तुझ्याकडे किती कोब्रा आहेत,
तुझ्याकडे किती अजगर आहेत.
यावरून आजकाल सर्पमित्रांचे ‘वजन’ ठरते.
राज्यात सुमारे लाख-दीड लाख
सर्पमित्र असल्याचे सांगितले जाते.
प्रत्येकाकडे एकावेळी किमान आठ-दहा साप तरी सापडतीलच.
काय होते या सापांचे पुढे? त्यांच्यावर कुणाचा कंट्रोल आहे?.
- गजानन दिवाण
पाच-एक वर्षांपूर्वी गावात शाळेपुढे, चावडीत सापांना नाचविणारा गारूडी भेटायचा. आता तो दिसत नाही; पण सापांचा खेळ काही थांबला नाही. जे खेळ तेव्हा गारूडी करायचे, ते आता सर्पमित्र करतात. सारेच सर्पमित्र हे करतात, असेही नाही. दूध नासवण्यासाठी दही किती लागते? दुधात ते पडू नये, याची काळजी कोण घेणार? सर्वसामान्य नागरिक, स्वत: सर्पमित्र की वनविभाग?
राज्यात साधारणत: एक ते दीड लाख सर्पमित्र असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तशी कुठलीच अधिकृत आकडेवारी वनविभागाकडे नाही. ती कधी मिळणारही नाही. एखाद्या साहित्यिकाच्या घरात किती पुस्तके आहेत, ती कोणती आहेत यावरून त्याचे ज्येष्ठत्व ठरविले जाते. या सर्पमित्रांचे असेच काहीसे आहे. त्याच्याकडे किती कोब्रा आहेत, किती अजगर आहे यावरून त्याचे ‘वजन’ ठरते. अशा हौशी सर्पमित्रांची आकडेवारी पाहिल्यास साधारण प्रत्येकाच्या बंद कपाटात एकावेळी किमान दहा साप आढळतील. म्हणजे राज्यभरातील या सर्पमित्रांच्या घरी साधारण दहा लाख साप बंद अवस्थेत असतात. या सापांचे पुढे काय केले जाते, हा एक मोठा गूढ प्रश्न आहे. स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी असे साप जमा करणार्यांची संख्या मोठी आहे. त्याचे विष, कातडी आणि इतर अवयवांचा बाजार मांडणारेदेखील आहेत. ती संख्या अगदीच एखादी टक्का असावी, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. याचा अर्थ उर्वरित ९९ टक्के सर्पमित्रांची केवळ हौस सापांच्या जिवावर उठली आहे. लोकांची सापांपासून मुक्तता करायची, आपली हौस भागवायची आणि थोडीशी कमाईही करायची, असा हा सर्पमित्रांचा स्वार्थ आणि परमार्थ चालतो. एखाद्याच्या घरी साप निघाला की, सर्वात आधी कळते ते सर्पमित्राला. तो जाऊन या घराची सापातून मुक्तता करतो. आधी यासाठी सर्पमित्र पैसे घेत नसायचे. आता कोणी पेट्रोलचा खर्च म्हणून, तर कोणी इतर नावाखाली ठरल्या भावानुसार पैसे आकारतो. पकडलेला हा साप त्वरित जंगलात सोडायचा असतो. अनेक सर्पमित्र तसे करतातही. मात्र, आपल्या घरातील सर्पसंपत्तीत भर घालणार्यांची संख्यादेखील कमी नाही. यावर वनविभागाचे कुठलेही नियंत्रण नाही. राज्यभरातील सर्पमित्रांच्या घरी एकाचवेळी धाडी टाकल्या, तर सारेच घबाड बाहेर यायला वेळ लागणार नाही; पण हे करणार कोण?
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चार वर्षांपूर्वीची घटना. एका प्रसिद्ध सर्पमित्राच्या घरी वनविभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल ७00 प्रजाती आढळल्या. यात साप होते. सरडे होते. पालीही होत्या. या सार्यांचे तो काय करणार होता, हे अजून तरी बाहेर आले नाही. तो खटला सुरूच आहे. म्हणून त्याचे उद्योग थांबले असे नाही. भांडे घासून पोट भरणार्या आईच्या पोटी जन्मलेल्या या सर्पमित्राकडे सध्या कार आहे. महागडा प्रोजेक्टर आहे. लाखालाखांचे तीन कॅमेरे आहेत. साधारण २0 ते २५ लाखांची ही मालमत्ता. हा सर्पमित्र नागपुरात सध्या संशोधक म्हणून ताठ मानेने वावरत आहे. एवढा सारा पैसा आला तरी कोठून?
ठाण्यात अलीकडेच एका सर्पमित्राला ५0 लाखांच्या सापाच्या विषासह अटक करण्यात आली. अशीच कारवाई गेल्या काही महिन्यांत मुंबई, कोल्हापूर, नागपुरातही झाली.
अमरावतीच्याच छत्री तलावाजवळ एका सर्पमित्राची पानटपरी आहे. या पठ्ठय़ाने त्याच्या काऊंटरवरच साप ठेवला आहे. लोक कुतुहलापोटी येथे येतात आणि या पठ्ठय़ाचे गिर्हाईकही वाढवतात.
स्टंटबाजीचा कळस म्हणजे, येथील एका महाविद्यालयात गळ्यात धामण अडकावून फिरणारा महाभाग पोरा-पोरींना जमा करायचा. तक्रारी वाढल्याने त्याने हा प्रकार आता थांबविला आहे.
वरील काही उदारहणे चार टोकाची असली, तरी सर्पमित्रांनी राज्यभरात सापांचा बाजार कसा मांडला आहे, हे दाखविण्यास पुरेशी आहेत. यासाठी अमरावती जिल्ह्याचे उदाहरण बोलके ठरावे. १५ वर्षांपूर्वी जिल्ह्यात केवळ चार सर्पमित्र होते. आज ही संख्या सात हजारांच्या घरात आहे. वनविभागाकडे नोंद मात्र केवळ ४0 सर्पमित्रांची आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत कमी-जास्त प्रमाणात हीच स्थिती आहे. राज्यात नागपूर आणि वर्धा हे दोन जिल्हे या सापांच्या तस्करीचे मोठे अड्डे बनले आहेत. वर्धेत असाच एक सर्पमित्र २0 वर्षांपासून साप जमा करत आहे. येथे जातीनुसार सापाची किंमत ठरते; पण २0 वर्षांत त्याने कुठली माहिती जमा केली, जमा केलेल्या सापांचे पुढे काय केले हे काही तो सांगत नाही आणि त्याला विचारायलाही कोणी जात नाही. सर्पमित्रांनी संशोधनाच्या नावाखाली असा चालविलेला उद्योग वनविभागाच्या नजरेत कसा आला नाही, याचेच आश्चर्य आहे.
विषाच्या नावाखाली वेगळाच बाजार
सापाचे विष म्हणून वेगळेच काहीतरी विकण्याचे उद्योगदेखील सरूझाले आहेत. नशेसाठी, औषधासाठी अंधश्रद्धेपोटी हे विष घेतले जाते. सापाचे विष काढल्यानंतर त्याला एका विशिष्ट पद्धतीने ड्राय करावे लागते. यासाठी ३0 ते ४0 लाखांची मशिनरी लागते. राज्यात कुठल्या सर्पमित्राकडे ही मशिनरी असेल? त्यामुळे विषाच्या नावाखाली वेगळेच काही तरी गळी उतरविण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत.
सापांना धोका कशाचा?
- हौशी सर्पमित्रांचा
- विष तस्करीचा
- लिंग तस्करीचा
- त्वचा तस्करीचा
- अंधश्रद्धेच्या नावाखाली मांडलेल्या बाजाराचा
gajanandiwan@lokmat.com

