ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १७ - मंदीच्या गर्तेत भरडत असलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूने बाजारात रोखतेचे प्रमाण वाढावे यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी सीआरआर अर्थात रोख राखीव गुणोत्तरात (बँकांना रिझर्व्ह बँकेकडे ठेवावी लागणारी किमान रक्कम)पाव टक्के (०.२५) कपात केली. मात्र, हे करत असतानाच, चलनवाढीचे चढते प्रमाण ध्यानात घेऊन महत्त्वाच्या व्याजदरांत कोणतेही बदल केले नाहीत.
रिझर्व्ह बँकेने सोमवारी आपले मध्य तिमाही धोरण जाहीर करत असताना सीआरआरमध्ये केलेल्या कपातीमुळे सीआरआरचे नवे प्रमाण ४.५ टक्के झाले आहे. या कपातीमुळे अर्थव्यवस्थेत १७ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होईल.
मात्र, ज्या दराने रिझर्व्ह बँकेकडून अन्य बँकांना वित्तपुरवठा केला जातो, त्या दरात (रेपो दर) कोणताही बदल न करता हा दर ८ टक्के कायम ठेवला. त्याशिवाय रिझर्व्ह बँक या बँकांकडून ज्या दराने ठेवी घेते, तो दर (रिव्हर्स रेपो) ७ टक्के कायम ठेवला.
सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या विविध धोरणांचा सकारात्मक परिणाम विकासावर होईल, असे मतही बँकेने व्यक्त केले. सध्या अर्थव्यवस्थेसमोर चलनवाढीचे संकट आहे. या चलनवाढीला आळा घालणे हाच सध्याच्या आर्थिकनीतीचे महत्त्वाचा हेतू आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी मध्य-तिमाही पतधोरण जाहीर करताना सांगितले.
सीआरआरमधील ही कपात २२ सप्टेंबरपासून लागू होईल. या कपातीचा लाभ बँकांना होण्याची अपेक्षा असून या कपातीमुळे बँकांना त्यांचे कर्जावरील व्याजदर कमी करता येतील. त्या माध्यमातून गुंतवणूक व पर्यायाने आर्थिक वाढीला चालना मिळेल, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
रिझर्व्ह बँकेने केलेली ही कृती अत्यंत सकारात्मक अशीच असून अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर घसरू लागला असल्याची दखल घेऊन त्यानुसार केलेली ही उपाययोजना आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून देशात गुंतवणुकीला पोषक वातावरण नाही असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, सरकारने जाहीर केलेले धोरण आणि रिझर्व्ह बँकेचे नवे पतधोरण यामुळे हे चित्र पुसण्यास मदतच होईल, असेही मत व्यक्त केले जाऊ लागले आहे. डिझेलवरील अनुदानामुळे सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणात तूट निर्माण होत होती. त्यामुळे डिझेलचे दर वाढवावेत, ही रिझर्व्ह बँकेची मागणी सरकारने मान्य तर केलीच पण जोडीला विविध क्षेत्रांत परकीय गुंतवणुकीसाठी दारेही खुले केली.

