माझ्यावरचे आरोप खोटे - अजित पवार

ऑनलाइन टीम

अकोले, दि. ३० - माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील निळवंडे धरण कालव्याचे भूमीपुजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी अजित पवार म्‍हणाले, सद्सदविवेकबुद्धीला जागून मी राजीनामा दिला, तो माघारी घेण्यासाठी दिला नव्हता. पक्षाच्या आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी नाराज होण्याची गरज नाही. त्यांनी आपापल्या विभागाचे योग्य असे प्रतिनीधीत्व करावे. मी पदावर नसलो तरीही लोकनेता किंवा कार्यकर्ता म्हणून कामे करत राहणार आहे.

राष्‍ट्रवादीला बदनाम करण्‍यासाठी भ्रष्‍टाचाराचे आरोप करण्‍यात येत असून काही जणांनी तर माझ्या राजीनाम्यावर नाटक आणि फसवा-फसवी करत असल्याचे म्हटले, तर मिडीयाने पवार विरुद्घ पवार असे झळकविले. कोऴसा घोटाळ्यावरुन लक्ष हटविण्यासाठी माझ्यावर आरोप करण्यात आले. धरणांच्या किंमती वाढण्यासाठी आम्ही जबाबदार नसून त्या अनेक कारणांमुळे वाढतात. उपसा सिंचन योजणा गरजेच्याच आहेत. सिंचन श्वेतपत्रिका काढा, सत्य काय आहे ते बाहेर येईलच. तसेच आम्ही जसे बोलतो तसेच करतो, असा टोलाही त्यांनी यावेळी कॉंग्रेसला लावला.

सत्य समोर आणण्यासाठी संपूर्ण राज्यभर दौरा करणार आहे. सध्या राज्यात पाण्याची बिकट परिस्थिती आहे, यासाठी पाण्याचा वापर जपून करा. पाण्याच्या बिलाचे पैसे वेळेवर भरा, पाणी फुकट नाही असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.