रेल्वे ई-तिकीट व्यवस्थेचा उडाला बोजवारा!

- रेल्वे ई-बुकिंगचे ७२ लाख व्यवहार दोन महिन्यांत ‘फेल’

मुंबई। दि.५ (प्रतिनिधी)
गौरी-गणपतीसाठी इंटरनेटवरून जर रेल्वेचे बुकिंग करण्याच्या विचारात असाल तर सावधान ! कारण, गेल्या दोन महिन्यांत ‘आयआरसीटीसी’ या रेल्वे बुकिंगकरिता लोकप्रिय असलेल्या वेबसाईटवरील तब्बल ७२ लाख व्यवहार ‘फेल’ गेले आहेत.
‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अँण्ड ट्युरिझम कॉर्पोरेशन’च्या (आयआरसीटीसी) वेबसाईटवर स्थापित क्षमतेपेक्षा जास्त ताण पडल्याने बुकिंगचे व्यवहार यशस्वीपणे पूर्ण न होण्याच्या प्रमाणातही चिंताजनक अशी वाढ झाली आहे. त्यामुळे आरक्षण सुलभ व्हावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली ही सुविधा प्रत्यक्षात गैरसोयीची ठरून प्रवाशांच्या वाट्याला मनस्ताप येत आहे. ‘आयआरसीटीसी’नेच दिलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्या वेबसाईटवरून दररोज रेल्वेची साडेचार लाख ई-बुकिंग केली जातात. साईटवर जाऊन तिकिट बुकिंगची प्रक्रिया सुरु केल्यावर तो व्यवहार नानाविध कारणांवरून अयशस्वी होण्याचे मे महिन्यातील प्रमाण ७२ टक्के तर जूनमधील प्रमाण ७५ टक्के होते. म्हणजेच या बेबसाईटवर बुकिंग करण्याचे ३५ लाख प्रयत्न जूनमध्ये तर ३७ लाख प्रयत्न मे महिन्यांत ‘फेल’ झाले. डेबिट कार्ड व नेट बँकिंगच्या माध्यमातून केले जाणारे बुकिंगचे प्रयत्न फेल जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मे महिन्यांत पेमेंटच्या या मार्गाने केले गेलेले ६६ टक्के प्रयत्न यशस्वी झाले होते. जूनमध्ये हे प्रमाण थोडे वाढून ७१ टक्के झाले. त्या तुलनेत कॅश कार्डाच्या माध्यमातून नेटवर रेल्वे बुकिंग करण्याचे प्रयत्न अधिक यशस्वी होतात, असेही या दोन महिन्यांत दिसून आले. मेमध्ये कॅश कार्डचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण होण्याचे प्रमाण डेबिट कार्डाहून २१ टक्के जास्त म्हणजे ८७ टक्के होते.

का होतात व्यवहार फेल ?
- एकाचवेळी लाखो लोक त्या वेबसाईटवर असतील तर वेबसाईट क्रॅश होण्याचे प्रकार घडतात.
- चुकीचा पासवर्ड टाकणे.
- खात्यात पुरेसे पैसे नसणे किंवा व्यवहार पूर्ण न होताच तो मध्येच अचानक अर्धवट सोडणे हीदेखील याची इतर काही कारणे असू शकतात.
- शिवाय ई-टिकेटिंगचा व्यवहार पूर्ण न होण्याची जी अनेक कारणे व प्रकार आहेत, त्यापैकी हवे असलेले तिकिट ‘जनरेट’ न होताच त्याचे पैसे मात्र संबंधित बँक खात्यातून वळते होण्याचे प्रकारही वाढीस लागल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे.
कसे मिळतात पैसे परत ?
- तिकीट तर पदरी पडलेच नाही, पण पैसेही गमावल्याचे दु:ख होईल. पण काळजी नको, कारण तीन ते चार दिवसांत तुमच्या खात्यामध्ये ते पैसे पुन्हा वळते होतात.

* व्यवहार पूर्ण न होताच पैसे वळते होण्याच्या प्रकाराचा सर्व दोष आम्हाला देता येणार नाही. ग्राहकाच्या नेट कनेक्शनचा दर्जा सुमार असणे किंवा बँकेच्या संगणकीय यंत्रणेत काही तांत्रिक दोष असणे हीसुद्धा त्यासाठी कारणे असू शकतात.
- प्रदीप कुंडू, प्रवक्ता, आयआरसीटीसी