अनंत दीक्षित।
दि. १५ (बाभळगाव, जि. लातूर)
विराट जनसागराच्या साक्षीने विलासराव देशमुख सायंकाळी पंचत्वात विलीन झाले. सगळा महाराष्ट्र आपले अनावर दु:ख घेऊन बाभळगावमध्ये अवतरला. ज्येष्ठ नेत्याला १७ तोफांची मानवंदना दिल्यानंतर सर्वत्र शोकग्रस्त शांतता पसरली.
पंतप्रधान मनमोहन सिंग, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कृषीमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, शेकाप नेते एन.डी. पाटील, भाजपाचे अध्यक्ष नितीन गडकरी, आणि विलासरावांचे जिवलग मित्र गोपीनाथ मुंडे तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आदींनी अंत्यदर्शन घेतले.
काल रात्रीपासूनच मराठवाड्यातील सर्व रस्ते लातूरच्या दिशेने वळले. सकाळी ९ च्या दरम्यान एका खास विमानाने विलासरावांचे पार्थिव लातूरला पोहोचले. विमानतळ ते बाभळगाव हा रस्ता कापायला दीड तासाचा अवधी गेला. लातूर शहरातील आबालवृध्द साश्रूनयनाने निरोप देण्यासाठी जागोजाग उपस्थित होते.
जिथे पार्थिव ठेवले होते. तिथे पुष्पचक्राची रास वाढतच चालली होती. दुपारी दोन पर्यंत लोक रांगेने येऊन अंत्यदर्शन घेत होते. सुरक्षेची व्यवस्था म्हणून जे बॅरिकेटस उभी करण्यात आली होती ती भावनाकुल गर्दीच्या रेट्याने उन्मळून पडली. जो तो अंत्यदर्शनासाठी धावून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि काळजाचा ठोका चुकेल अशा प्रकारच्या हंबरड्यांनी आसमंत व्यापला जात होता. दुपारी पावणेदोनच्या दरम्यान पंतप्रधानांच्या आगमनाची चाहूल लागताच परिसरावर सुरक्षा यंत्रणेचे नवे कवच दिसू लागले. काही क्षणातच मनमोहन सिंग व सोनिया गांधी आल्यानंतर उपस्थित विराट जनसमुदायाने ‘विलासराव देशमुख अमर रहे’ असा घोषा केला आणि त्याचा दीर्घ परिणाम काळजाचा ठाव घेत होता. त्यामध्ये लोकभावनेची व्याकूळता ठळकपणे भीडत होती.
सूर्य जसा डोक्यावर आला होता त्याप्रमाणेच गर्दीनेही जनसागराचे रूप धारण केले होते. ध्वनीक्षेपकावरून सूचना देण्याचे काम सुरू असले तरीही हाजारोंच्या संख्येने माणसांचे लोंढे दयानंद विद्यालयाकडे मुंगीच्या गतीने सरकत होते.
विदर्भ, कोकण, मुंबई, पुणे अशा विविध भागातून विविध छटांचे लोक येत होते. लोकप्रतिनिधी, शेकडो अधिकारी, पत्रकार, शिक्षण संस्थांचे चालक येतच राहिले. यावेळी पर्यंत शरद पवार व सुशीलकुमार शिंदे आलेले नव्हते. त्यांचे विमान उतरण्यासंदर्भात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ते कर्नाटकच्या बिदर येथे उतरत असल्याचे सांगण्यात येत होते.
दोनच्या सुमारास विलासराव देशमुख नावाच्या राजकीय तुफानाचा अखेरीचा प्रवास सुरू झाला.. काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेले पार्थिव महायात्रेसाठी उचलण्यात आले. त्यावेळी सर्व उपस्थितांचे अंत:करण गलबलून गेले. पोलीस बंदोबस्त आणि नेत्यांच्या प्रचंड मादियाळीसह जनसागराचे पाय ‘देशमुख बागे’कडे वळले. याच बागेत विलासरावांच्या वडिलांनीही चिरविश्रांती घेतली आहे. तेथे विलासरावांचे पार्थिव आल्यानंतर मिळेल त्या वाटेने लोक पोहोचत होते. डोंगरावर, झाडावर, कौलारांवर इमारतींवर वाहनांच्या टपावर जागोजागी फक्त माणसेच माणसे दिसत होती.
चंदनाच्या चितेवर पार्थिव ठेवले. त्यावेळी सूर्य मावळतीकडे झुकायला लागला होता. सलामीची मानवंदना देण्यासाठी पोलिसांनी सज्जता केली. एवढय़ात पवार आणि शिंदे पोहोचले आणि काही क्षणातच चिरंजीव अमीत देशमुख यांनी पार्थिवाला अग्नि दिला. आणि. रितेश व धीरज या बांधवांनी आपल्या भावाच्या हातात हात घालून एकमेकांना सावरले. हा प्रसंग उपस्थितांना हेलावून गेला.
अ.भा. काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी विलासरावांच्या पार्थिवाजवळ आल्या. पूष्पचक्र अर्पण करुन त्या वैशाली वहिनींकडे वळाल्या. वहिनींनी हात जोडले पण सोनियाजींनी त्यांना आलिंगन दिले आणि दोघांनाही आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. दोनवेळा त्यांना आलिंगन देत सोनियाजींनी त्यांना धीर दिला खरा पण त्यावेळी त्यांचेही डोळे पाणावलेले होते.
पंतप्रधानांच्या भावनांवर गांभीर्याचे सावट गडद झालेले दिसून येत होते. केवळ लातूरचा अथवा महाराष्ट्राचा हिरा निखळला नसून देशाचा एक प्रभावी नेता हरपल्याचे पंतप्रधान देशमुख कुटुंबियांना सांगत होते. काही मिनिटे ते पार्थिवाशेजारी उभे होते.
फोटो पाहूनच
लोक रडू लागले
चौकाचौकात विलासरावांचे हसरे फोटो लावलेले. ते फोटो पाहूनच ग्रामीण भागातून आलेल्या आयाबहिणी धाय मोकलून रडतानाचे दृष्य मन हेलावून टाकत होते. आपल्या घराचा आधार गेला, असे म्हणत रडणार्या अनेक महिला आणि धोतराच्या सोग्याने डोळे पुसत त्यांना आवरणारे घरचे कर्ते पुरुष.. बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांना हे सगळे दृष्य पाहून विलासरावांची नवी ओळख पटत होती.
अस्वस्थ धीरज, रितेश आणि धीरगंभीर अमित
विलासरावांची तीनही मुलं अमित, रितेश आणि धीरज आज या सगळ्या प्रसंगाला मोठय़ा धीरगंभीरतेने सामोरे गेली. ज्या चबुतर्यावर विलासरावांचे पार्थिव ठेवले होते त्याच्या एका बाजूला अमित तर दुसर्या बाजूला धीरज आणि रितेश उभे होते. येणार्यांना हात जोडून अभिवादन करताना मधेच रितेश आपला दाटून आलेला हुंदका आवरताना दिसत होता. सिने दिग्दर्शक करण जोहर आला आणि रितेशचा बांध फुटला. अमित मात्र धीरगंभीर चेहर्याने सगळ्यांना धीर देत होता. ज्या ठिकाणी अग्नी द्यायचा होता त्या ठिकाणी पार्थिवाच्या शेजारी बसून धीरज मात्र जवळच्या रुमालाने विलासरावांना वारा देत होता.. ते दृष्य प्रत्येकाच्या डेाळ्यात पाणी आणणारे होते.

