मुंबई। दि. ६ (प्रतिनिधी)
लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये आज पुन्हा एकदा भाविकांची गर्दी जमली होती. आज लिलावाच्या दुसर्या दिवशी ४ लाख १ हजार रुपयांना ११२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार एका भाविकाने विकत घेतला. आज एकूण १0४ वस्तूंचा लिलाव करण्यात आला.
काही भाविक राजाच्या चरणी सोन्याची बिस्किटे अर्पण करतात. आज एकूण १00 ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या बिस्किटांचा लिलाव करण्यात आला. ही बिस्किटे ३ लाख ४0 हजार, ३ लाख ३३ हजार, ३ लाख २७ हजार रुपयांना विकली गेली. आज लिलावामध्ये एका चांदीच्या मोठय़ा मोदकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
मोठा चमकणारा चांदीचा मोदक प्रसाद म्हणून आपल्याला मिळावा यासाठी भाविक उत्साहात बोली लावत होते. हा मोदक एका भाविकाने २ लाख १ हजार रुपयांना विकत घेतला. याचबरोबरीने
आज लिलावामध्ये सोन्याच्या चेन, अंगठय़ा, मोदक तसेच चांदीच्या गणेशमूर्तींचा लिलाव करण्यात आला.
नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविक राजाला विविध वस्तू अर्पण करतात. राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव दरवर्षी मंडळातर्फे करण्यात येतो. या वस्तू बाप्पाचा प्रसाद म्हणून भाविक आवर्जून विकत घेतात. रविवारी लिलावाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी मोठी चांदीची गदा, हिर्यांचे लॉकेट, सोन्याचे हार, चांदीचा मोठा मोदक, गणेशमूर्ती अशा विविध वस्तूंचा लिलाव होणार आहे.

