दारिद्रय़रेषेखालील लोकांनाच सबसिडीवरील अतिरिक्त तीन सिलिंडर्स
मुंबई। दि. ८ (विशेष प्रतिनिधी)
राज्यात सबसिडीवरील अतिरिक्त तीन गॅस सिलिंडर्स केवळ दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) ग्राहकांना मिळतील, असे जवळपास स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तसा निर्णय घेण्याचे ठरविले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सहा सिलिंडर्स हे प्रत्येकालाच सबसिडीवर मिळणार आहेत. तथापि, काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांनी आणखी तीन सिलिंडर्स अनुदानित दराने द्यावेत, असा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यानुसार सहानंतरचे तीन अतिरिक्त सिलिंडर्स अनुदानित दराने पण केवळ बीपीएल व्यक्तींनाच देण्याचे मुख्यमंत्री चव्हाण आणि वित्तमंत्री जयंत पाटील यांनी ठरविले असल्याचेही सूत्रांनी सांगितले. सिलिंडर सबसिडीबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
सगळ्यांनाच सबसिडीवर अतिरिक्त तीन सिलिंडर्स दिले, तर राज्याच्या तिजोरीवर वार्षिक २ हजार ४00 कोटी रुपयांचा बोजा पडला असता. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती बघता ते परवडणारे नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी घेतली असल्याचे सांगण्यात येते.

