- जरा काळजी घेतली तर बिघडणार नाही..!
पूर्वी जिच्याकडे मायक्रोवेव्ह असायचा तिच्याबद्दल हेवा वाटायचा. पण आता मायक्रोवेव्ह इतकी सामान्य गोष्ट झाली आहे की जवळजवळ प्रत्येकाकडेच तो असतो. काहींकडे बेसिक मॉडेल असतं तर काहींकडे अँडव्हान्स इतकाच काय तो फरक. मायक्रोवेव्ह घेण्याची आपल्याला जितकी घाई झालेली असते तितक्या तत्परतेनं आपण अनेकदा त्याच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना वाचण्याची तसदीही घेत नाही अन् थेट वापरायलाच लागतो. मायक्रोवेव्हची देखभाल करण्याची गरज आपल्या गावीही नसते. मग आपल्या घरातला मायक्रोवेव्ह कधी एकदम गरम होतो, कधी तो विचित्र आवाज करायला लागतो. मग आपण मायक्रोवेव्ह बिघडला असं म्हणतो पण तो का बिघडला याचं उत्तर आपण तो कसा वापरावा हे आधी समजूनच घेतलेलं नसतं यात असतं. माझ्या एका मैत्रिणीच्या घरी तर मायक्रोवेव्हमधून धूर यायला लागल्यानंतर घरात सगळ्यांची एकच तारांबळ उडाली. त्याचं झालं असं की, माझी मैत्रीण मायक्रोवेव्हमध्ये पॉपकॉर्न करत होती. नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ तिनं लावला आणि आतले सगळे पॉपकॉर्न जळायला लागले. तसा त्यांचा धूर मायक्रोवेव्हमधून यायला लागला. मायक्रोवेव्ह बंद केल्यावर सगळ्यातून तिची सुटका झाली खरी, पण पुढचे दोन-तीन दिवस तिच्या मायक्रोवेव्हला जळकट वास येत होता. पॅापकॉर्नसारख्या गोष्टी मायक्रोवेव्हमध्ये किती वेळ ठेवाव्यात याबदद्दलची माहिती मॅन्युअलमध्ये दिलेली असतानाही तिनं ती कधी वाचलीच नाही आणि तिची अशी फजिती झाली. अनेकदा पापड मायक्रोवेव्हमधून भाजत असताना तो जळण्याची समस्या उद्भवते. तसं होऊ नये आणि आपल्या घरातला मायक्रोवेव्ह सुरक्षित रहावा यासाठी या काही टिप्स.
- मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही अन्न शिजवत असाल तर मायक्रोवेव्हमधून बाहेर काढताना ते खूप गरम असतं. काही वेळा ज्या भांड्यात तुम्ही अन्न शिजवत असता ते भांडंही गरम झालेलं असतं. त्यामुळे हाताला चटका बसण्याची, गरम भांडं हातातून निसटून पडण्याची शक्यता असते. असं होऊ नये यासाठी मायक्रोवेव्ह पॅडस् मिळतात. त्यांचा वापर आवश्यक आहे.
- जर अन्न शिजवत असताना तुम्ही त्यावर झाकण घातलेलं असेल, तर न विसरता हवा निघून जाण्यासाठी थोडी जागा मोकळी ठेवावी. त्यामुळे अन्न लवकर शिजतं आणि वाफ हातावरही येत नाही.
- मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवताना ते मायक्रोवेव्हच्या बाहेर काढल्यानंतरही अन्नात असणार्या ऊर्जेवर शिजतं हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानुसार मायक्रोवेव्हमधून अन्न बाहेर काढल्यानंतर ते कसं आणि किती काळ झाकून ठेवायचं याच्या काही सूचना दिलेल्या असतात. त्यांचं पालन आवश्यक आहे. यालाच ‘स्टँडिंग टाइम’ म्हणतात. अन्न शिजवण्याच्या कालावधीत हा कालावधी धरला जातो.
- काही वेळा अन्न एकाच बाजूनं खूप शिजतं किंवा भांड्याच्या वरच्या भागातलं अन्न शिजतं. खालच्या भागातलं अन्न गारच राहतं. तसं होऊ नये यासाठी मधूनमधून अन्न ज्या भांड्यात असेल ते भांडं फिरवणं, अन्न ढवळणं गरजेचं आहे.
- मायक्रोवेव्हमध्ये शक्यतो धातूची भांडी वापरू नये. सिरॅमिकची भांडी सगळ्यात उत्तम. त्याचप्रमाणे काही प्रकारच्या प्लॅस्टिकची भांडीही मायक्रोवेव्हमध्ये चालतात. त्यावर तसे नमूद केलेलं असतं. त्यामुळे जी भांडी मायक्रोवेव्हमध्ये चालतात तीच वापरली पाहिजेत. ज्यामुळे अन्न आणि सोबत तुमचा मायक्रोवेव्हही खराब होणार नाही.
- पाणी गरम करताना काळजी घ्या. ‘सुपरहिटिंग’ धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे पाणी पुन्हा पुन्हा खूप जास्त गरम करायचं टाळा. चहा-कॉफी पावडरमुळे सुपरहिटिंगचा धोका कमी होतो.
- मायक्रोवेव्हचं दार नीट बंद होत नसेल, आतली गोल काच नीट फिरत नसेल तर मायक्रोवेव्ह ताबडतोब बंद करा. काही वेळा आतल्या काचेच्या ताटलीखाली खाद्यपदार्थांचे कण अडकलेले असतात. ते साफ केले की आतील प्लेट फिरायला लागते. मात्र दार बंद होत नसेल तर ते दुरुस्त केल्याशिवाय मायक्रोवेव्ह वापरणं धोकादायक असू शकतं.
- रिकामा मायक्रोवेव्ह कधीही चालू करू नये. रिकाम्या मायक्रोवेव्हला चालू केलं तर त्यातून आग पसरण्याची शक्यता असते.
- मायक्रोवेव्हपासून नेहमी ३-४ फूट लांब उभं राहिलं पाहिजे.
- एखादा नवीन पदार्थ करत असाल तर दिलेल्या वेळेपेक्षा कमी वेळ लावून अंदाज घ्या, पदार्थ कसा शिजतोय याचा. मायक्रोवेव्हच्या बाबतीत पुस्तकं जितकी उपयुक्त ठरतात त्याचप्रमाणे तुमच्या स्वत:च्या अंदाजाला आणि सतर्क राहून तुम्ही घेत असलेल्या काळजीला खूप महत्त्व असतं.
- सारिका बच्छाव

