मुक्या बहिणीची बोलकी ही माया. अर्धांगवायू झालेल्या भावाची शुभांगी करतेय शुश्रूषा

संजय तिपाले। दि. १ (बीड)
अर्धांगवायू झाल्याने अंथरूणावर खिळून पडलेल्या भावाची शुश्रूषा करत त्याला माया- ममतेच्या धाग्यात गुंफून आधार देण्याचे काम एका मुक्या बहिणीने केले आहे. जन्मत:च लाभलेल्या अपंगत्वावर मात करत आणि हॉटेल, दवाखाने, कापड दुकानात काम करून भावाला आजारातून सावरले आहे. मुक्या असूनही या बहिणीने भावाला दिलेली ही प्रेमाची भेट राखीचे बंध घट्ट करणारी आहे.
शुभांगी सोन्नाप्पा एरंडे असे त्या बहिणीचे नाव आहे. बीडमधील पेठबीड भागात राहणार्‍या या शुभांगीला जन्मत:च अपंगत्वाची दृष्ट लागली. त्या बोलण्याचा प्रयत्न करतात परंतु तोंडून निघणारे शब्द एक ताल, सूर धरतात. त्यामुळे ते समोरच्याला समजत नाहीत. मुक्या असल्यामुळे त्यांचे लग्नही झाले नाही, आणि पुढे भावासाठी तिनेही केले नाही. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. आई आणि वडिलांचे छत्र २४ वर्षांपूर्वीच हरपलेले. भाऊ धनंजय सोनाप्पा एरंडे हा मिलमध्ये काम करून आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत होता. त्याला दोन मुले, दोन मुली. त्यातील एकीचे लग्न झाले आहे. बारा वर्षांपूर्वी त्याची पत्नी आणि मुले त्याला सोडून जालन्याला निघून गेले. त्यामुळे धनंजय एरंडे एकाकी पडले. परंतु वाचेने सर्वकाही बोलता येत नसले तरी आपल्या भावाला दु:खातून सावरण्यासाठी शुभांगीच सरसावल्या. बहिण - भाऊ गुण्या-गोविंदाने राहत असतानाच चार वर्षांपूर्वी आणखी एक संकट त्यांच्यावर कोसळले. धनंजय एरंडे याला अर्धांगवायू झाल्यामुळे तो अंथरूनावर खिळून पडला. अशा स्थितीत स्वत: अपंग असतानाही वाट्याला आलेले दु:ख बाजूला ठेवून शुभांगी यांनी आपल्या भावाच्या सुखासाठी स्वत:ला वाहून गेले आहे. दिवसरात्र काबाडकष्ट करुन तिने भावाला दिलेल्या माया, ममता आणि प्रेमामुळे धनंजय काहीसा आजारातून सावरला आहे. शुभांगी यांनी पडेल ती कामे केली. येथील बसस्थानकातील कॅन्टीन, दवाखान्यात मोलमजूरी करून आपल्या भावाच्या उपचारासाठी पैसे गोळा केले. जिल्हा रूग्णालयात उपचार करून घरी परतल्यानंतर भावाला अंघोळ घालण्यापासून कपडे घालण्यापर्यंत सर्व कामे त्या करीत आहे. आजही दिवसभर मोंढय़ातील मौजकर कापड दुकानात काम करून त्या भावाच्या उपचारासाठी पैसे उभे करत आहे.