सुगरण

अरण्यात.- बैजू पाटील

सुगरण पक्ष्याची दोन छायाचित्रे इथे दिली आहेत. एका छायाचित्रात एकाच फांदीवरची तीन घरटी आणि ती घरटी तयार करणारे तीन नर सुगरणपक्षी दिसताहेत. तर दुसर्‍या छायाचित्रात घरट्यातून बाहेर पडून पंख पसरून उडायच्या तयारीत असलेला नर सुगरणपक्षी दिसतो आहे. या छायाचित्रांवरून नर सुगरणपक्ष्याचा आकार, रंगसंगती व त्याच्या देहयष्टीची कल्पना येते. डोक्याचा, गळ्याचा, छातीचा रंग पिवळा चमकदार असतो. हे त्या नर पक्ष्याची पूर्ण वाढ झाली आहे आणि तो प्रजननक्षम आहे हे दर्शविते. पिवळा रंग फिक्का, अस्पष्ट असेल तर तो नर पक्षी अजून प्रजननक्षम अवस्थेत पोहोचलेला नाही हे कळते. नर सुगरण पक्ष्याचा आकार साधारण पंधरा सेंटिमीटर इतका असतो. मादी त्यामानाने लहान असते आणि करड्या-पांढुरक्या रंगाची असते. चिमणीसारखी. तीत पिवळा रंग नसतो.

नर सुगरणपक्षी ‘अँडल्ट’ झाला म्हणजे प्रजननक्षम झाला की, तो घरटे बांधायची मोहीम सुरू करतो. त्यादरम्यान तो मादीलाही साद घालत असतो. प्रणयोत्सुक मादी या नराचे घरटे विणण्याचे कौशल्य पाहते. तयार होत असलेल्या त्या घरट्याचे निरीक्षण करते. ते तिला पसंत पडले तरच ती त्या नराचा स्वीकार करते. त्यांच्या मीलनानंतर मादी घरट्यात सरासरी दोन अंडी घालते. तत्पूर्वी त्या घरट्याचे सारे ‘इंटिरियर’ म्हणजे घरट्याची आतील रचना, आकार, लांबी-रुंदी, बिछायत इत्यादीवर ती स्वत: जातीने लक्ष घालते. तिला हव्या असल्यास त्यात ती स्वत: काही सुधारणाही करते. अशा प्रकारे घरट्याचे ‘इंटिरियर’ तिच्या मनासारखे झाले की अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम साधारण पंधरा दिवस करते. मग त्यातून पिलू बाहेर पडते. पिल्लांना दाणापाणी देण्याचं, भरवण्याचं काम त्यापुढील पंधरा दिवस चालते. त्यादरम्यान पिल्लांची वाढ पूर्ण होते. त्यांचे पंख विकसित होतात. त्यात बळ येते आणि पिल्ले स्वतंत्रपणे उडू लागतात. त्यानंतर ती त्याच घरट्यात राहतात किंवा इतरत्र उडून जातात, स्वतंत्रपणे राहू लागतात. त्यांच्या मर्जीनुसार!

असा हा सुगरणपक्ष्याचा जीवनक्रम निसर्गाने आखून दिलेला आहे. बर्‍याचदा मादीस घरटे पसंत पडत नाही. ती त्या नर सुगरणपक्ष्याला स्वीकारत नाही. अशावेळी व्यथित होऊन तो नर आपले तयार होत असलेले घरटे स्वत:च नष्ट करतो आणि पुन्हा नव्याने दुसरे अधिक सुबक, अधिक चांगले घरटे बांधायला सुरुवात करतो. नव्याने नव्या मादीस आमंत्रित करण्यासाठी साद घालतो! एक घरटे तयार करण्यासाठी एका नर सुगरणपक्ष्यास किमान पाचशे वेळा चकरा माराव्या लागतात असे पक्षीनिरीक्षक, पक्षीअभ्यासक यांना आढळून आले आहे. पाचशे वेळा भरारी घ्यायची. मिळेल तिथून घरटे विणण्यासाठी वेलीपानांचे, गवताचे धागे आणायचे आणि वरून खाली घरटे विणत आणायचे. त्यातला सर्वात अवघड आणि महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे घरट्याची मुख्य गाठ अगोदर बांधून घेणे. हे घराचा पाया भरावा किंवा कॉलमस्ट्रक्चर उभे करावे तसे काहीसे असते. ही मुख्य गाठ एकदा मनासारखी मारता आली की, उर्वरित घरटे विणण्याचे काम नर सुगरण मोठय़ा उत्साहाने वेगाने करीत जातो. घरटे विणण्यातील त्याची चपळाई, त्याच्या कुशल हालचाली आणि त्याची तन्मयता हे सगळे खरोखरच मोठे पाहण्यासारखे असते. हे घरटे शक्यतो जलाशय, विहिरी, पाणथळ जागा इथे असलेल्या झाडाच्या एखाद्या वाकड्या फांदीवर, डहाळीवर विणले जाते. म्हणजे साप, अन्य शिकारी पक्षी व शत्रूंपासून घरटे, आतील अंडी, पिल्ली सुरक्षित राहावीत. वार्‍याचा वेग आणि दिशा, पावसाचा वेग आणि दिशा याचीही एक उपजतच जाण निसर्गाने या नर सुगरणपक्ष्याला दिलेली आहे. त्यानुसार तो घरट्याची ‘साइट’ ठरवतो. मानवी हातांना किंवा कुठल्याही मशीनला या सुगरणपक्ष्यासारखे सुबक, सुरक्षित आणि इतके छानदार घरटे विणता येणार नाही! घरटे विणण्याचे कसब निसर्गाने अनेक पक्ष्यांना दिले आहे; परंतु त्यातही ‘बाया सुगरण’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या आणि सर्वत्र आढळणार्‍या या पक्ष्याचे घरटे विणण्याचे कसब खरोखरच अजोड आहे. सुगरण पक्ष्याचे हे फोटो जायकवाडी जलाशयाकाठच्या काटेरी झाडांवरचे आहेत. सुगरण पक्ष्याचे शास्त्रीय नाव स्र’ूी४२ स्रँ्र’्रस्र्रल्ल४२ असे आहे. त्याला स्थानिक भाषांतून सोनचिरी (हिंदी), टोकोरोचोराय (असमी), बायचिडिया (उर्दू), बाबुई (बांगला), धुकानननकुरुवी (तामिळ), गिज्जीगाडू (तेलगू) असे म्हटले जाते. पक्षीसृष्टीतील स्र’ूी्रंीि या कुळात हा पक्षी मोडतो. रंगरूप, आकार, इत्यादीनुसार त्याच्या अनेक जाती, उपजाती आहेत. मराठी भाषेत उत्तम स्वयंपाक करणार्‍या स्त्रीस सुगरण म्हटले जाते. परंतु केवळ पाककलेपुरताच त्याचा अर्थ र्मयादित नसावा, तर घराचे इंटिरियर’ अर्थात गृहसजावट, अपत्यसंगोपन आणि एकूणच सर्व प्रापंचिक जबाबदार्‍या मोठय़ा कुशलतेने हाताळणारी स्त्री म्हणजे सुगरण असे म्हटले पाहिजे. अशी स्त्री बायको म्हणून मिळणे हे या ‘बाया सुगरण’ पक्ष्यासारखेच दुर्मिळ आहे म्हणतात - फरक एवढाच की पक्ष्यांमध्ये नर सुगरण असतो!

शब्दांकन- सुधीर सेवेकर