सलाम

- किरण जोशी

वाळवंटाच्या तळपत्या मातीत

उभ्या राहिलेल्या अफगाणी

‘क्रिकेट टीम’ची कहाणी.

युद्ध हेच तिथलं वास्तव,

बंदूक हीच भाषा,

बचाव छावण्या हेच ‘घर’ आणि

‘खेळणार्‍यांचा’ दगडांनी ठेचून खून

हा इतिहास.


अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ?

कसा आहे तो? लिंबूटिंबू?.

कोण आहेत त्यांचे खेळाडू?

त्यांची नावं काय? त्यांचं वैशिष्ट्य काय?.

टी-२0 विश्‍वचषक स्पर्धेसाठी ते श्रीलंकेत दाखल होईपर्यंत आणि भारताविरुद्ध त्यांचा पहिला सामना होईपर्यंत कोणालाच त्यांच्याविषयी काहीच माहीत नव्हतं. आपणच काय, भारतीय खेळाडूही त्यांच्याविषयी अनभिज्ञच होते..

..विश्‍वचषकाच्या ‘सुपर एट’ संघांत त्यांना स्थान मिळालं नाही. ते अपेक्षितच होतं; पण याच लिंबूटिंबूंनी पहिल्याच सामन्यात भारतीय खेळाडूंचा घाम फोडला होता हे विसरून चालणार नाही..

खरं तर अनेक भारतीय खेळाडू त्यांचे आयकॉन आहेत आणि त्यांचा खेळ पाहता पाहताच ते मोठे झाले आहेत.

त्यांचा कर्णधार नवरोज मंगल. तो जाहीरपणे सांगतो. इंडियन प्लेअर्स को मैं दिलो जान से चाहता हॅँू.

त्यांचा विकेटकीपर मोहम्मद शेहजाद. तो तर स्वत:ला धोनीच समजतो. त्याचं नावही तो सांगतो ‘एमएस’. धोनीसारखंच. पाकिस्तान आणि भारतीय खेळाडूंचा खेळ पाहूनच आम्ही क्रिकेट शिकलोय, शिकतोय. असं तोही नम्रपणे सांगतो. अर्थातच आपल्याप्रमाणे तेही चाहते आहेत ते वंडरबॉय सचिन तेंडुलकरचे. या विश्‍वचषक स्पर्धेत सचिन नसल्याने ते नाराज होते; पण आता क्रिकेटच्या या देवाला भेटण्यासाठी ते आतुर आहेत. जीवनाची लढाई जिंकून आत्मविश्‍वासाने मैदानात उतरणार्‍या युवराज सिंगलाही ते सलाम करतात.

जिथे आजही केवळ बंदुकीचीच भाषा बोलली जाते, जिथे आजही सर्वसामान्य माणूस संगिनीच्या टोकावर उभा आहे आणि बचाव छावण्या हेच जिथल्या अनेक लोकांचं ‘घर’ होतं, पतंगीसारखा खेळ खेळला म्हणून जिथे भर चौकात दगडांनी ठेचून खून करण्याचा भयावह इतिहास आहे, तिथल्या तरुणांचा बंदुकीपासून ते बॅट-बॉलपर्यंतचा हा प्रवास निश्‍चितच थक्क करणारा आहे..

आतापर्यंत ‘पडदानशिन’ असलेल्या अफगानी खेळाडूंनी पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताच्या तोंडाला फेस आणला म्हणूनच नव्हे; पण कायम बंदुका आणि बॉम्बच्या दहशतीत, सहवासात राहिलेल्या या खेळाडूंच्या जिद्दीला सलाम म्हणूनही त्यांची दखल घेणे गरजेचे आहे.

युद्ध, युद्ध आणि युद्ध. गेली कित्येक वर्षे हेच अफगाणिस्तानचे वास्तव आहे. अनेक खेळाडू निर्वासित छावणीत वाढलेले आहेत. कुठलं मैदान, कुठलं साहित्य, कोण कोच आणि कोण आदर्श?. अनुभव हाच गुरू आणि आपल्यातला चांगला खेळणारा हाच आदर्श. वाळवंटाच्या तळपत्या मातीतल्या सरावानंच त्यांनी क्रिकेटची बाराखडी गिरवली. परदेश, आंतरराष्ट्रीय अनुभव. ही तर फार लांबची गोष्ट. तसा अनुभव त्यांना अगदीच नाही असं नाही; पण त्याचं प्रमाण अक्षरश: नगण्य.

विश्‍वचषकाच्या पात्रताफेरीचा त्यांचा अनुभवही विलक्षण होता.

पहिल्यांदाच अमेरिकेत, जर्सीला निघालेल्या या संघाला क्रिकेटपेक्षाही अधिक कुतुहल होतं ते परदेशात पहिलं पाऊल टाकण्याचं. आपल्याकडील गावचा माणूस जसा हरखून जातो, तशीच काहीशी अवस्था अमेरिकेच्या विमानतळावर या खेळाडूंची झाली होती. आश्‍चर्य आणि कुतुहलाच्या नजरेने त्यांचे डोळे विमानतळावरील दृश्य टिपत होते. भारत किंवा इतर नावाजलेल्या क्रिकेटपटूंप्रमाणे त्यांचे या ठिकाणी स्वागत होत नव्हते. तशी त्यांचीही अपेक्षा नव्हती. त्या ठिकाणी येणार्‍या इतर संघाच्या खेळाडूंशी प्रशिक्षक ताज मलिक यांनी स्वत:हून संवाद साधण्यास सुरुवात केली. ‘ए. हाऊ आर यू, वी आर फ्रॉम अफगाणिस्तान. यू आर फ्रॉम?.’ एखादे लहान मूल आनंदाच्या भरात बोलते तसे अभिमानाने ते सांगत होते, ‘वुई आर गोइंग टू प्ले क्रिकेट वर्ल्डकप. नाऊ टू जर्सी.’

हा संवाद साधत असतानाच काही युवतींना ही गोष्ट कळली आणि धावत येऊन फोटोसाठी अफगाणी क्रिकेटपटूंच्या त्या गळ्यात पडल्या. विमानतळावर मुलींबरोबर फोटो काढताना ते लाजून चूर झाले होते.

अमेरिकेत जर्सी शहरात पोहोचल्यानंतर, तथील चकाचक गाड्यांमध्ये बसल्यावर आणि तिथल्या गगनचुंबी इमारती मान वर करकरून बघताना त्यांचे डोळे दिपून गेले होते.

आपल्या देशातील र्मयादांचे ओझे दूर झाल्यावर काही दिवसांच्या स्वातंत्र्याचा पुरेपूर आनंद लुटत असताना आपली मोहीम मात्र ते विसरले नाहीत. विश्‍वकपसाठी झालेल्या पात्रताफेरीतील सामन्यास सुरुवात झाली. चकाचक मैदान आणि हिरवीगार खेळपट्टी पाहताना त्यांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद होता. याच ठिकाणी त्यांनी आपला क्रिकेटचा जलवा दाखविण्यास सुरुवात केली. गुलबदीनसारख्या गोलंदाजाने तर ७ धावांत ५ बळी घेऊन चमक दाखविली. अंतिम सामन्यात धडक मारल्यावर सामन्याच्या आदल्या रात्री एकही खेळाडू झोपलेला नव्हता. आपली आणि आपल्या देशाची वेगळी ओळख जगासमोर आणण्यासाठी हा सामना जिंकायचाच, या उमेदीनेच प्रत्येक जण मैदानात उतरला. विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी संघ होता जर्सी. घरचे मैदान मिळाल्यामुळे त्यांचे पारडे जड होते. जर्सीला पाठिंबा देण्यासाठी मैदान गर्दीने फुलून गेले होते; पण जर्सीच्या फलंदांजांची फळी मोडून काढत अफगाणींनी प्रेक्षकांना अस्वस्थ करण्यास सुरुवात केली. घडले ते अनपेक्षित आणि ऐतिहासिक. अफगाणिस्तानने विजय मिळविला, त्यांच्या हातात विश्‍वचषक स्पर्धेत पात्र झाल्याची ट्रॉफी होती.

ही किमया घडली कशी?

तालिबानी राजवटीमुळे अफगाणिस्तानमधील खेळांना सक्तीची बंदी होती. त्याचे परिणाम अफगाणिस्तान क्रिकेटला भोगायला लागले. अन्य आशियायी देशांप्रमाणे इथले क्रिकेट बहरले नाही. ब्रिटिशकाळात त्या ठिकाणी क्रिकेट खेळले जात असे. काबूल, जलालाबाद व कंदाहर ही शहरे तेथील क्रिकेटची उगमस्थाने मानली जातात. अफगाणिस्तानमध्ये पहिला क्रिकेट सामना खेळला गेला तो १८ फेब्रुवारी १८७९ रोजी. १९९0 मध्ये रशियन आक्रमणानंतर अनेक निर्वासित अफगाणिस्तान सोडून पाकिस्तानमध्ये आले व त्यांना तिथेच क्रिकेटची गोडी निर्माण लागली. याच काळात पाकिस्तान संघाने १९९२ चा विश्‍वचषकही जिंकला होता. त्याचाही प्रभाव अफगाण क्रिकेटवर पडला. कालांतराने निर्वासित अफगाणिस्तानमध्ये परतल्यावर त्यांनी स्वत:च्या देशाकरिता खेळणे चालू केले. १९९५ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची स्थापना झाली; परंतु तालिबानी प्रभावाखाली क्रिकेटची कोणतीच प्रगती झाली नाही. सन २000 मध्ये त्यांना आयसीसीचं सभासदत्व मिळालं. त्याच वर्षी आणि २00३ मध्ये त्यांनी पाकिस्तानचा दौरा केला. २00४ मध्ये आशियायी क्रिकेट परिषदेचं सभासदत्व त्यांना मिळालं.

सन २00६ पासून अफगाणिस्तान क्रिकेट संघाची खरी प्रगती चालू झाली. या वर्षी मिडल ईस्ट कपमध्ये ते उपविजेते ठरले. २00६ मध्ये मुंबईत झालेल्या एका सामन्यात त्यांनी एमसीसीच्या संघाला १७१ धावांनी पराभूत केले. झिम्बाब्वेमध्ये झालेल्या इंटरकाँटिनेंटल कपमध्ये खेळताना मुटारे येथे पहिल्याच आंतरराष्ट्रीय प्रथमश्रेणी सामन्यात त्यांनी झिम्बाब्वेचा पराभव केला. याशिवाय युनायटेड अरब एमिरेट्स संघालाही पराभवाचे पाणी चाखवले. २00९ मध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप पात्रता स्पर्धेमध्ये त्यांनी पाचवे स्थान मिळवले होते.