नवी दिल्ली।
दि. ९ (लोकमत न्यूज नेटवर्क)
गेल्या तीन महिन्यांत विमान प्रवाशांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याबद्दल हवाई वाहतूक मंत्री अजितसिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. भविष्यात प्रवाशांची संख्या वाढेल, अशी आशाही व्यक्त केली.
इकॉनॉमिक एडिटर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतातील आर्थिक मंदी चिंतेचा विषय आहे. जीडीपीच्या वाढीची टक्केवारी घसरण्याची शक्यता असून, किमती वाढण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याचा सर्वाधिक परिणाम हवाई वाहतूक आणि हॉटेल उद्योगांवर होणार आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर तिमाहीत हवाई वाहतूक ९ ते ११ टक्क्यांनी घटली आहे. मात्र, यंदा जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढली आहे.

