काँग्रेस व सरकारही पाठीशी
नवी दिल्ली। दि. ८
(लोकमत न्यूज नेटवर्क)
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वध्रा यांच्यावर आरोप करणार्यांनी वध्रा यांच्या आडून काँगेसचे नेतृत्व व सरकारला लक्ष्य केले असल्याने पक्ष व सरकार यापुढेही वध्रा यांच्यामागे ठामपणे उभे राहील, असे काँग्रेस पक्षाने आज स्पष्ट केले. दुसरीकडे भ्रष्टाचाराचे स्पष्ट आरोप असल्याखेरीज वध्रा व डीएलएफ कंपनी यांच्यातील खासगी व्यापारी व्यवहारांची सरकारतर्फे चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता काँग्रेसचे प्रवक्ते रशीद अल्वी म्हणाले की, ज्या प्रकरणात कुठेही पोलिसांत फिर्याद केलेली नाही अथवा कोणत्याही तपासी यंत्रणेतर्फे तपासाची मागणीही केलेली नाही त्यात कोणालाही शिक्षा कशी काय दिली जाऊ शकते? आरोप करणार्याने चौकशीची सरळ मागणीही केलेली नाही. आरोप करणार्याकडे आधी पुरावे असायला हवेत.
चिदंबरम म्हणाले की, अन्योन्य संबंध किंवा भ्रष्टाचाराचे सुस्पष्ट आरोप असल्याखेरीज केवळ संशय व शंकांच्या आधारे खासगी व्यवहारांची चौकशी केली जाऊ शकत नाही व ती तशी केलीही
जाऊ नये.
फेसबुक पोस्टने वादंग
रॉबर्ट वध्रा आणि ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या कार्यकर्त्यांमध्ये आज फेसबुकवरून झालेल्या शाब्दिक टोलेबाजीने
वादंग उठले. वध्रा यांनी फेसबुकवर, राजकीय अस्थिरता असलेल्या देशातील सडके आंबे (मँगो पीपल इन बनाना रिपब्लिक), असे पोस्ट टाकले. मात्र, त्यानंतर त्यांनी आपले फेसबुक अकाउंटच
बंद करून टाकले.

