अंथुर्णे। दि. ८ (वार्ताहर)
इंदापूर-बारामती महामार्गावर शेळगाव गावच्या हद्दीत बारा मोरी पुलाजवळ टेम्पो आणि पिकअप जीपचा गंभीर अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर १५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघातामध्ये जखमी झालेली उज्ज्वला अनिल तोरणे (वय ४0) ही महिला उपचारासाठी नेत असताना मरण पावली. सोमवारी (दि. ८) सकाळी इंदापूरहून येणारा कंटनेर (टेम्पो) व नऊदारे (वालचंदनगर) कॉलनी येथून शेतातील कामासाठी १५ महिलांना घेऊन निघालेली महिंद्र पिकअप यांच्यात समोरासमोर धडक झाली. टेम्पोने जीपला रस्त्याच्या कडेला फरफटत नेल्याने जीपमधील महिला गंभीर जखमी झाल्या.
जखमी महिलांना देसाई हॉस्पिटल, बारामतीच्या गिरीराज हॉस्पिटल मध्ये दाखल केले.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचा मुलगा मिलिंद ऊर्फ काळू अनिल तोरणे (वय ११) याचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी घेतली.
दरम्यान अपघातानंतर टेम्पो चालक फरारी झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निकम करीत आहेत.
जखमींना लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, यावेळी जखमींवर उपचार करण्यासाठी येथील वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच, जखमींना नेण्यासाठी रुग्ण वाहिका देखील उपलब्ध झाली नाही. या आरोग्य केंद्राची इमारत प्रशस्त आहे. मात्र, निवासी वैद्यकीय अधिकारी, शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचारी, निवासी रुग्णवाहिकेबाबत रुग्णांच्या तक्रारी आहेत.
