सेन्सेक्स स्थिर!

स्टेट बँकेची घसरण

मुंबई। दि.१0 (प्रतिनिधी)
व्यावसायिक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांनी सावध व्यवहार केल्याने आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तीन अंकांनी घसरून १७,५५७.७४ अंकावर बंद झाला.
कंपन्यांच्या निराशाजनक वित्तीय परिणामांमुळे गुंतवणूकदारांनी सावध धोरण स्वीकारले. त्याचबरोबर स्टेट बँकेच्या थकीत कर्जाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने स्टेट बँकेचा शेअर ४ टक्क्यांनी घसरला.
व्यावसायिक सत्रात सेन्सेक्स १७,४७१.३७ ते १७,५९0.६१
अंकांच्या दरम्यान फिरत राहिला
आणि शेवटी ३.१३ अंकांची घसरण होऊन १७,५५७.७४ अंकावर बंद झाला. बीएसईप्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा ‘निफ्टी’सुद्धा २.५५ अंकांनी घसरून ५.३२0.४0 अंकावर आला. यापूर्वी दोन व्यावसायिक सत्रात सेन्सेक्स ४१ अंकांनी घसरला होता. स्टेट बँक आणि सनफार्मा यांचे वित्तीय परिणाम समाधानकारक होते. असे असूनही जागतिक बाजारातील मंदीमुळे काही काळ गुंतवणूकदारांनी विक्रीचे धोरण स्वीकारले. आयटी आणि तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या शेअर्समध्ये वृद्धी नोंदली गेली; पण टिकाऊ ग्राहकोपयोगी सामान, वाहन, बँका यांच्या शेअर्समध्ये विक्रीचे प्रमाण वाढले.