- एकट्या पडलेल्या ‘तिचा’ केला जीवनसाथी म्हणून स्वीकार
दीपा पिल्ले। दि. ५ (पुणे)
त्याने ठरवून अनाथ आश्रमातील मुलीशी लग्न केले. लहानपणापासून कौटुंबिक सुखाला मुकलेल्या तिला नवरा, सासू, सासरे, नणंद यांच्या रुपाने परिवार मिळाला. आपले स्वप्न सत्यात उतरले आहे यावर विश्वास बसायच्या आधीच तिच्या पतीवर काळाने झडप घातली अन् कपाळावरचे कुंकू पुसल्याने नियतीने पुन्हा एकटेपणाच्या वळणावर आणून सोडले. मृत्यू झालेल्या आपल्या मित्राच्या पत्नीची ही परवड न पाहवल्याने त्याचा मित्र सरसावला आणि त्याने तिला ‘फ्रेंडशिप डे’ चा मुहूर्त साधून तिच्याशी लग्नगाठ बांधली.
आर. मुरली आणि वैदेही (नाव बदलले आहे) हे दोघे आज काही निवडक मित्र-मैत्रिणींच्या साक्षीने विवाहबद्ध झाले. आपल्या मित्राचे लग्न झाले याचा आनंद आणि त्याच्या निर्णयाचे कौतुक त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या चेहर्यावर दिसत होते. पण याच वेळेस त्यांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावलेल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात एकाच वेळेस आनंद आणि
दु:ख दोन्हीही तराळत होते. मुरली हा मूळचा बंगळूरूचा. हरीश हा त्याचा अगदी जानी दोस्त. हरीश सुरुवातीपासूनच सामाजिकतेचे भान राखणारा होता. ‘अनाथ आश्रमातील मुलीशीच लग्न करायचे,’ असे हरीशने आधीच ठरवले होते. त्याचा हा निर्णय त्याच्या घरचांना फारसा भावलेला नव्हता. मुरलीलाही हरीशचा हा निर्णय फारसा आवडला नव्हता, पण हरीशच्या निर्णयापुढे कुणाचे चालले नाही. हरीश ने वैदेहीशी रीतसर लग्न केले. वैदेहीच्या लाघवी स्वभावाने तिने हळूहळू सर्वांची मने जिंकली. वर्षभरातच हरीशला नोकरीनिमित्त पुण्यात यावे लागले. पुण्यात जणू त्या दोघांचे दुर्दैवच त्यांची वाट पाहत होतं. पुण्यात आल्यानंतर दोन अडीच वर्षांतच हरीशचा कर्करोगाने मृत्यू झाला. संसार, मुलं- बाळं ही स्वप्नं सत्यात उतरण्याआधीच वैदेही पुन्हा एकटी झाली होती.
हरीश आणि वैदेहीसाठी सर्वांचीच मने तुटत होती. वैदेहीसाठी काही
तरी केले पाहिजे, तिचे भविष्य
पुन्हा अधांतरित होऊ नये
यासाठी सगळे धडपडत होते. तिच्यासाठी नोकरी शोधणे, तिच्या भविष्याची सोय करावी यासाठी हरीशच्या घरचे, त्याचे मित्र सगळेच प्रयत्न करत होते. पण मुरली मात्र या सगळ्यापासून अलिप्त वेगळ्याच विचारात गढला होता.
एक दिवस त्याने हरीशच्या आई-बाबांना आणि त्याच्या मित्रांना घरी बोलावले आणि त्यांच्या समोर वैदेहीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्याच्या या प्रस्तावाने सर्व जण चक्रावले. मुरलीसारखा जीवनसाथी मिळाल्यामुळे वैदेहीला पुन्हा घर मिळणार होते. सोबती मिळणार
होती, या विचाराने हरीशच्या आई- बाबांनी मुरलीचा प्रस्ताव स्वीकारला होता. पण आता वैदेहीला दुसर्या लग्नासाठी तयार करणे हे सर्वांसमोरचे मोठे आव्हान होते.
एक-दीड वर्षांनंतर वैदेहीही या लग्नासाठी तयार झाली. मुरली
आणि त्याच्या मित्रांनी लग्नासाठी ‘फ्रेंडशिप डे’चा मुहूर्त निवडला.
आज पुण्यातील एका हॉटेलमध्ये छोट्याशा कार्यक्रमात वैदेही
आणि मुरली विवाहबद्ध झाले.
खर्या अर्थाने ‘फ्रंेडशिप डे’ला नवा अर्थ मिळाला.
मित्राची इच्छा पूर्ण करायची होती
एका अनाथ मुलीला कुटुंबाचे प्रेम मिळावे, तिच्या घर, संसाराचे स्वप्न पूर्ण व्हावे या इच्छेनेच हरीशने वैदेहीशी लग्नाचा निर्णय घेतला होता. पण त्याच्या जाण्याने वैदेही पुन्हा एकटी झाली होती. तिचा हा एकटेपणा दूर करण्यासाठी दुसरं लग्न हाच एक पर्याय मला सुचत होता. पण हरीशच्या वैेदेहीची जीवापाड काळजी घेणारा मुलगा शोधण्यापेक्षा मित्राची ही इच्छा आपणच पूर्ण करावी, या उद्देशाने मी हा निर्णय घेतला.
सात फेरे घेऊन जपल्या मित्राच्या स्मृती
लोकमत – सोम, ६ ऑगस्ट २०१२फोटो गॅलरी
क्रिकेट विषयावरचे टॉप १० सिनेमे
गुरु, २३ मे २०१३दोन पिढ्यांची एकच नायिका
बुध, २२ मे २०१३लोकमतमध्ये रणबीर-दीपिका
बुध, २२ मे २०१३आगामी...इश्क इन पॅरिस
बुध, २२ मे २०१३हे शतक हिरकणींचेच
मंगळ, २१ मे २०१३
