वरून कीर्तन आतून तमाशा

सक्काळी सक्काळी ते ही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लख्याची खोपडीच सरकली. बातमीच तशी होती. बार आणि परमीट रुममध्ये देवांची आणि देशभक्तीची गाणी लावायला बंदीची मागणी करणारी जनहित याचिका दाखल झाल्याची बातमी होती. लख्या काल रात्री जरा जास्त झाल्याच्या नशेतच होता, पण ही बातमी ऐकून त्याची सगळी खाड्कन उतरली. अरे वा..जे मस्तपैकी तंगडी-बिंगडीवर ताव मारत दारू पितात ते काय देशभक्त नाहीत का? त्यांनी फक्त आयटम साँगच ऐकायची आणि घरी वरण-भात खाणारे देशभक्त आणि भाविक. तो याचिकावाला समोर असता तर लख्यानं त्याला ऐकवलं असतं, अबे येऊन बघ जरा बारमध्ये काय चर्चा रंगतात पाकिस्तानचा विषय निघाल्यावर. भारत-पाकिस्तानची मॅच असो की सायना नेहवाल वा मेरी कोमची ऑलिम्पिकमधली जीवघेणी लढत असो, अरे बारमध्ये तर फक्त देशभक्तीचाच माहोल असतो. जेवढय़ा टाळ्य़ा नी शिट्या सचिनला बारमध्ये मिळाल्या असतील तेवढय़ा देशातल्या सगळ्य़ा घरात मिळून पण भेटल्या नसतील रे सुतळीच्या..लख्या त्या याचिकाकर्त्याला मनोमन शिव्या घालत होता. आता ठीक आहे..शीला की जवानी किंवा मुन्नी बदनाम हुई जिथे ऐकायचं तिथे सारे जहाँ से अच्छा ऐकायला थोडं वाट चुकलेलं वाटेल. अरे पण म्हणून थेट बंदीची मागणी..परमिट रुमची नावंपण म्हणे देवादिकांची नकोत म्हणे..हा अन्यायच झाला. लख्याला एकदम शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला नाटकातला एक संवाद आठवला.. या नाटकातलं एक पात्र दारुचं वर्णन करताना म्हणतं, दारू म्हणजे सुरा..जे पितात ते सूर म्हणजे देव, जे पित नाहीत ते असूर म्हणजे राक्षस. लख्या काय खूश झाला होता, हा डायलॉग ऐकून. पण या बातमीनं त्याचा स्वातंत्र्यदिनच खराब केला. एकतर देशमुख साहेब गेल्यानं विरक्ती आली होती, त्यात ही बातमी ऐकून एकदम वाळीत टाकलेल्या लोकांसारखंच वाटायला लागलं होतं. या याचिकेविरुद्ध आपण दाद मागायची का असा विचारही त्याच्या डोक्यात येऊन गेला. पण तिथे उदाहरणं द्यावी लागतात, विद्वत्तापूर्ण युक्तिवादानं, ते ही शुद्धीमध्ये राहून वाद-प्रतिवाद करावा लागतो. लख्याकडं सगळ्य़ाचीच बोंब. शब्द संपले की समोरच्याच्या कानाखाली सणकन् जाळ काढायचा नी वाद मिटवायचा एवढंच त्याला माहिती. मग चांगले पॉइंट काढायला लख्या बसला गुगलवर..तिथे एक किस्सा मिळाला आणि आपण केस जिंकलीच अशी खात्रीच झाली त्याची..
दुसर्‍या महायुद्धात भरपूर लढाया जिंकणार्‍या सेनापतीची तक्रार त्याच्या प्रतिस्पध्र्यानं चर्चिलकडं केली. की म्हणे हा सेनापती रोज प्रचंड दारू पितो, त्याला तुम्ही सेनापती करता म्हणजे काय? त्यावर चर्चिल उत्तरला, कुठली दारू पितो ते ही सांगा, ती लष्कराच्या खर्चाने द्यायची व्यवस्था करू आपण. आपल्याला युद्ध जिंकायचंय, त्याचा संबंध दारूशी नाही, पराक्रमाशी आहे.. हा दाखला मिळाल्यावर स्वप्नात रममाण झालेला लख्या तंद्रीत ताडकन उठला..माय लॉर्ड, माझी तुम्हाला विनंती आहे, की ही याचिका तर फेटाळाच, पण ज्या बारमध्ये देशभक्तीपर गीते लागतील त्यांना करांमध्ये
सवलत आणि..