हवाई दलप्रमुख ब्राऊन यांचे प्रतिपादन
हिन्डोन (उ. प्र.)। दि. ८ (वृत्तसंस्था)
भारताच्या शेजारची सुरक्षा स्थिती दिवसेंदिवस बिघडत असून, सतत हिंसक कारवाया चालू असतात; ही चिंताजनक बाब आहे असे, हवाई दलप्रमुख एअर चिफ मार्शल एन. ए. के. ब्राऊन यांनी म्हटले आहे.
हवाई दलाच्या ८0व्या स्थापना दिनानिमित्त येथील हवाई तळावर आयोजित कार्यक्रमात हवाई सैनिकांची मानवंदना स्वीकारताना ते म्हणाले की, अशा परिस्थितीत उद्भवणार्या कोणत्याही आव्हानाला स्वीकारण्यासाठी उच्च दर्जाची संरक्षण सज्जता ठेवण्यात आली आहे. आजच्या या समारंभात १९३0 सालात तयार झालेल्या टायगर मॉथ विमानांच्या कवायती हे प्रमुख आकर्षण होते. हवाई दल देशात आपत्तीकालात मदत देणे, संकटग्रस्तांची सुटका करणे या आणि नक्षलवादीविरोधी कार्यात सहभागी असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. इंटेग्रेटेड एअर कमांड अँड कन्ट्रोल सिस्टीमने संपूर्ण हवाई दल यंत्रणा एकमेकांशी जोडलेली राहील.
हवाई दलाचा कणा असलेली मिग श्रेणीची लढाऊ विमाने आता सेवेतून नवृत्त केली जात असल्यामुळे हवाई दलाचे बळ थोडे कमी होत असले, तरी उपलब्ध असलेल्या सुखॉय ३0 एमकेआय या विमानांच्या साहय़ाने लढाऊ क्षमता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
येत्या डिसेंबरमध्ये या विमानांचे आणखी एक स्क्वॅड्रन उभे राहील. विमानांची १४ स्क्वॅड्रन निर्माण करण्याचा हवाई दलाचा प्रयत्न असून ती देशाच्या पूर्व, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम भागात तैनात केली जातील. मिराज -२000 तसेच जग्वार विमानांची क्षमता वाढवून हवाई दलाची प्रहारक्षमता वाढविण्यात येईल.

