महिला मल्ल गीताला कांस्य

स्ट्रेथकोना। दि. २९ (वृत्तसंस्था)

लंडन ऑलिम्पिकमध्ये केलेल्या निराशादायी कामगिरीची मरगळ झटकून नव्याने सज्ज झालेली महिला मल्ल गीता फोगट हिने आज विश्‍व कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करीत भारताला दुसरे पदक मिळवून दिले.

गीताची बहीण बबिताने काल रशियाची रखमानोव जमीरा हिला ५१ किलो वजन गटात रेपेचेज फेरीत नमवून भारतासाठी पहिले कांस्य पदक जिंकले होते.

गीताने आज आपली मोहीम रशियाची गुरोव मारियाला हिचा पराभव करीत सुरू केली. दुसर्‍या फेरीत मात्र गीता जपानची योशिदा साओरी हिच्याकडून 0-२ ने पराभूत झाली. ऑलिम्पियन योशिदाने सुवर्ण पदक जिंकल्यामुळे गीताला रेपेचेजद्वारे खेळण्याची संधी मिळाली.

या संधीचा लाभ घेणार्‍या गीताने पहिल्या रेपेचेज फेरीत कझाकिस्तानची दोतबायेव्हा अक्झिया हिला नमविले. अन्य एका लढतीत गुरुशरणप्रित कौर ही ७२ किलो वजन गटात बल्गेरियाची व्हेसिलिसा हिच्याकडून पहिल्या फेरीत पराभूत झाली. भारताने पहिल्यांदा या स्पर्धेत दोन पदके जिंकली आहेत. भारताची या स्पर्धेत सवरेत्कृष्ट कामगिरी २00६ साली झाली होती. चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत अलका तोमर हिने कांस्य पदक जिंकले होते. भारताने सर्वच सात गटात ४८,५१, ५५, ५९, ६३, ६७ आणि ७२ किलो वजन गटात महिला मल्लांना संधी दिली आहे. भारतीय मल्ल शिल्पा शेरोन ५९, नवनीत कौर ६७ या आपापल्या वजन गटात पाचव्या स्थानावर राहिल्या.