- इनसायडर ट्रेडिंग प्रकरण; प्रतिष्ठा मातीमोल केल्याचा पश्चात्ताप
न्यूयॉर्क। दि. २५ (वृत्तसंस्था)
वॉल स्ट्रीटवरील माजी बँकर व गोल्डमन साच कंपनीचा माजी संचालक रजत गुप्ता याला इनसायडर ट्रेडिंग प्रकरणात दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि ५0 लाख डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. रजत गुप्ताचे कृत्य अत्यंत नीच असून, त्याने मोठा विश्वासघात केला आहे, असे शिक्षा सुनावणार्या न्यायाधीशांनी म्हटले. तर, पश्चात्तापदग्ध रजत गुप्ताने ‘आपणच प्रतिष्ठा मातीमोल केली,’ असे उद्गार काढले आहेत.
रजत गुप्ता (६३) याने शिक्षा संपल्यानंतर एक वर्ष तुरुंगाधिकार्यांच्या देखरेखीखाली काढावे, असेही न्या. जेड रॅकॉफ यांनी म्हटले आहे. रजत गुप्ताला आता ८ जानेवारी रोजी न्यायालयासोमर शरण जावे लागणार आहे. रजत याने आपल्याला जामिनावर राहू द्यावे, अशी विनंती न्यायालयाला केली; पण न्या. रॅकॉफ यांनी ती फेटाळून लावली. गुप्ताला ऑटिस्व्हिले येथील मध्यम सुरक्षा असलेल्या तुरुंगात ठेवावे, ही विनंती न्यायाधीशांनी मान्य केली आहे; पण अंतिम निर्णय तुरुंगाधिकार्यांच्या हातात आहे. रजत गुप्ता निळा सूट परिधान करून न्यायालयात आला होता. शिक्षेचे वाचन सुरू असताना त्याने अश्रू थोपविण्याचा प्रयत्न केलेला स्पष्ट दिसत होता. तर त्याची पत्नी व चार मुली न्यायालयात प्रेक्षकांच्या गॅलरीत बसल्या होत्या. निकालाचे वाचन चालू असताना त्या सर्वजणी रडत होत्या. मॅनहॅटन फेडरल कोर्टात या खटल्याची अंतिम सुनावणी अडीच तास चालली. त्यानंतर १५ पानी निकालाचे वाचन झाले. न्या. रॅकॉफ यांनी रजत गुप्ताने केलेल्या कल्याणकारी कामांची वेळोवेळी प्रशंसा केली. मुळात चांगला असलेला हा माणूस वाहवत गेला, असे त्यांनी सांगितले. रजत गुप्ताने गोल्डमन साच कंपनीची गोपनीय माहिती हेज फंडचा संस्थापक राजरत्नम याला दिली होती. या दोघांचे हे कृत्य अत्यंत घृणास्पद असून, हा विश्वासघात आहे,
असे न्यायमूर्तींनी सांगितले. रजत गुप्तावर रोखे व गोपनीयता भंग केल्याचा आरोप आहे.
कुटुंबीय व सहकार्यांची माफी...
1) संपूर्ण जीवनात आपण कमावलेली प्रतिष्ठा आज संपल्याची भावना रजत गुप्ताने शिक्षा सुनावल्यानंतर व्यक्त करताना आपले सहकारी व कुटुंबीय यांची माफी मागितली.
2) इनसायडर ट्रेडिंगचे आरोप झाल्यानंतर रजत गुप्ताची ही पहिली प्रतिक्रिया असून, त्याने तयार केलेले निवेदन शिक्षा सुनावली जाण्याआधी वाचून दाखवले. वर्षभर चाललेल्या या खटल्यात मला माझ्या जीवनाची वास्तविकता कळली आहे.
3) केलेल्या कृत्याचा माझ्या कुटुंबावर होणारा परिणाम पाहून मला पश्चात्ताप होत आहे. उरलेले आयुष्य मी इतरांची सेवा करण्यात घालवीन, असे गुप्ताने म्हटले आहे.

