मराठी शाळांना ओहोटी

अरुण फाळके। दि. १ (कारंजा(घा.)
जि. प. च्या प्राथमिक शाळांना ओहोटी लागली आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत चालल्यामुळे शाळा ओस पडू लागल्या आहेत. कारंजा तालुक्यात सात शाळांमध्ये विद्यार्थी संख्या दहापेक्षा कमी आहे, तर सात शाळांतील ४४ विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम मात्र १४ शिक्षक करीत असल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या विदारक परिस्थितीचे चिंतन आणि मंथन शासनाने वेळीच न केल्यास येत्या दोन वर्षांत अनेक शाळा बंद पडून शेकडो शिक्षकांना आपली नोकरी गमावण्याची दुर्दैवी वेळ येणार हे निश्‍चित आहे.
मराठी प्राथमिक शाळांबाबत शासनाचे दुजाभावाचे धोरण, अधिकार्‍यांची निष्क्रियता, पदाधिकार्‍यांची उदासीनता आणि शिक्षकांच्या आपल्या पेशावरील निष्ठेचा अभाव आणि वेळकाढू धोरण या सर्व बाबींचा परिणाम म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेले सर्व शिक्षा अभियान कुचकामी ठरत आहे. शासन आणि शिक्षण विभागामध्ये असलेला नियोजनाचा अभावसुद्धा ग्रामीण व शहरी भागातील, मराठी प्राथमिक शाळांच्या अधोगतीला कारणीभूत ठरत आहे. जास्त पैसे देऊन अप्रशिक्षित शिक्षक असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पालक आपल्या पाल्यांना पाठवितात, पण जि.प.च्या मराठी शाळांमध्ये पाठवायला तयार नाहीत. कारण काय असावे, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
कारंजा तालुक्यात वर्ग १ ते ४ असलेल्या ९६ व वर्ग ५ ते ७ असलेल्या ३५ उच्च प्राथमिक शाळा आहेत. मंजूर शिक्षक पदे ३२४ असून ३१६ शिक्षक कार्यरत आहेत. मुख्याध्यापक श्रेणीत मंजूर ३५ पैकी २८, पदवीधर मंजूर २१ सहायक अध्यापक २७५ पैकी २७३ शिक्षक कार्यरत आहे. म्हणजेच मुख्याध्यापकाची ८ पदवीधर शिक्षकांची ६ व सहायक शिक्षकाची २ पदे रिक्त आहेत. मंजुर चार विस्तार अधिकार्‍यांपैकी २ विस्तार अधिकारी कार्यरत असून दोन जागा रिक्त आहे. बदलून गेलेले विस्तार अधिकारी कांबळेच्या जागेवर अद्याप कोणी आलेले नाही. गटशिक्षण अधिकारी बोलके यांच्याकडे आष्टी पंचायत समितीचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे, कारंजा शिक्षण विभागाचा पूर्ण कारभार सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्मचार्‍यांचे सहकार्य व स्वत:ची क्रियाशिलता यामुळे ते आपल्या कार्याला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी, कारंजा पंचायत समितीच्या जि.प. च्या प्राथमिक शाळांमध्ये १0 ते १५ टक्के विद्यार्थ्यांची पटनोंदणी कमी झाली. प्रशिक्षित शिक्षक वर्ग, सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत सर्व प्रकारच्या मुलभूत शैक्षणिक सोयी देऊनसुद्धा विद्यार्थ्यांचा व पालकाचा कल, इंग्रजी खाजगी शाळांकडे जास्त आहे. हीच दुर्गती कायम राहिल्यास शासन खर्च करीत असलेले, कोट्यवधी रुपये वाया जाणार हे निश्‍चित. कारंजा तालुक्यातील नागलवाडी प्राथमिक शाळेत ४, खैरीधरण शाळेत ८, येणीदोडका ३, उमरविहिरी शाळेत ९, हेटीसुंसूद ६, नरसिंगपूर शाळेत ६, रानवाडी प्राथमिक शाळेत ८ विद्यार्थी संख्या आहे. या सर्व शाळेत १ ते ४ वर्ग असून प्रत्येक शाळेत दोन शिक्षक आहेत. म्हणजे १0 पेक्षा पटसंख्या कमी असलेल्या, कारंजा तालुक्यातील एकूण ७ शाळेत ४४ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना १४ शिक्षक शिकवित आहे.