स्टीव्ह जॉब्स यांच्या घरी चोरी होते तेव्हा..

सॅनफ्रान्सिस्को। दि. १५ (वृत्तसंस्था)
चोराने कुठे चोरी करावी याचे काही निकष नसतात. पण बंगला जितका आकर्षक आणि श्रीमंती थाटाचा तेवढा हात जास्त मारता येतो. त्यातही जर बंगला रिकामा असला तर मग पर्वणीच. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना भागात असेच एका चोराचे भाग्य फळफळले आणि ज्या घरात त्याने डल्ला मारला त्या घरातून त्याने तब्बल ६0 हजार डॉलर किमतीचे कॉम्प्युटर लंपास केले. तीन दिवसांत अटक झाल्यावर त्याला उलगडा झाला की, आपण ज्याच्या घरी चोरी केली त्या घर मालकाचे नाव स्टीव्ह जॉब्स असे आहे.
स्टीव्ह जॉब्स... कॉम्प्युटरच्या माध्यमातून प्रतिमासृष्टी निर्माण करणारे सर्जनशील व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तेथून काही काळासाठी मुक्काम हलविला होता. मात्र पुन्हा जुन्या घरी परतण्यापूर्वी घराचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू केले होते. या काळात अर्थातच रात्रीच्यावेळी घर बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मॅक्फर्लिन नावाच्या एका चोराने संधी साधत गेल्या आठवड्यात त्यांच्या घरी चोरी केली. विशेषत: स्टीव्ह यांच्या बेडरूममध्ये गेल्यावर तर त्याला वेगवेगळ्य़ा प्रकारचे आणि आकाराचे कॉम्प्युटर दिसले. स्वाभाविकच मोह न आवरल्याने जमेल तितके कॉम्प्युटर त्यांनी गुंडाळले. दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा चोरीची घटना आजूबाजूच्या लोकांना कळली तेव्हा तेथील पोलीस स्टेशनला किमान २00-२५0 फोन कॉल्स गेले. या घटनेमुळे पोलीसही तातडीने कामाला लागले आणि अक्षरश: ४८ तासांत चोराला ताब्यात घेतले.
येत्या २0 ऑगस्ट रोजी याप्रकरणी कोर्टात सुनावणी होणार आहे. चोराने कबुलीजबाब दिला असला, तरी मुद्देमाल हस्तगत व्हायचा आहे. तो झाल्यानंतर आणि पोलिसांनी
गुन्हा सिद्ध केल्यानंतर त्याला शिक्षा होईल. ही शिक्षा कमीत कमी
८ वर्षांची असेल.

हे घर जॉब्स यांचे होते, याची मला कल्पना नव्हती. त्या घरात गेल्यावर एवढे कॉम्प्युटर पाहिल्यावर आपण एखाद्या फॅक्टरीत आलो की काय, असेच वाटले. चोरी केल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळीच त्यातील किमान २0 टक्के कॉम्प्युटर मी बाजारात विकले. मात्र चोरबाजारात गेल्यानंतर मुद्देमालाची किंमत ६0 हजार डॉलरपर्यंत असल्याचे समजले. नशीब फळफळल्याचाच आनंद झाला..
- मॅक्फर्लिन,
जॉब्स यांच्या घरी चोरी केलेला चोर