लंडन (खास प्रतिनिधी) - बीजिंग ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरल्याचे शल्य मनात ठेवून भारतीय हॉकी संघ यंदा लंडनला उतरला आहे. हे शल्य पुसून टाकत पदक मिळवून सुवर्णदीन परत आणण्याचा इरादा आहे.. यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून ‘चक दे इंडिया’ हा चित्रपट पाहण्याचा सल्ला देण्यात आला. सर्व खेळाडूंनी हा चित्रपट पाहिला असून, यामुळे विजयाची जिद्द निर्माण होईल, असा विश्वास प्रशिक्षक मायकेल नोब्स यांनी व्यक्त केला.
ऑलिम्पिक मुख्य स्टेडियमच्या शेजारी असलेल्या तात्पुरत्या हॉकी स्टेडियमवरील निळ्या अँस्ट्रोटर्फवर बुधवारी भारतीय संघाने टिच्चून सराव केला. सर्वच खेळाडूंनी घाम गाळत आपल्या कौशल्याचे दर्शन घडविल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्वत: नोब्स आणि कर्णधार भारत छेत्री यांनी विजयासाठी नव्या दमाच्या खेळाडूंना अधिक संधी देणे, अनुभवी खेळाडूंनी बचावफळी सांभाळणे तसेच आक्रमक खेळाच्या बळावर प्रतिस्पध्र्यांवर दडपण आणणे यावर भर देणार असल्याचे सांगितले.

