कोणाशीच जमवून घ्यायचं नाही, कोण काय सांगतंय ते ऐकायचं नाही अशानं चांगली असलेली मुलंही दुरावतातच ना! जोडीदारापैकी एकाच्या स्वभावातल्या दोषांची शिक्षा मग दुसर्यालाही भोगावी लागते.. आपलं तेच खरं असा हेकेखोरपणा करत आयुष्यातला हा सुखाचा काळ काही लोक एकटेपणा ओढावून अक्षरश: वाया घालवतात.
‘यशो, पडलीयेस का दुपारची जरा?‘ नाही गं, ये की.‘ ‘यांच्याकडे जाऊन ये की एकदा.‘ ‘अगं, आठवड्यापूर्वीच जाऊन आले. चांगलीये तब्येत. ‘हिंदू’ वाचत बसले होते एकटेच.‘ ‘मग आता कोण असणारे त्यांच्याबरोबर ! पहिल्यापासून स्वभाव माणूसघाणा अन् मी म्हणजे शहाणा. सोन्यासारखी दोन्ही पोरं दुरावली माझी. माझ्या शेवटपणातही कोणी जवळ नव्हतं गं..! सुना तर काय, परक्याच्याच गं. त्यांना आपण आधी प्रेम लावलं तर त्या करणार ना प्रेम आपल्यावर. यांना स्वत:ला कधी मिळालं नाही वडिलांचं प्रेम नि स्वत:ही कधी दिलं नाही बापाचं प्रेम.‘ ‘असं का म्हणतेस अक्का?‘ ‘अगं, खरं तेच सांगतीये यशो. माणूस जरा विचित्रच गं. मी दर वेळेला पड खाऊन संसाराचा गाडा हाकला. यांनी जिव्हारी मारलेले शब्दांचे बाण हलक्या हातानं काढत राहिले. ओल्या जखमा उघड्या ठेवूनच सुकवल्या.‘ ‘अक्का...‘ ‘बोलू दे मला.. सारखा त्रागा अन् चिडचिड. सकाळी उठल्यावरसुद्धा चेहरा पडलेलाच. खाण्याचे नखरे तर इतके ना.! पालेभाजी..नको. बटाटा, वांगं वातूळ म्हणून नको. कुठल्याच शेंगांची भाजी आवडत नाही. तोंडी लावायला चटण्या, कोशिंबिरी नकोत, तर शेव, फरसाण, पापडी असं हवं. साजूक खाण्याचं वावडं. आम्ही सगळे रात्रीच्या जेवणाच्या वेळीच फक्त एकत्र असायचो. तेव्हासुद्धा जोरात बोलायचं नाही, मोठय़ांदा हसायचं नाही, असा धाक असायचा. नवीन असताना एक दिवस धाकट्या सुनेनं विचारलं, ’हे असे काय’ म्हणून. मी म्हटलं, ’असेच आहेत ते.’ काय सांगणार त्या नवीन आलेल्या पोरीला! माझ्या मनात यायचं, अशानं कुणी रहायचं नाही जवळ. आणि तसंच झालं गं. दोघांनी दोन दिशांना घरं घेतली. आमच्या घरापासून शक्य तेवढय़ा दूर..‘ ‘अगं, पण अजित येतो बर्याचदा त्यांना भेटायला. आणि सणावारी सुजाता पाठवते नं डबा.‘ ‘विचारलं तर तीच दोघं विचारतील शेवटी. यांचा सगळा जीव धाकट्या सुजितवरच. अजितला कायम हाडूतहुडूत केलं. साधी गाडीसुद्धा शिकवली नाही. मित्राच्या गाडीवर शिकला. त्यानं कुठल्या कोर्सला पैसे मागितले की यांचे हात कायम वर. सुजितला मात्र झुकतं माप.‘ ‘अक्का, अगं, असतंच तसं थोडंफार.‘ ‘कबूल आहे ना! सुजीतही माझाच मुलगा आहे. त्याला झुकतं माप दिलेलं मला आवडायचं नाही असं नाही. पण यांनी अजितला फार करड्या शिस्तीत वाढवलं. मग तो सारं काही माझ्यापाशीच सांगायचा. तर तिकडूनही त्याला बोलायचे.‘ ‘जाऊ दे ना अक्का.‘ अगं, असतो कुणाकुणाचा स्वभाव तुसडा, पण वयपरत्वे थोडं स्वत:ला सुधारायला नको का? मुलं मोठ झाली की लागतंच त्यांच्या कलांनी घ्यायला. दर वेळेला आपलंच म्हणणं खरं करून कसं चालेल? दोन्ही पोरं तशी स्वभावानं गरीब अन् सुना सुसंस्कारित म्हणून भांडणं झाली नाहीत एवढंच. पण न बोलता झालेच ना स्वतंत्र दोघेही?‘ ‘त्यांच्या नशिबातच एकटेपणा असेल तर त्याला तू काय करणार?‘ ‘हा नशिबातला एकटेपणा नाही. हा त्यांनी स्वत:हून ओढवून घेतलेला एकटेपणा आहे. निपुत्रिक जोडपी रहातातच ना एकटी! कायमच्या परदेशी गेलेल्या मुलांचे आई-वडीलही असतातच एकेकटे. पण आमचं तसं तर नव्हतं ना! घेतलं असतं थोडंसं जुळवून तर काय बिघडलं असतं ?‘ ‘पण त्यांची कुठे काय तक्रार आहे? एकटे चांगले मजेत राहतायत.‘ ‘अगं, पण कुठे पाय बिय घसरून पडले म्हणजे? हाक मारायला पण घरात कुणी नाही. आणि करणार कोण त्यांचं ?‘ ‘अक्का तू पण ना.. उगाच काळजी करतेस.‘ ‘दुसरं काही करणं शक्य नसलं की माणूस फक्त काळजीच करतो यशो.‘ ‘बोलण्यात तू कुणाला हार जायची नाहीस.‘ ‘बोलण्यात जिंकत असले तरी आयुष्याच्या उत्तराधार्तात हरले असंच वाटतं मला.. यशो, तुला एक अगदी मनातलं सांगू ?.. आमची काही वादावादी झाली की प्रत्येक वेळेला हे मला ’मरा मग. मरा.’ असं म्हणायचे. खूप लागायचे गं ते शब्द मनाला. मी कळवळून म्हणायचे, ’सारखं असं मला ’मरा मरा’ म्हणू नका हो. वास्तू तथास्तु म्हणत असते. एक दिवस खरंच तुमच्या आधी फटकन मरून जाईन.. शेवटी तसंच झालं ना!. तसंच झालं ना शेवटी यशो? ?..‘ ‘....अक्काऽऽऽऽऽ‘
‘हॅलो, सुजित अरे मी अजित बोलतोय.‘ ‘हं, बोल अजित.‘ ‘बाबा सकाळी पडले बाथरूममध्ये पाय घसरून. दवाखान्यात नेऊन आणलं. पायाला फ्रॅक्चर झालंय.‘ ‘तुझ्याकडेच होते ना काका?‘ ‘हो. एकटेच असतात, जरा चेंज म्हणून परवाच तर घेऊन आलो. आणि आज हे असं. नशीब एवढंच की बाथरूमला आतून कडी नव्हती लावलेली. नाहीतर पंचाईतच झाली असती. बरं, यशोमावशीला तेवढा निरोप सांग.‘ ‘येस, सांगतो.‘
ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
’....अक्के, भेटून आली गं मी विनायकरावांना. तू नको काळजी करूस. तुला जाऊन आता चार वर्षंंं होत आहेत. पण अजूनही भावजींची काळजी काही सुटत नाही. सारखं काही होणार असेल तर आधीच मला सांगून जाते. आयुष्याच्या उत्तरार्धात भावजींच्या स्वभावामुळे मुलं आणि तीही चांगली, गुणी असूनही तुमच्यामध्ये राहिली नाही याचं शल्य तुला शेवटपर्यंंंत बोचत राहिलं किती ते मला आता जाणवतंय! आयुष्याच्या संध्याकाळी तरी आपल्यातला हेकेखोरपणा लोकं सोडत का नाही गं अक्का..!
- अर्चना बापट

