांना या संपूर्ण महिन्याचे रोजे ठेवणे अनिवार्य असते.
संपूर्ण महिन्याचे रोजे ठेवले असता रमजानच्या अखेरच्या दिवशी जगभरातील मुसलमानांचे डोळे सूर्यास्तानंतर आकाशी चंद्रकोर शोधत असतात. चंद्रकोर दिसताच सार्या मुस्लिम मोहल्ल्यातून हर्ष व उल्हासाची लाट पसरते. महिनाभर दिवसा सूर्याेदयापूर्वीच्या दीड तासाच्या पूर्वीपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी वज्र्य असलेला रोजा ठेवल्यानंतर ईदचा दिवस हा खाण्या-पिण्याचा, आनंदाचा, एकमेकांना भेटण्याचा, एकमेकांना शुभेच्छा देण्याचा, दान-धर्म करण्याचा असतो.
सत्तावीसवा रोजा संपताच खरेतर ईदची तयारी प्रत्येक मुस्लिमाच्या घरात सुरू होते. घरातील प्रत्येकाला परिधान करण्यासाठी नवनवीन वस्त्रांची खरेदी केली जाते. सुकामेवा, गोड-धोड पदार्थ बनविण्यासाठी वस्तू खरेदी केल्या जातात. ‘शीरखुरमा’ ही खास रमजान ईदच्या निमित्ताने बनवली जाणारी शेवया आणि सुक्यामेव्यानीयुक्त असणारी खीर सर्वांचे तोंड गोड करीत असते.
इस्लाम धर्मात सणांना सामूहिक रूप असते. रमजान ईद आणि बकरी ईद हे दोनच मुसलमानांचे ठळक आणि मोठे सण आहेत. या दोन्ही सणात मुस्लिम बांधव प्रत्येक गावोगावी असलेल्या ईदगाहमध्ये ईदची नमाज अदा करीत असतात. फक्त या दोनच नमाज अशा आहेत ज्या मुस्लिमबांधव वर्षातून दोनदा ईदगाहमध्ये जाऊन अदा करीत असतात.
रमजान ईदचे वैशिष्ट्य म्हणजे या महिन्यात केलेली एक नेकी किंवा दान-धर्म आणि अल्लाहसाठी खर्च केलेल्या एका रुपयाच्या बदल्यात अल्लाह सत्तर किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त पटीने पुण्य देतो, अशी श्रद्धा मुस्लिमांच्या मनात असते, त्यामुळे ते या महिन्यात जास्तीत जास्त दान-धर्म, जकात (अनिवार्य असलेले दान), गोर-गरिबांची मदत, गोर-गरिबात कपडेलत्ते वाटणे असे कार्य करीत असतात. रोजा ठेवताना काही चुकून त्रुटी राहिलेल्या असतात त्यामुळे ईदच्या नमाजच्या आधी प्रत्येकाच्या वतीने अडीचशेर म्हणजे जवळपास अडीच ते तीन किलो गहू/तांदूळ हे धान्याच्या स्वरूपात किंवा रोख रकमेच्या रूपात गरिबात वाटली जातात. यालाच ‘फित्रा’ किंवा ‘सदकातुल फित्र’ असे म्हणतात. अगदी लहान मुलापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाच्या वतीने इतकेच नव्हे, तर घरातील एखादी स्त्री गरोदर असल्यास तिच्या भ्रूणाच्या वतीनेही सदकातुल फित्र दिले जाते. यावरूनच या ईदचे नाव ‘ईद-उल-फित्र’ असे
पडले आहे.
फित्रा देण्याचे एक महत्त्वाचे कारण असेही असू शकते की, फक्त श्रीमंत किंवा उमराव लोकांचीच ईद नाही, तर गरिबातल्या गरिबाची ही ईद असते आणि ती त्यानेही तितक्याच हर्षोल्हासात साजरी करावी म्हणूनच रमजान महिन्यात जास्तीत जास्त दान-धर्म, कपडे, साड्या, पैसे, अन्न-धान्याच्या रूपात केले जाते. इस्लामने समता, एकता, मानवता आणि शांततेचा संदेश दिला असल्याने मुस्लिम बांधव अशी समता जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
रमजानचे, रमजान ईदचे महत्त्व इथेच संपत नाही, तर रमजान महिन्यातील रोजा ठेवण्यामुळे प्रत्येक स्त्री-पुरुषात सोशीकता, आत्मसंतुलन, आत्मविश्वास, मनावर ताबा आणि सहनशीलता वृद्धिंगत होते. खोटे बोलणे, निंदा करणे, चुगली करणे, शिवीगाळ करणे, भांडणतंटा करणे, फसवणूक करणे, चोरी करणे, दुष्कृत्य करणे या बाबींपासून रमजानचा महिनाभर मुस्लिम परावृत्त असतो आणि महिनाभराच्या काळात तो अधिक पापभिरू, सद्विवेकी, इमानदार, सत्यवान आणि ईशभय बाळगणारा बनून जातो आणि पुढच्या रमजानपर्यंत तो अधिकाधिक चांगला बनण्याचा प्रयत्न करतो. त्याने तो
केला पाहिजे.
हर्ष अन् उल्हास द्याया ईद आली
मानवाचे गीत गाया ईद आली
अन्न-पाणी सर्व होते वज्र्य दिवसा
शीरखुरमा गोड प्याया ईद आली
पाळुनी आदेश रोजा ठेविला मी
रोजदारा स्वर्ग द्याया ईद आली
दीन-दुबळा वा असो श्रीमंत कोणी
त्यासवे गोडी लुटाया ईद आली
आज कोणा कोणतेही दु:ख नसते
दु:ख हिसकावून घ्याया ईद आली
हात हाती अन् मिठी मारून भेटू
मन तुझे माझे जुळाया ईद आली
सर्व कटुता आज चल विसरून जाऊ
चांदणे ‘इक्बाल’ ल्याया ईद आली.
(लेखक औरंगाबाद येथील अभ्यासक आहेत.)
