७0 चे स्पिरीट रेट्रो फॅशन इन, आपल्याला पण काय शोभेल.?

रणबीर कपूरच्या ‘बर्फी’चा लूक पाहिला.? जुने ऋषी कपूरचे सिनेमे आठवले.? ऋषी कपूर आणि त्याचं स्वेटर हे एक वेगळंच स्टाइल स्टेटमेण्ट होतं. आता ‘बर्फी’त रणबीर कपूर मस्त सायकलवर गाणी गात फिरतोय, स्वेटरमध्ये मस्त क्यूट दिसतोय.! आता त्यानं स्वेटर घातलंय म्हणजे स्वेटरचा जमाना परत येणार हे उघड आहे. त्यात थंडीचे दिवस. स्वेटर स्टाईल स्टेटमेण्ट ठरणार अशी उघड लक्षणं आताच दिसू लागली आहेत. पण इथेच ही गोष्ट थांबत नाही. नुसते स्वेटरच नाही तर एकूणच ‘रेट्रो’ फॅशन परत येताहेत असं र्दिसतंय.. एक वेणीची फॅशन परत आली आहे. थ्री-फोर्थ बाह्यांची फॅशन परत आली आहे. पोल्का डॉटस परत आलेत. फ्रॉक स्टाईल कुर्ती परत आल्या आहेत. रेट्रो इज इन असं म्हणावं इतक्या जुन्या गोष्टी नवीन रूप घेऊन परत येताना दिसत आहेत. आता सगळंच परत येतं आहे. म्हणून आपणही जे आलं ते वापरायचं असं काही होत नाही. त्यातलं आपल्याला काय बरं दिसेल हे आपलं आपण ठरवायचं. आणि ट्रेण्डी होण्यात एक पुढचं पाऊल टाकायचं. ते कसं करायचं. याच्याच या काही ट्रेण्ड टिप्स.

१) अफगाण आणि पठाणी कुर्ती.

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना खार ज्या पद्धतीचे कुर्ते घालतात, साधारण त्या वळणाची ही फॅशन. त्यांनी या कुर्त्यांंमुळे स्वत:चं खास स्टाईल स्टेटमेण्ट निर्माण केलं आहे. सध्या त्या प्रकारच्या कुर्त्यांंची मोठी फॅशन आहे; पण या कुर्त्यांंचं मूळ विशेषत: सत्तरच्या दशकाच्या फॅशनमध्ये आणि त्याही आधी पारंपरिक पठाणी वेशात दिसतं. आता मात्र ट्रेण्ड म्हणून हे कुर्ते परत आले आहेत. पठाणी कुर्ता आणि धोती सलवार ही सगळ्यात इन फॅशन आहे. पण खूप जाड असणार्‍या मुलींनी पठाणी कुर्त्यावर धोती सलवार शक्यतो घालू नये. त्यापेक्षा पठाणी कुर्ते आणि जिन्स असे कॉम्बिनेशन जास्त चांगले दिसते.

२) घेराचे फ्रॉक स्टाईल कुर्ते

घेरदार कपडे ही रेट्रोची आणखी एक ओळख होती आता तीच फॅशन पुन्हा आली आहे. फ्रॉक स्टाईल कुर्ते सध्या प्रचंड पॉप्युलर आहेत. हे कुर्ते खरंच कुणीही वापरावेत इतके ट्रेण्डी आहेत. त्यावर सलवार, चुडीदार, स्लॅक, जीन्स असं काहीही कॉम्बिनेशन म्हणून वापरता येऊ शकतं. मात्र हे कुर्ते वापरताना अनेक जणी त्यावर अत्यंत तंग लेगिन्स वापरताना दिसतात. ते फारच ओंगळ दिसतं. त्यामुळे फ्रॉकस्टाईल कुर्ते वापरणाच असाल तर असं तंग फिटिंग टाळलेलंच बरं.!

३) तुम्हाला काय वाटलं ही लेटेस्ट फॅशन आहे. म्हणजे सध्या तसं वाटत असलं तरी गळ्यात लांबच लांब माळा घालणं ही ७0 च्या दशकातलीच फॅशन. आता ती परत आली आहे. अगदी २0-२५ रुपयांपासून या माळा सर्वत्र उपलब्ध आहेत.

या माळा घालायच्याच असतील तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी शक्यतो केस बांधून, वेणी घालूनच या माळा घालाव्यात. नाहीतर गळ्यात केस, माळा आणि हातभर बांगड्या हा अवतार काहीतरीच दिसतो.

४) व्हाईट मॅक्सी. अर्थात वन पीस.

वन पीसची फॅशन सध्या इन आहे. त्यातही पांढर्‍या रंगातले वन पीस एकदम झकास दिसतात. छोट्या शहरात ही फॅशन अजून पोहोचली नसली तरी बड्या शहरात गुडघ्यापर्यंंत आणि पायघोळ अशा दोन्ही स्वरूपात वन पीस सध्या सर्रास वापरले जातात.

उत्तम कॅरी करता येत असतील तर आणि फार तंग वाटत नसतील तर हे वन पीस वापरायला काहीच हरकत नाही. अट एकच, फार बारीक किंवा फार जाड मुलींनी या वन पीस च्या वाट्याला न गेलेलंच उत्तम.

५) घेरदार पटियाला. पायघोळ

एका लग्नाची दुसरी गोष्ट सांगणार्‍या राधाने पटियाला सध्या सुपरहिट करून ठेवल्या आहेतच. शॉर्ट कुर्ते आणि पायघोळ हाफ किंवा फूल पटियाला ही फॅशन सध्या मुलींमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

शहर-ग्रामीण भाग कुठेही वापरावेत असे हे कपडे. मात्र ते वापरताना एकच काळजी घ्यायची जास्त कॉण्ट्रास्ट मॅचिंग करण्याच्या नादात आपण फुलाफुलांची परडी तर दिसत नाही हे तपासायचे. फ्लोरल प्रिण्ट म्हणजे फुलांचं कापड आवडतं म्हणून वाट्टेल त्या बटबटीत प्रिण्ट मुली वापरताना दिसतात. ते टाळलेलंच बरं.!