हीना-बिलावलविरोधात फतवा?

इस्लामाबाद। दि. २८ (वृत्तसंस्था)

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांच्यामागे संकटांची मालिकाच सुरू झाली आहे काय, असा प्रश्न आता पडू लागला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचा अध्यक्ष बिलावल भुत्ताे याच्याशी असलेल्या त्यांच्या प्रेमसंबंधांकडे आता कट्टरवाद्यांची दृष्टी वळली असून, या दोघांविरोधात फतवा काढला जाण्याची दाट शक्यता आहे, असे वृत्त एका बांगलादेशी वृत्तपत्राने दिले आहे.

पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांनी हीनाला मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचे ठरविले आहे. हीनाने या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे, असेही या वृत्तात म्हटले आहे. हीनाचे पती फिरोज गुलझार मात्र अस्वस्थ असून, या प्रकरणात आपल्या दोन लहान मुलींना ओढले जाणे दुर्दैवी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हीना व आपल्यात बेबनाव असल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळून लावले आहे. अफवा पसरवणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही, ही खेदजनक बाब आहे, अशी खंत फिरोज यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेला मध्यस्थी करण्यास सांगण्यात आल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला आहे.