लुईस खुश्रीद ‘इंडिया टुडे’ला खेचणार कोर्टात

शीलेश शर्मा। दि.१0 (नवी दिल्ली)

कायदामंत्री सलमान खुश्रीद यांच्या पत्नी लुईस खुश्रीद यांनी ‘इंडिया टुडे’ समूहाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इंडिया टुडे’ला कायदेशीर नोटीस पाठविण्यात येत असून, यानंतर या समूहाला आपण न्यायालयात खेचणार असल्याचे लुईस यांनी स्पष्ट केले आहे.

‘आज तक’ या हिंदी वाहिनीने ‘ऑपरेशन धृतराष्ट्र’अंतर्गत सलमान खुश्रीद अध्यक्ष असलेल्या एका ट्रस्टने कथितपणे अपंगांना दिल्या जाणार्‍या सामग्रीच्या वितरणाआड लाखोंचा गैरव्यवहार केल्याचे ‘आज तक’ने दाखवले होते. लुईस यांनी कथितरीत्या बनावट वितरण शिबिरांचे आयोजन केल्याचे दाखवून लाखो रुपये हडपल्याचा दावा या वाहिनीने केला होता. या ट्रस्टमध्ये लुईस खुश्रीद एक महत्त्वपूर्ण पदाधिकारी आहेत.

सलमान खुश्रीद व त्यांच्या पत्नीने आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. २00९ व २0१0 दरम्यान १७ शिबिरांचे आयोजन केले गेले होते व यात २,३५३ कर्णयंत्रे, ट्राय सायकलींचे वाटप करण्यात आले होते, असा प्रतिदावा खुश्रीद दाम्पत्याने केला आहे. उल्लेखनीय आहे की, काँग्रेस ‘आज तक’च्या या बातमीने अडचणीत आली होती. अर्थात काँग्रेसने लगेच या प्रकरणाशी स्वत:ला नामनिराळे करीत खुश्रीद व त्यांच्या पत्नी याप्रकरणी स्वत: स्पष्टीकरण देतील, असे स्पष्ट केले होते.