स्फूर्तिस्थान

पीटर हेन्री इर्मसन / ब्रिटिश - १८५६-१९३६

भिंगलीला

- सतीश पाकणीकर

प्रकाशचित्रण कलेतील टॅल्बो टाइप प्रोसेसचा उदय आणि पीटर हेन्री इर्मसनचा प्रकाशचित्रणात प्रवेश या एकाच काळात घडलेल्या घटना. १८५६ मध्ये क्यूबा येथे जन्मलेल्या आणि अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या पीटर इर्मसनने १८७९ मध्ये म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी वैद्यकीय शास्त्रातील पदवी घेतली. केंब्रिज येथील क्लेअर कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेऊन लंडन येथील किंग्ज कॉलेज हॉस्पिटल येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कामास सुरुवात केली. स्पर्धात्मक परीक्षा पास होऊन ही महत्त्वाची जागा त्याला लाभली होती. त्याचा एक मित्र ए. टी. इव्हान्स हा पक्षीनिरीक्षक होता. त्याच्या प्रकल्पाला मदत करण्यासाठी तयार असलेल्या इर्मसनने १८८२ मध्ये पहिल्यांदाच कॅमेरा हातात घेतला. काही दिवस त्या यंत्रावर काम केल्यावर इर्मसन पूर्णपणे प्रकाशचित्रकलेकडे आकर्षिला गेला. त्याचा ध्यास इतका विलक्षण होता की, कॅमेरा क्लब ऑफ लंडनची स्थापना करण्यात पुढाकार घेत असतानाच पुढच्या वर्षी कौन्सिल ऑफ द फोटोग्राफिक सोसायटीवर त्याची निवड करण्यात आली. या घटनेने त्याच्या आयुष्याने वेगळेच वळण घेतले. वैद्यकीय व्यवसाय पूर्णपणे सोडून इर्मसन प्रकाशचित्रण करू लागला. अत्यंत बुद्धिवान, सुशिक्षित आणि धनवान असलेल्या पीटर इर्मसनने प्रकाशचित्रणातही त्याच्या गुणांनी अद्वितीय ऊर्जा संक्रमित केली. नुसते प्रकाशचित्रणच नव्हे तर लेखन, बिलियर्डस् - नौकानयन अशा अर्धा डझन तरी खेळात त्याने त्याचे प्रावीण्य दाखवून दिले.

त्या काळातील प्रकाशचित्रकार जुन्या चित्रकारांच्या पौराणिक व गूढरम्य चित्रांचे अनुकरण करण्यात धन्यता मानत असतानाच, १८८६ च्या सुमारास पीटर हेन्री इर्मसन या तार्‍याचा उदय झालेला होता. त्याने टिपलेल्या प्रकाशचित्रांमध्ये त्याची सौंदर्यदृष्टी त्याचे लिखाण आणि वर्तन यांचा सुंदर मिलाफ प्रत्ययास येऊ लागला होता. प्रकाशचित्रकलेविषयी असलेल्या ठाम मतांच्या आधारे इर्मसनने लिखाण, व्याख्याने, प्रदर्शनांचे आयोजन आणि परीक्षण व सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत: टिपलेल्या अप्रतिम प्रकाशचित्रांचे प्रकाशन करण्याचा धडाकाच लावला.

त्यावेळी प्रकाशचित्रणात आघाडीवर असलेल्या हेन्री रॉबिन्सन या फॅशन फोटोग्राफरवर इर्मसनने टीकेची तोफ डागली. रॉबिन्सनच्या प्रकाशचित्रात असलेला कृत्रिमपणा आणि अनेक निगेटिव्हज्चा वापर करून निर्माण केल्या जाणार्‍या प्रकाशचित्रांवर इर्मसनने परखड टीकास्र सोडले. स्वत: इर्मसन अशा तंत्राच्या, अगदी पिंट्रस्वरील ‘रिटचिंगच्याही’ विरोधात असल्याने त्याने प्रकाशचित्रणाचा सहजगत्या होणारा आविष्कार आणि त्यातील विशुद्धपणा जपण्यास महत्त्व दिले होते. ‘नॅचरॅलिस्टिक फोटोग्राफी’ या त्याच्या १८८९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पहिल्या प्रकाशनामधून त्याने या गोष्टीचा ध्यास प्रेक्षकांसमोर मांडला होता. इर्मसनच्या मते नैसर्गिक घडणार्‍या घटनेला संवेदनशील व अचूक प्रतिसादाने अभिव्यक्त करणे हेच उत्तम कलेचे र्मम असते. चित्रकलेमध्ये रंगांचा प्रभाव असेल; पण फक्त कृष्णधवल प्रकाशचित्रणाच्या त्या काळात रेषा व छटा यांतील सौंदर्यखेळ हा एकमेवाद्वितीय आणि अजोड असाच आहे, ही इर्मसनची पक्की धारणा होती. त्याचा तो जोरदार पुरस्कर्ताही होता. १८८५ ते १८८८ या दरम्यान त्याच्या प्रकाशचित्रांवर आधारित प्रकाशनांमधून, पुस्तकांमधून त्याने पूर्व अँँग्लियन शेतकरी जीवनावरच प्रामुख्याने भर दिलेला होता. असे असेल तरीही त्या काळातील सर्वोत्तम ‘डॉक्युमेंटरी’ प्रकाशचित्रकार म्हणून इतिहासाने त्याची नोंद घेतली आहे, ती केवळ त्याच्या प्रकाशचित्रांतील स्वाभाविकतेसाठीच.

‘लाइफ अँण्ड लँडस्केप्स् ऑन द् नोरफोल्क ब्रॉडस्’ (१८८६), ‘पिक्चर्स फ्रॉम लाइफ इन फिल्ड अँण्ड फेन’ (१८८७), ‘इडिल्स ऑफ द नॉरफोल्क ब्रॉडस्’ (१८९४) व ‘पिक्चर्स ऑफ ईस्ट अँँग्लिअन लाइफ’ (१८८८) या चारही संग्रहांमधून इर्मसनची ही स्वाभाविक व संवेदनशील शैली आपल्या प्रत्ययाला येते. अमूर्त शैलीतल्या ‘गनर वर्किंग अप टू फाउल’ या त्याच्या प्रकाशचित्रात मुख्य विषय असलेला ‘गनर’ हा तर अदृश्यच झालेला वाटतो आणि त्याच्या होडीचा सुंदर आकार हा दोन मितींच्या अवकाशात आणि करड्या रंगांच्या मोजक्याच छटांमध्ये आपल्याला एका वेगळ्याच गूढ वातावरणात घेऊन जातो. अशा प्रकारची ‘डार्क शेड’ असलेली त्याची शैली ही पुढे ‘फोटो सेसेशनिस्ट’ या गटाची मध्यवर्ती शैली म्हणून पुढे आली.

निसर्ग हा पीटर इर्मसनच्या प्रकाशचित्रण छंदाचा गाभा होता. १८८६ मध्ये लंडन कॅमेरा क्लबच्या सदस्यांपुढे त्याने एक व्याख्यान दिले. विषय होता - ‘फोटोग्राफी अ पिक्टोरिअल आर्ट.’ या व्याख्यानात तो म्हणतो - ‘‘प्रकाशचित्रकला ही शास्त्रावर आधारित कलेची उपपत्ती आहे. मानवाच्या डोळ्याला निसर्ग जसा दृष्टीस पडतो त्याचेच प्रतिबिंब हे प्रकाशचित्रात पडायला हवे.’’ त्याच्या पुस्तकात त्याने म्हणून ठेवले आहे की - ‘‘निसर्गात कोणत्याच वस्तूला करकरीत र्मयादरेषा नाही. तर प्रत्येक वस्तू ही दुसर्‍या कोणत्या वस्तूच्या पार्श्‍वभूमीवर दिसत असते आणि त्याच्या र्मयादरेषा एकमेकांत अत्यंत सहजतेने आणि हळुवारपणे मिसळून जात असतात. त्या इतक्या हळुवार मिसळतात की एक संपते कुठे अन् दुसरी सुरू कुठे होते हे आपल्या दृष्टीस कळू शकत नाही. या अशा हरवाहरवीमध्ये आणि अनिश्‍चिततेमध्येच निसर्गाचे सगळे चैतन्य आणि गूढरम्यता, रहस्य सामावलेले आहे.’’

हाच धागा पकडत जेव्हा इर्मसन ‘गॅदरिंग वॉटर लिलिज्’ हे निगेटिव्हवरून पिंट्र केलेले पहिलेच प्रकाशचित्र टिपतो तेव्हा ते प्रकाशचित्रणकलेतील अशा प्रकारच्या प्रकाशचित्रांचा प्रारंभच ठरतं आणि इर्मसनच्या शास्त्राधारित कलेच्या उपपत्तीचे एक सुंदर उदाहरणही.

स्वत: डॉक्टर असल्यामुळे त्या काळातील ऑप्टिक्सच्या शाखांचा अभ्यास करून इर्मसनने अजून एक प्रयोग केला. आपला डोळा आपण जेव्हा एखाद्या वस्तूवर केंद्रित (फोकस) करतो तेव्हा त्याच्या मागच्या व पुढय़ातल्या गोष्टी या धूसर दिसू लागतात. जिथे दृष्टी स्थिर आहे तोच भाग आपल्याला ‘शार्प’ दिसतो. हे तंत्र वापरून इर्मसनने प्रकाशचित्रण केले. आणि त्या काळातील सुस्थापितांविरुद्ध जाऊन त्याने हा प्रयोग निर्धाराने मांडण्याचे धैर्यही दाखवले.

१८८९ मध्ये ‘नॅचरॅलिस्टिक फोटोग्राफी फॉर स्टुडंटस् ऑफ द आर्ट’ या पुस्तकात त्याने त्याचे कलेविषयीचे तत्त्वज्ञान व निसर्गाची सांगड, सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन व स्वाभाविक प्रकाशचित्रकला तसेच कलेचा इतिहास याविषयी लिहून धमाल उडवून दिली. यामुळे निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीमुळे त्या पुस्तकास ‘टी पार्टीमध्ये टाकलेला बॉम्ब’ अशी संज्ञासुद्धा देण्यात आली होती. आणि त्यामुळे एका नव्याच चर्चेला सुरुवात झाली होती - ‘संपूर्ण तीव्र केंद्रित स्पष्टता असलेले प्रकाशचित्र निसर्गाशी प्रामाणिक आहे का किंचित धूसर? धूसरता हीसुद्धा किती प्रमाणात?’ पुढे १८९१ मध्ये ‘द डेथ ऑफ नॅचरॅलिस्टिक फोटोग्राफी’ अशा मथळ्याखाली इर्मसनने एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यानंतर मात्र त्याने त्याची प्रकाशचित्रे कधीही प्रसिद्धीस दिली नाहीत; पण तो प्रकाशचित्रणात मात्र कार्यमग्न राहिला.

१८९५ मध्ये कलात्मक प्रकाशचित्रणामध्ये मोलाची भर घातल्याबद्दल रॉयल फोटोग्राफिक सोसायटीने ‘प्रोग्रेस मेडल’ बहाल करून इर्मसनचा गौरव केला.

‘हिस्टरी ऑफ आर्टिस्टिक फोटोग्राफी’ हा ग्रंथ त्याने १९२४ मध्ये लिहिण्यास घेतला. १२ मे १९३६ ला त्याच्या निधनापूर्वी सुदैवाने त्याने तो लिहून पूर्ण केला होता.

वादविवादांचे प्रसंग बाजूला ठेवले तरी पीटर हेन्री इर्मसन हा महत्त्वाचा प्रकाशचित्रकार म्हणून प्रकाशचित्रकलेच्या इतिहासात नोंदवला गेला. आजही कित्येक प्रकाशचित्रकारांचे तो स्फूर्तिस्थान बनून राहिला आहे.