सेन्सेक्सची ५०० अंकांची उसळी

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २१ - केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे धोरण कायम ठेवणार असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी जाहीर केले आणि केंद्र सरकारच्या स्थिरतेला कोणताही धोका नाही, हे दिसून आलेल्या मुंबई शेअर बाजारात प्रचंड उत्साह संचारला. सेन्सेक्सने तब्बल ५०० अंकांची झेप घेऊन सपाच्या या निर्णयाचे स्वागत केले. उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक अर्थात निफ्टीनेही जबरदस्त १५० अंकांची वाढ नोंदवली. रुपयाच्या किमतीने वाढ नोंदवून त्याची किंमत प्रति डॉलर ५३.५०पैसे झाली. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास सेन्सेक्स ५१५ अंकांनी वाढला होता तर निफ्टी १६४ अंकांनी वाढला होता.

त्या आधी किरकोळ व्यापार क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याची अधिसूचना सरकारने जारी केल्याचा सकारात्मक परिणाम शुक्रवारी सकाळी मुंबई शेअर बाजारात दिसून आला आणि सेन्सेक्समध्ये तब्बल १४९ अंकांची वाढ झाली. मोठ्या प्रमाणावर वित्तसंस्था आणि किरकोळ गुंतवणुकदारांनी केलेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स वधारून १८ हजार ४९८वर पोहोचला.

राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक अर्थात निफ्टीतही ४७.९५ अंकांची वाढ होऊन तो ५ हजार ६०२.०२वर पोहोचला.

आशियायी बाजारांत सकारात्मक वातावरणाचा परिणामही मुंबई शेअर बाजारात दिसून आला.