साप

सविता देव हरकरे

साप बाळगायचा?

- परवाना हवाच

कोणत्याही वन्यप्राण्याच्या प्रदर्शनाकरिता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (सीझेडए), भारत सरकार यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. सीझेडएचे नियम फार कठोर असून, त्यांच्या मापदंडांची पूर्तता केल्यानंतरच परवानगी मिळू शकते. साप फक्त प्राणिसंग्रहालयातच प्रदर्शित केले जाऊ शकतात.

शैक्षणिक किंवा संशोधन कार्यासाठी साप ठेवण्याची गरज असल्यास त्यांना त्या कामासाठी शासकीय परवाना देण्याची तरतूद आहे. त्यानुसार अनुसूची १ मधील साप असल्यास केंद्र व अनुसूची २ मधील सापांसाठी राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागेल; परंतु यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. परवान्यासाठी अर्ज करताना वर्षभराची योजना द्यावी लागेल. याशिवाय कुठले आणि किती साप ठेवणार, त्यांची आकडेवारी, त्यांना कसे आणि कुठे ठेवणार याबाबतची माहिती, सापांच्या आवासासंदर्भातील मापदंडांचे पालन, त्यांच्या खाण्याची व्यवस्था आदिंचा यात समावेश आहे. तसेच प्रत्येक महिन्याला वन्यजीव कार्यालयात यासंदर्भातील अहवाल सादर करावा लागेल. हा परवाना कुठल्याही एका व्यक्तीला नाही, तर वन्यजिवांसाठी काम करणार्‍या नोंदणीकृत संस्थेलाच मिळू शकेल आणि हा परवाना नसलेल्या व्यक्तीला साप बाळगण्याची परवानगी नाही. पुणे आणि मुंबईतील दोन संस्थांना असा परवाना देण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र वन्यजीव कायदा १९७५ मधील नियम २४(२) अंतर्गत ११ क्रमांकाचा अर्ज भरणे आवश्यक आहे.


सापांचे अवयव आणि त्यांचा व्यापार

जिवंत साप - (पाच हजार ते एक लाख रुपये)

अजगराची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १0,000 डॉलर (५ लाख रुपये) एवढी आहे. रेड सॅण्ड बोआ (दुतोंड्या/ मांडवळ) या जातीचा साप ३0 ते ५0 लाखांपर्यंत विकला जातो. दक्षिण-पूर्व आशियात या सापाची प्रचंड मागणी आहे. कॅन्सरवरील उपचारासाठी तो वापरला जातो. भारतात गुप्तधनाच्या शोधात तो उपयुक्त असल्याची अंधश्रद्धा आहे.

काही लोक साप खातात. विशेषत: आशियाई देशांमध्ये आणि बहुतांश आंतरराष्ट्रीय हॉटेल्समध्ये सापाच्या मांसापासून बनविलेले पदार्थ ‘विशेष व्यंजन’ म्हणून सादर केले जातात. काही छंदिष्टांना घरी साप पाळण्याचा शोक असतो. आपला हा छंद जोपासण्यासाठी ते वेगवेगळ्या सापांच्या शोधात असतात.

सापाची कातडी -(किंमत एक लाख रुपयांपर्यंत)

सापाच्या कातडीद्वारे निर्मित कोट, हॅण्डबॅग, पर्सेस, बूट, वॉलेट या वस्तूंना अमेरिका, युरोप, कॅनडा आणि चीनच्या बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. अजगर, घोणस, पट्टेरी मण्यार, धामण आणि राजनागाच्या कातडीला सर्वाधिक पसंती आहे. जगप्रसिद्ध डिझायनर्सद्वारे निर्मित अजगराच्या कातडीची बॅग म्हणजे सेलिब्रेटींची शान असते. याशिवाय अजगराच्या कातडीचे ज्ॉकेट, बेल्ट आणि स्कर्टस्ची फॅशन जोरात आहे आणि यासाठी लागणारे लाखो अजगर आणि इतर सापांचा पुरवठा भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, न्युझिलंड आणि फिलिपिन्स या देशांतून केला जातो. एकट्या युरोपमध्ये वर्षाला साडेतीन लाखांच्या वर अजगरांच्या कातडीची आयात केली जाते.

सापाचे विष - (किंमत १५00 ते २000 डॉलर प्रतिग्रॅम म्हणजेच ७५ हजार ते १ लाख रुपये)

सापांच्या अवयवांमध्ये त्याचे विष सर्वाधिक मौल्यवान आहे. प्रतिस्पर्शविषाशिवाय विविध प्रकारच्या औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. कॅन्सर, एचआयव्ही/एड्स आणि मधुमेहासारख्या आजारांवर नियंत्रणासाठीच्या औषधनिर्मितीतही ते उपयुक्त ठरत आहे. सापाच्या विषातील एक विशिष्ट प्रकारचा घटक कॅन्सरचे मूळ मानले जाणारा ट्युमर रोखू शकतो, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. त्यामुळे जगभरातील अनेक प्रयोगशाळांमध्ये सापांच्या विविध प्रजातींच्या विषावर मोठय़ा प्रमाणात प्रयोग सुरू आहेत. विशेषत: चीनमध्ये अनेक पारंपरिक औषधांमध्ये या विषाचा वापर होतो.

त्यासाठी त्यांना विषाची गरज भासते. मादकद्रव्याची तस्करी करणारे माफिया सापाच्या विषाचीही प्रचंड तस्करी करीत आहेत. केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातच नाही, तर देशांतर्गतही मादकद्रव्याच्या निर्मितीत सर्पविषाचा सर्रास वापर होत आहे.

कायदा काय म्हणतो?

बहुतेक साप हे वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मधील अनुसूची १, २ आणि ४ मध्ये समाविष्ट असल्याने सापांना पकडणे हा गुन्हा आहे.

अनुसूची १ - मगर, इंडियन एग इटर (अंडेखाऊ साप) आणि अजगर यांचा समावेश आहे.

अनुसूची २ - चेकट, किलबॅक स्नेक, कोब्रा, किंग कोब्रा, वॉटर स्नेक, रसेल्स वायपर

याव्यतिरिक्त सर्व प्रकारचे साप हे अनुसूची ४ मध्ये येतात. या अधिनियमात अनुसूचीत नमूद प्रजातींची शिकार, व्यापार, हस्तांतरण, संशोधन या सर्व बाबींचे नियमन विविध तरतुदींद्वारे केले गेले आहे.

शिक्षा आणि दंड

अनुसूची १ व २ चे वन्य प्राणी असल्यास किमान तीन वर्षे किंवा तीन ते सात वर्षांचा कारावास आणि २५ हजार रुपये दंड.

इतर अनुसूचीमधील वन्यप्राण्यासंबंधी गुन्हा झाला असल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास, दहा हजार रुपये दंड अथवा दोन्ही.

गुन्ह्यात मदत करणार्‍या व्यक्तीसही गुन्हेगार समजले जाते.

सर्पमित्रांचे अधिकार

शेती हे सापांचे नैसर्गिक आश्रयस्थान; पण शहरीकरण वाढले, शेतींचे रूपांतर नागरी वस्त्यांमध्ये झाले आणि त्यांचे हे आश्रयस्थान धोक्यात आले. मानव सापांच्या घरात गेल्याने साप जास्त दिसायला लागले आणि यासोबतच सर्पमित्र चळवळीचा जन्म झाला. १0 ते १५ वर्षांपूर्वी सर्पमित्र चळवळ सुरू झाली तेव्हा यात मोजकेच सर्पमित्र होते. कालांतराने त्यांची संख्या वाढली.

शहरी आणि ग्रामीण भागात अनेक सर्पमित्र आपल्या जिवाची पर्वा न करता सापांचा जीव वाचवून त्यांना जंगलात सोडण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत.

वन्यजीव आणि मानव यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे ‘संयुक्त वन्यजीव व्यवस्थापन’ ही संकल्पना अस्तित्वात आली. सर्पमित्र हा त्याचाच एक भाग आहे.

सर्पमित्रांनी साप आणि मानवाची संकटातून सुखरूप सुटका करावी आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करावे. याशिवाय सापांविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे कार्य करावे, अशी अपेक्षा आहे. ही एक समाजसेवा असून, स्वेच्छेने करायची असेल त्यांनीच यात यावे, अशी वनविभागाची भूमिका आहे.

वन्यजीव कायद्यात सर्पमित्राला कुठलेही अधिकार देण्यात आलेले नाहीत. साप पकडल्यानंतर तो वनविभागाच्या सुपूर्द करणे एवढेच त्यांना करायचे आहे. बरेचदा ते शक्य होत नाही. त्यामुळे ४८ तासांच्या आत तो जंगलात सोडण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे.

सर्पमित्रांना ओळखपत्र अथवा परवाना देण्याची तरतूद कायद्यात नाही. २00५-0६ मध्ये तत्कालीन वनमंत्र्यांनी सर्पमित्रांना ओळखपत्र देण्याची सूचना केली होती. त्यानुसार राज्यात काही मोजक्याच ठिकाणी एक वर्षाकरिता अशाप्रकारचे ओळखपत्र देण्यात आले होते.

सापांच्या संदर्भात वाढते गैरप्रकार लक्षात घेऊन सर्पमित्रांना ओळखपत्र देण्याचा नवा प्रस्ताव पुढे आला आहे. एका वॉर्डात दोनच सर्पमित्र असावेत आणि तेसुद्धा प्रशिक्षित अशी सूचना या प्रस्तावात करण्यात आली आहे.

निष्ठुरपणे संपवितात साप

सापांचे विष काढताना त्यांच्यावर अतोनात अत्याचार केले जातात. त्याच्या दातांना गंभीर इजा होऊन बरेचदा तो मृत्युमुखी पडतो. विषग्रंथी या सापाला मिळालेली मोठी देण आहे. सापाचे विष म्हणजे एक प्रकारची लाळ असून, त्यात अनेक प्रकारची प्रथिने आहेत. साप शिकार करण्यासाठी अथवा आत्मरक्षणाकरिता त्याचा वापर करीत असतो.

त्याचप्रमाणे त्याची कातडी काढण्याची पद्धतही अत्यंत निष्ठुर आहे. सर्वप्रथम जिवंत सापाला झाडाच्या खोडाला लटकवून ताणून खिळे ठोकले जातात. एका बाजूने चिरा पाडून कातडी बाजूला केली जाते. तिला मीठ चोळून वाळविले जाते. अनेकदा यासाठी रसायनांचाही वापर होतो. अशा पद्धतीने चामडे तयार होते. कातडी काढल्यानंतर तो साप दोन ते तीन दिवस जिवंत असतो. त्यामुळे त्याला प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात.