Ctrl Speed

- चिन्मय लेले

आज फॉर्म्युला वन

कार रेसिंगचा थरार

काऽऽऽऽऽर

असं म्हटलं की, ज्यांना वेड लागतं त्यांच्यासाठी आजचा दिवस खास आहे. स्पेशल आणि डोळ्यांसह डोक्यालाही झिंग आणणारा.

आज आहे, भारतात दुसर्‍यांदा होत असलेली फॉर्म्युला वन ग्रां. पी.

म्हणजेच फॉर्म्युला वन कार रेसिंग.

ज्यांना कार आणि रेसिंग या दोन्ही गोष्टींमधला थरार कळतो त्यांना या ‘फॉर्म्युला वन’ची गंमत कळते.

मागच्या वर्षी पहिल्यांदा ही स्पर्धा भारतात भरली. तेव्हा एकीकडे कौतुकाचे भरते आले होते, तर दुसरीकडे रेसिंग ट्रॅकच्या बाजूला धुळीचे लोळ उठत होते.

तरीही भारताच्या दृष्टीनं ही स्पर्धा महत्त्वाची होती. कारण फॉर्म्युला वन सारख्या स्पर्धा या केवळ एका खेळापुरत्या र्मयादित नसतात. तर ते एक प्रकारचं स्टेटमेण्ट असतं. तुमच्या देशाचं, तुमच्या देशाच्या बदलत्या जागतिक स्थानाचं आणि देशातल्या सुबत्तेचंही. त्याचमुळे तर मागच्या वर्षी भारतात झालेली ही स्पर्धा जगभरात चर्चेचा विषय ठरली.

हे या स्पर्धेचं दुसरं वर्ष. यावर्षी फॉर्म्युला वनची तयारी मागच्या वर्षीपेक्षा कित्येक पट अधिक चांगली झाली आहे. देश-विदेशातले कार ड्रायव्हर्स या स्पर्धेत सहभागी व्हायला उत्सुक आहेत, अशा बातम्या आपण गेले काही दिवस वाचतो आहोत.

त्यातलीच एक वेगळी बातमी म्हणजे यावर्षी पहिल्यांदा या स्पर्धेत एक महिला कार रेसिंग संघ सहभागी होतो आहे. आणि सौबर नाव असलेल्या त्या टीमची प्रमुख (अर्थात प्रिन्सिपल) आहे एक युरोपियन महिला मोनीषा कालटेनबोर्न.

महिला आणि या पुरुषी कार रेसिंग वेगवान खेळात.?

असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आणखी एक मिनिटभर थांबा, मोनीषा ही फक्त या वेगवान खेळाचा भाग होऊन फॉर्म्युला वन चॅम्पिअनशिपवर दावा सांगत नाहीये, तर त्याहून तिची आणखी एक ओळख आहे.

मोनीषाचं पूर्ण नाव आहे मोनीषा कालटेनबोर्ग नारंग.

ती भारतीय वंशाची आहे. दोन मुलांची आई असलेली मोनीषा आज स्वत:च्याच मायदेशात एक नवा इतिहास घडवायला सिद्ध झालेली आहे.

ती तो इतिहास घडवून एक नवीन ओळख निर्माण करेल का हे फॉर्म्युला कार रेसिंग ठरवेलच. पण एका पुरुषी खेळात स्वत:ची दावेदारी सांगणार्‍या मोनीषाला मात्र एकदा भेटायला हवं. ऐकायला हवी, तिच्या युरोपियन-भारतीय वेगवान जगण्याची गोष्ट.

मोनीषाशी ही खास बातचित.

तुझ्या पासपोर्टवर तुझं नारंग हे भारतीय आडनाव आहे; पण फॉर्म्युला वनच्या जगात तुझी ओळख युरोपियन नावानंच आहे, असं का.?

- माझ्या भारतीय वंशाचा मला अभिमान आहे. नारंग या आडनावाचाही; पण आजच्या व्यावसायिक जगात दोन दोन आडनावांची आगगाडी लावून स्वत:ची ओळख निर्माण करणं जरा अवघड. त्यापेक्षा कुठलं तरी एकच नाव लावलेलं बरं, असं मला वाटतं म्हणून मी एक नाव लावते. यापेक्षा अधिक त्यात काही नाही. प्रॅक्टिकली एक गोष्ट स्वीकारणं एवढीच काय ती यात सोय.

तुझ्या मते इंडियन ग्रां. प्री चं काय महत्त्व आहे.?

प्रोफेशनल आणि पर्सनल पातळीवर ही स्पर्धा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचीच आहे. पर्सनली म्हणाल तर मी अशा देशात स्पर्धेला चाललेय जिथं माझी मुळं आहेत, माझं लग्न मी ज्या देशात हिंदू पद्धतीनं केलं. आजही लहानपणी भारतात येऊन राहिल्याच्या आठवणींनी मला मस्त वाटतं.

प्रोफेशनली तर काय मी जगभर या स्पर्धांसाठी जाते. ते माझं कामच आहे. फॉर्म्युला वन कार रेसिंग हेच काम एकदा करिअर म्हणून स्वीकारलं म्हटल्यावर त्या कामावर अतोनात प्रेम असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे.

भारतात म्हणाल तर क्रिकेटपलीकडे दुसरा कुठलाही खेळ या देशात रुजतो आहे, हीच आता मोठी गोष्ट आहे. अजूनही फॉर्म्युला कार रेसिंगविषयी या देशात क्रिकेटइतकी कुणाला उत्सुकता आहे, असं मला वाटत नाही. मागच्या वर्षी पहिल्यांदाच असं काही घडत होतं म्हणून थोडी उत्सुकता होती. यावर्षी ती वाढली तर चांगलंच आहे. माध्यमांमुळे हा खेळ लोकांपर्यंत पोहोचेल, असंही मला वाटतं. मुख्य म्हणजे भारत हा देश आता एक मोठ्ठी अर्थशक्ती आहे. मोठी बाजारपेठ आहे. अनेक लोक आपला आर्थिक स्तर उंचावत आहेत. चारचाकी गाड्या लोक सहज घेऊ लागले. टेक्नॉलॉजीचा वापर वाढतो आहे. या अशा वातावरणात फॉर्म्युला वन सारख्या प्रतिष्ठित खेळाला भारतात यावेसे वाटले नसते तरच नवल होते. ते वाटले आणि भारतानं जगाला दाखवून दिलं की आम्ही याही खेळात आघाडीवर राहू शकतो.

या खेळात एक महिला म्हणून स्वत:ला सिद्ध करणं किती अवघड असतं.?

ज्या व्यावसायिक जगात मी काम करते ना, त्या जगात तुम्ही स्त्री आहात की पुरुष याला फारसं महत्त्व नाही, असं मी तरी मानते. महिला बॉस असणं अजूनही अनेक क्षेत्रात लोकांना मान्य होत नाही, पचत नाही. तसंच बाहेरून पाहणार्‍या अनेकांना वाटत असेल की फॉर्म्युला वन ची प्रिन्सिपल एक बाई.? कसं जमणार.?

पण या प्रश्नांची उत्तरं त्यांनी शोधावीत, मी त्याचा विचार करत नाही. माझा माझ्या हातातल्या कौशल्यावर पूर्ण विश्‍वास आहे.

एका फॉर्म्युला वन कार रेसरची खरी ताकद काय, असं तुला वाटतं.?

वेग गाडीला असतो तसाच तो तुमच्या डोक्यातही असतो. त्यामुळे तुम्ही केवळ गाडी कंट्रोल करत पळवत नसता तर तुम्ही तुमचं डोकं कंट्रोल करत असता. किती वेगावर आपण स्वार व्हायचं आणि किती वेग आपण नियंत्रित करू शकतो हे ज्याला कळतं तो चांगला ड्रायव्हर. वेगानं गाडी तर काय कुणीही चालवेल; पण ती गाडी कंट्रोल करता आली नाही तर मात्र तुमच्या वेगाला काही अर्थ नाही. माझ्या मते हीच चांगल्या ड्रायव्हरची ओळख आहे. वेगाची नशा ज्याला चढते तो संपला, वेगाला कंट्रोल करणाराच जिंकतो.!