लोकमत युवा नेक्स्टच्या कार्यक्रमात अभिनेत्री राणी मुखर्जीचा संवाद
नागपूर। दि. २९ (प्रतिनिधी)
ती आपला स्वप्नातला ग्रीन बॉय शोधण्यासाठी आली पण युवा नेक्स्टचे सळसळते तारुण्य पाहून ती सर्वांवरच फिदा झाली. तिने सार्यांनाच ‘फ्लाईंग किस’ केला. नंतर हळूच लाजली अन् अय्या म्हणाली. लोकमत युवा नेक्स्टच्या कार्यक्रमासाठी शनिवारी अभिनेत्री राणी मुखर्जी नागपुरात आली. या प्रसंगी तिने युवा नेक्स्टच्या निवडक सदस्यांशी संवाद साधून तिच्या ‘अय्या’ या आगामी चित्रपटाची माहिती दिली.
या प्रसंगी लोकमत नागपूर आवृत्तीचे महाव्यवस्थापक नीलेश सिंग, अय्याचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमत समूहाने चालविलेल्या बेटी बचाओ अभियानाच्या कॅनव्हासवर राणीने ‘मां तुझे सलाम’ असे लिहून हस्ताक्षर केले. त्यावेळी उपस्थितांनी तिला प्रतिसाद दिला. तर लोकमत एनपीएलची माहिती तिला यावेळी देण्यात आली. त्यानंतर एका फुटबॉलवर स्वाक्षरी करून तिने लोकमतच्या उपक्रमाला सहकार्य व्यक्त केले. आपल्याला कसाही ‘ड्रीम बॉय’ चालेल पण दिलवाला पाहिजे. खूप म्हणजे खूप प्रेम करणारा मुलगा मला आवडेल, असे ती म्हणाली आणि सारेच तिच्यावर प्रेम करणारे निघाले. १९९६ सालापासून ‘राजा की आयेगी बारात’ चित्रपटापासून आपण अभिनयाला प्रारंभ केला तेव्हापासून आत्तापर्यंत नाचते आहे. प्रेक्षकांचे प्रेम मिळते आहे. हा प्रवास खूप आनंददायी आणि ऊर्जा देणारा आहे. मराठी मुलीची भूमिका करायची खूप इच्छा होती. ‘नायक’ सिनेमात तशी संधी मिळाली पण ‘अय्या’मधील भूमिका मोठी आहे. या भूमिकेमुळे मी मराठी प्रेक्षकांशी जुळणार आहे, याचे समाधान वाटते. जन्मापासूनच मी महाराष्ट्रात आहे. त्यामुळे मी इथल्या संस्कृतीत रुळले आहे. ‘अय्या’ तुम्ही नक्की पाहा. त्यात मी मीनाक्षी देशपांडेची भूमिका केली असून ती सर्वांनाच आवडेल, असे ती म्हणाली. सुंदर दिसण्यासाठी मी नेहमी आनंदी राहते. आयुष्यातल्या अडचणी फार गांभीर्याने घेत नाही. सुंदर दिसण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी आठवड्यातून एक रसगुल्ला खावा आणि चांगला मुलगा दिसला तर त्याच्याकडे पाहून हसावे.
‘दिल का मामला फ्रेश रहता है’ अशा टिप्स तिने मुलींना दिल्या. प्रारंभीच्या काळात माझा आवाज माझी अडचण झाला; पण आता माझा आवाजच माझी ओळख आहे. सिनेमाचा किती व्यवसाय झाला यापेक्षा तो प्रेक्षकांना किती आवडला यातच सिनेमाचे यश असते. त्यामुळे भूमिका स्वीकारताना मी नेहमीच विचार करते, असे ती म्हणाली. या प्रसंगी लोकमत युवा नेक्स्टच्या आशिष वाढवे याला तिच्या हस्ते ग्रीन बॉय पुरस्कार देण्यात आला. संचालन अनुजा घाडगे यांनी केले. या कार्यक्रमाला सेंटर पॉईंट हॉटेलचे सहकार्य लाभले.

